जलयुक्त कॅल्शियम युरॅनिल फॉस्फेट खनिज. फ्रान्समधील ऑटुन येथे १८५२ मध्ये त्याचा शोध लागल्यामुळे त्याचे नाव ऑटुनाइट पडले.

रासायनिक संघटन : रा. सू. Ca(UO₂)₂(PO₄)₂•10–12H₂O. यांत सामान्यतः ४८-५० % युरेनियम, ९-१० % फॉस्फरस, ५-६% कॅल्शियम व उर्वरित ऑक्सिजन व पाणी आढळतात. युरेनियम हे युरॅनिल आयनच्या (UO₂²⁺) स्वरूपात असते. युरेनियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते अत्यंत किरणोत्सर्गी आहे. स्फटिक रसायनशास्त्राच्या दृष्टीने त्याची रचना युरेनिल-फॉस्फेट पत्रकांनी (Uranyl-phosphate sheets) बनलेली असते. या पत्रकांमध्ये युरॅनिल आयन आणि फॉस्फेट चतुष्फलक (PO₄ tetrahedra) एकमेकांशी जोडलेले असतात. पत्रकांमधील रिक्त जागांमध्ये कॅल्शियम आयन आणि जलरेणू स्थित असतात, त्यामुळे संपूर्ण रचनेला स्थैर्य प्रदान होते. या स्तरित संरचनेमुळे ऑटुनाइटमध्ये उत्कृष्ट विदरण (perfect cleavage) आढळते. ऑटुनाइट हे अस्थिर खनिज आहे. कोरड्या वातावरणात किंवा उष्णेतेमुळे ते आपल्या संरचनेतील जलरेणू गमावतो आणि त्याचे रूपांतर मेटा-ऑटुनाइट या खनिजामध्ये होते. या प्रक्रियेमुळे त्याच्या स्फटिकीय रचनेत आणि काही भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होतो.

भौतिक गुणधर्म : रंग सामान्यतः लिंबासारखा चमकदार पिवळा, हिरवट-पिवळा किंवा पिवळसर-हिरवा. काही नमुन्यांमध्ये रंगाची तीव्रता कमी-जास्त असू शकते. अतिनील प्रकाशात तीव्र अनुस्फुरण (fluorescence) दर्शवते. रेघरंग फिकट पिवळा, चमक सामान्यतः काचेसारखी ते मोत्यासारखी, पारदर्शक ते अर्धपारदर्शक. चतुष्कोणी (Tetragonal) स्फटिक प्रणाली, स्फटिक बहुधा पातळ, चौकोनी किंवा आयताकृती पत्रकांच्या स्वरूपात. अनेक वेळा हे स्फटिक एकमेकांवर थरांमध्ये वाढून गुच्छाकृती (रोझेटसदृश; rosette-like) किंवा खवल्यासारखे समूह तयार करतात. तुलनेने मऊ खनिज. कठिणता २ – २.५, विशिष्ट गुरुत्व ३.०५ – ३.२०, स्फटिकीय रचना स्तरित, उत्कृष्ट विभाजन (001). खनिज पातळ चकत्या, चौकोनी पत्रके आणि स्फटिकीय पुटे (Crusts) स्वरूपात आढळते.

आढळ : ऑटुनाइट हे एक द्वितीयक (Secondary) खनिज आहे. ते थेट तयार न होता युरॅनिनाइट आणि पिचब्लेंड यांसारख्या प्राथमिक युरेनियम खनिजांच्या अपक्षय आणि ऑक्सिकरणामुळे निर्माण होते. ही प्रक्रिया प्रामुख्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील ऑक्सिडीकरण क्षेत्रांमध्ये घडते. प्रामुख्याने युरेनियम निक्षेपांच्या अपक्षय क्षेत्रांमध्ये आढळते. ते युरेनियमचे प्रमुख धातुक नाही, तथापि युरेनियमचे साठे शोधण्यासाठी एक उत्कृष्ट निर्देशक खनिज मानले जाते. भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून ऑटुनाइट ग्रॅनाइट, पेग्माटाइट, जलतापीय शिरा, अवसादी युरेनियम निक्षेप आणि काही रूपांतरित खडकांमध्ये आढळते. हे खनिज सहसा टॉर्बर्नाइट, कार्नोटाइट, युरॅनोफेन आणि झिप्पेआइट यांसारख्या इतर द्वितीयक युरेनियम खनिजांसोबत आढळते.

ऑटुनाइट हे जगातील अनेक देशांमध्ये, विशेषतः युरेनियम खाण क्षेत्रांच्या ऑक्सिडीकरण झालेल्या भागांमध्ये आढळते. फ्रान्स, जर्मनी, चेक रिपब्लिक, अमेरिका, नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया येथे या खनिजाच्या आढळासंबंधी अनेक नोंदी आहेत. भारतात ऑटुनाइट हे प्रामुख्याने झारखंडमधील सिंहभूम युरेनियम पट्टा आणि मेघालयातील महाडेक बेसिन या क्षेत्रांमध्ये आढळते.

संदर्भ :

  • Frondel, C. Systematic Mineralogy of Uranium and Thorium: U.S. Geological Survey Bulletin 1064;S. G.P.O., 1958. https://doi.org/10.3133/b1064.
  • Klein, C.; Hurlbut, C. S. Manual of Mineralogy (after James D. Dana); Wiley: New York, 1993.
  • Lauf, R. J. Mineralogy of Uranium and Thorium; Schiffer Publishing: Atglen, Pennsylvania, 2016.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.