(शिवमणी, दूधमणी, दुधीया). क्वार्ट्झ कुलातील, सिलिका वर्गातील अस्फटिक जलयुक्त सिलिकारूप धवल खनिज. ओपलचा रत्न म्हणूनही वापर होतो. रत्न (खडा) या अर्थाच्या उपल/उपला/अग्निरत्न या संस्कृत शब्दावरून, तसेच ग्रीक ‘ओपॅलिऑस’ आणि लॅटिन ‘ओपॅलस’ या शब्दावरून ओपल हे नाव आले असावे. खनिजशास्त्रीय परिभाषेत ओपल हे खनिज नसून ते अस्फटिक उपखनिज (amorphous mineraloid) आहे.

गुणधर्म : अस्फटिकी. संपुंजित, कधीकधी वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराच्या), झुंबराकार, ग्रंथिल किंवा चूर्णाच्या स्वरूपात आढळ. ते अनियमित, भरीव आकाराचे असून साधारणपणे स्फटिकवेष्टित पोकळीत सापडते. उपकाचीय अथवा मेणचट चमक दाखविणारे ते शंकाकृतीत तुटते. अजिबात भंजन नसलेल्या या उपखनिजाची रेषा ही रंगहीन अथवा पांढरी असते. काठीण्य ५.५-६, विशिष्ट गुरुत्व २.१५, दुधी काचेप्रमाणे पारभासी, चमक काचेसारखी, राळेसारखी, कधीकधी मोत्यासारखी. रंग दुधी किंवा पिवळा, लाल, उदी, हिरवा, करडा, निळा या रंगांच्या छटा. मलद्रव्यांमुळे रंग गडद होतो किंवा वर्णविलासही (एकाच नमुन्यात निरनिराळे रंग दिसणे) दिसतो.
भूवैज्ञानिक उत्पत्ती : सामान्यत: कमी तापमानास, सिलिकायुक्त पाण्यामार्फत निक्षेपित (साचलेले) होऊन ओपलची निर्मिती होते. ते अनेक प्रकारच्या खडकांतील पोकळ्यांत आढळते. सहसा ज्वालामुखीच्या खडकातून, पावसाचे पाणी सिलिका विरघळवून खाली जाते. तिथे तडे, पोकळीत हळूहळू थर साचतात, लाखो वर्षे लागतात आणि सिलिका वर्गातील इतर खनिजासमवेत निक्षेपित होतात.
गुणधर्म : ओपलचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत : (१) साधे ओपल, (२) मौल्यवान ओपल. ओपलमध्ये सामान्यपणे सिलिकाचे लाखो छोटे गोळे – साधारण ०.१५-०.३० म्यूमी. या आकाराचे, थरावर थर साचलेले असतात. त्यांच्यातून प्रकाशकिरण विवर्तनीत होतो आणि निळा-हिरवा-लाल इ. रंगात दिसतो. म्हणून ओपल हलवला की पाण्याच्या हालचालीने रंग बदलतो. मौल्यवान ओपलमध्ये अंतर्गत रचनेमुळे प्रकाशाचे विवर्तन होते आणि रंग बदल खेळामुळे लाल, नारिंगी, पिवळा अशा रंगछटा पृष्ठभागावर दिसतात. अशा ओपलला ज्योतिर्मय ओपल असेही म्हणतात. काळा, पांढरा, दुधी रंगातील ओपलला रत्नउद्योगात मोठी मागणी आहे. ओपलची खरी किंमत त्याच्या रंगावर असते.
उपयोग : ओपल हे मुख्यत: मौल्यवान रत्न म्हणून ऐतिहासिक काळापासून वापरात आहे. याशिवाय सौंदर्यप्रसाधने, पॉलिश करण्यासाठी, सूक्ष्म-गाळण प्रणालीत आणि बांधकाम क्षेत्रात याचा कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो.
आढळ : भारतात महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथे हे खनिज सापडते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इथिओपिया हे मुख्य उत्पादक देश आहेत. याशिवाय मेक्सिको, ओरेगॉन, ब्राझील, पेरू या देशातही याचे विपुल साठे आहेत.
विशेष माहिती : ऑस्ट्रेलियाला ‘लँड ऑफ ओपल’ म्हणतात. जगातील ९५% मौल्यवान ओपल तिथेच मिळतो. १९५६ मध्ये सापडलेला ‘ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिस’ हा १७,००० कॅरेटचा ब्लॅक ओपल जगातला सर्वांत मोठा मानला जातो.
संदर्भ :
- Deer, Howie and Zussman, Rock-Forming Minerals, 2nd edition By M.E. Fleet, The Geological Society, London, 2003, 758 pp.
- Read, H. H., Rutley’s Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.
समीक्षक : वडगबाळकर, श्रीनिवास कृष्णाजी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
