गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक तीर्थक्षेत्र. भारतातील सर्वांत प्राचीन असलेल्या अरवली पर्वतरांगांच्या परिसरात वसलेले असल्यामुळे चोहोबाजूंनी ते
अरवली टेकड्यांनी वेढलेले आहे. समुद्रसपाटीपासून ४८० मी. उंचीवर वसलेले हे नगर गुजरात व राजस्थान राज्यांच्या सीमेजवळ स्थित आहे. भौगोलिक दृष्ट्या ते २४.३३° उत्तर अक्षांशावर आणि ७२.८५° पूर्व रेखांशावर आहे. नगराची लोकसंख्या १७,७५३ (२०११) आहे. नगराचे हवामान उष्ण व अर्धशुष्क स्वरूपाचे असून उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाते; तर हिवाळ्यात ते १० ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. येथे हिवाळ्यात काही वेळा धुक्याची चादर पाहायला मिळते. अंबाजी नगराच्या परिसरात वाळूयुक्त-पोयटा मृदा आढळते. पावसाळ्यात सरासरी ६०० ते ८०० मिलिमीटर इतकी पर्जन्यवृष्टी होते.
आरासुरी अंबाजी माता मंदिर, गब्बर टेकडी, मानसरोवर कुंड आणि कोटेश्वर महादेव मंदिर ही नगरातील व परिसरातील मुख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांपैकी अंबाजी माता मंदिर हे खूप प्राचीन व पवित्र मंदिर असून ते भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार या ठिकाणी देवी सतीचे हृदय पडले होते. विशेष म्हणजे या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही, तर एका पवित्र अशा ʿश्री वीसा यंत्राचीʾ अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते. हे मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांत बांधलेले असून त्याच्या शिखराला सोन्याचा मुलामा आहे. नवरात्री आणि भाद्रपद पौर्णिमेच्या काळात भरणाऱ्या जत्रेला देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे अंबाजी हे गुजरातमधील एक अतिशय महत्त्वाचे आणि सर्वांगीण विकास झालेले धार्मिक व पर्यटन केंद्र बनले आहे. त्यासोबतच येथे हॉटेल व्यवसाय व व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालतो. या मंदिरापासून काही अंतरावर गब्बर टेकडी आहे. हे देवीचे मूळ स्थान मानले जाते. येथे जाण्यासठी पायऱ्या आणि केबल कारची सोय उपलब्ध आहे. दळणवळणाच्या उत्तम सोयींमुळे येथील रस्ते गुजरात व राजस्थानमधील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहेत. येथून अवघ्या २० किमी. अंतरावर ‘अबू रोड’ हे जवळचे रेल्वे स्थानक असून अहमदाबादचा सरदार वल्लभभाई पटेल हा सर्वांत जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजस्थानमधील प्रसिद्ध गिरिस्थान, जैनांचे तीर्थक्षेत्र व दिलवाडा मंदिरांच्या अप्रतिम शिल्पांकरिता जगप्रसिद्ध असलेले मौंट अबू हे ठिकाण अंबाजीपासून फक्त ४५ किमी. अंतरावर आहे. या नगराचा कारभार नगरपंचायतीमार्फत चालतो.
संदर्भ : राज्यगोर, एस. बी. (संपा), बनासकांठा जिल्हा गॅझेटिअर, अहमदाबाद, १९८१.
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
