
जपानी सूर्यदेवता. तिला जपानी संस्कृतीमध्ये ‘अमतेरसू ओमिकामी’ असे म्हणतात. ‘ओमिकामी’ हा शब्द तिच्या सर्वोच्च देवतेच्या स्थानाला दर्शवतो. तिच्या नावातूनच सूर्यदेवतेची तेजस्विता आणि सर्वव्यापकता स्पष्ट होते. ‘अमतेरसू’चा अर्थ स्वर्गावर प्रकाश टाकणारी किंवा आकाशात प्रकाश पसरवणारी देवता असा होतो. जपानी पुराणकथेनुसार ती शिंतो धर्मातील सर्वोच्च सूर्यदेवता असून तिला विश्वाची राणी मानले जाते.
जपानी निर्मितिविषयक कथेनुसार स्वर्गात प्रथम स्वयंभू अशा तीन देवता निर्माण झाल्या व अंतर्धान पावल्या. नंतर पृथ्वी तरंगत असताना एका अंकुरापासून दोन देवता जन्मल्या व अंतर्धान पावल्या. त्यानंतर देवांच्या सात पिढ्या जन्मल्या. त्यांपैकी शेवटचे जोडपे म्हणजे ईझॅनगी आणि ईझॅनमी हे होय. त्या दोघांपासून जपानसह अनेक बेटे, अनेक देव इत्यादींची निर्मिती झाली. ईझॅनमीला अग्नी हा पुत्र झाला; त्याने तिला जाळल्यामुळे ती मरण पावली. तेव्हा ईझॅनगीच्या शोकाश्रूंपासून शोकनदी ही देवी जन्मली. नंतर तो पत्नीला शोधण्यासाठी अधोलोकात गेला; परंतु तिने तेथील अन्नाची चव चाखली असल्यामुळे ती परत आली नाही. त्याने परत आल्यावर पवित्र होण्यासाठी स्नान करताना फेकलेल्या वस्त्रांपासून अनेक देव झाले. त्याने समुद्रात बुडी मारली, तेव्हा समुद्रातील देव निर्माण झाले. त्याने डावा डोळा धुतल्यावर अमतेरसू ही सूर्यदेवी, उजवा डोळा धुतल्यावर त्सुकियोमी हा चंद्रदेव आणि नाकापासून सुसनॉ हा देव जन्मला.
अमतेरसूच्या वडिलांनी तिला ताकामागाहारा या उच्च स्वर्गीय प्रदेशाची प्रशासकीय जबाबदारी सोपवली. तिने पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आणि तेथील बातमी आणण्यासाठी अनेकांना पाठवले. त्यांपैकी तिचा नातू निनिगी हा एक होय. निनिगीचा पुत्र हिकोहोहोडेमी आणि एक समुद्रकन्या यांच्या वंशजांपासून जपानचा राजावंश सुरू झाल्याचे मानले जाते. अमतेरसूचा धाकटा भाऊ सुसनॉ हा मेघनाद, पाऊस, वादळ आणि सुफलता यांचा देव होता. अमतेरसूच्या तीन कन्या आणि सुसनॉचे पाच पुत्र हे मानवांचे पूर्वज मानले जाते.
अमतेरसू ही जपानच्या प्राचीन धार्मिक परंपरेतील सर्वांत महत्त्वाच्या देवतांपैकी एक मानली जाते. ती प्रकाशासोबतच जीवन, सुव्यवस्था आणि दैवी सत्ता यांचे प्रतीक असलेली देवता असून तिचे प्रमुख प्रतीके पुढीलप्रमाणे : एक, अष्टभुजाकृती आरसा जो सत्य, चिंतन आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो. दोन, उगवता सूर्य जो प्रकाश, शक्ती आणि जीवनदायी ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि तीन, मगाटामा रत्न जे स्वल्पविरामाच्या आकाराचे असून संरक्षण, दैवी अधिकार आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. ही प्रतीके तिची कृपा, बुद्धिमत्ता आणि दिव्य प्रभाव प्रकट करतात.
जपानच्या राजघराण्याची कुळदेवी म्हणूनही तिची पूजा केली जाते. तिच्या सन्मानार्थ जपानमधील ‘ईझे ग्रँड श्राइन’ येथील मंदिर सर्वांत पवित्र मानले जाते. जपानी बौद्ध धर्मात अमतेरसूला दैनिची म्हणजेच ‘महान सूर्य’ बुद्ध म्हणून ओळखले जाते. शिवाय तिला एका व्यापक देवमंडळात समाविष्ट केले गेले.
संदर्भ :
- Ashkenazi, Michael, Handbook of Japanese Mythology, New York, 2003.
- Ono, Sokyo, Shinto : The Way of the Kami, Vermont, 1962.
- Piggott, Juliet, Japanese Mythology, Oxford, 1969.
- देशपांडे, अ. र. ‘जगातील प्राचीन धर्म’, पुणे, २०१०.
समीक्षक : सुनील साळुंके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
