
अ क्लाउड इन ट्राउझर्स (१९१८) : रशियन कवी व्हल्द्यीम्यिर माय्कोव्हस्की (१८९३–१९३०) यांची एक प्रसिद्ध दीर्घ कविता. मूळ रशियनमध्ये ‘ओब्लका व् ष्तनाख’ (इं. भा. ‘अ क्लाउड इन ट्राउझर्स’) तर मराठीमध्ये ‘पँट घातलेला ढग’ असे भाषांतर होते. विसाव्या शतकाच्या आरंभी रशियन काव्यविश्वात एखाद्या वादळासारखी आलेली ही कविता, कवीच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी (१९१४–१५) एका असफल प्रेमाच्या वेदनेतून जन्माला आली. प्रेम, कला, व्यवस्था आणि धर्म या चार स्तंभांना आव्हान देणारी, एकाच वेळी विरहगीत व क्रांतिघोषणा असणारी ही कविता ‘रशियन फुतुरिझम’ चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा व सर्वोत्तम नमुना आहे. इटलीत फिलिपो मारिनेत्तीच्या (१८७६–१९४४) नेतृत्वाखाली सुरू झालेल्या नवकालवादी (इं.शी. ‘फ्युचरिझम’) अवान्त् गार्द चळवळीचे (१९०९) लोण १९१० नंतर रशियात पोहोचले. फ्यूचरिस्ट रशियन कवींनी पुश्किन (१७९९–१८३७), डॉस्टोव्हस्की (१८२१–१८८१), टॉलस्टॉय (१८२८–१९१०) यांना ‘आधुनिकतेच्या जहाजावरून फेकून द्या’ असा जाहीरनामा प्रसिद्ध केला. परंपरेविरुद्ध बंड करताना त्यांनी नव्या भाषेचा, नव्या प्रतिमांचा, नव्या ध्वनींचा शोध घेतला. माय्कोव्हस्की हे ‘रशियन फुतुरीज्म’चा सर्वांत ताकदवान आवाज बनले. रशियाभर फिरून काव्यवाचनाचे प्रयोग करणे, जुन्या साहित्यावर सडकून टीका करणे, काव्याला जनसामान्यांच्या वास्तवाशी जोडणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
काळ्या समुद्राकाठी स्थित शहर अदेस्साच्या काव्यवाचन दौऱ्यात माय्कोव्हस्कीची मरीया नामक एका तरुणीशी भेट झाली. ते तिच्या प्रेमात पडले, पण हे प्रेम एकतर्फी राहिले. या प्रेमभंगाच्या वेदनेतून या कवितेचा जन्म झाला. मात्र वैयक्तिक दुःख हे त्यांच्यासाठी सार्वत्रिक क्रोधाचे, सामाजिक विद्रोहाचे माध्यम बनले. प्रेमभंगाचा हा अनुभव एका व्यक्तीपुरता न राहता अखिल मानवी व्यवस्थेवरील हल्ल्याचा प्रारंभबिंदू ठरला. कवितेचे मूळ शीर्षक होते ‘तेरावा प्रेषित’. ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपलीकडे जाणारा, त्यांनाही वरचढ ठरणारा एक नवा बंडखोर प्रेषित. ही प्रतिमा कवीला अभिप्रेत होती. झार सरकारच्या अभ्यवेक्षण मंडळास (सेन्सॉर) हे शीर्षक असह्य होते. त्यांनी स्पष्ट सांगितले: शीर्षक बदला, नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार रहा. माय्कोव्हस्कीने उत्तर दिले, ‘हवे तर / वेडा होतो मी शारीर क्रोधात, / अन् आकाशासारखा, छटा बदलत / हवे तर / होतो मी कमालीचा कोमल, पुरुष नाही, तर / ‘पँट घातलेला ढग!’ मोठ्या काटछाटींसह ही कविता १९१५ मध्ये प्रथम प्रकाशित झाली. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर १९१८ मध्ये ती पुन्हा प्रकाशित झाली. यावेळी सेन्सॉरने काढलेले भाग पुनः समाविष्ट केले गेले आणि कवीच्या प्रस्तावनेची जोड देण्यात आली.
प्रस्तावनेत, ‘तुमचे प्रेम मुर्दाबाद’, तुमची कला मुर्दाबाद’, ‘तुमची व्यवस्था मुर्दाबाद’, ‘तुमचा धर्म मुर्दाबाद’. या चार धिक्काराच्या घोषणा असून त्या कवितेच्या चार भागांत सूक्ष्मपणे गुंफलेल्या आहेत. कवितेच्या या प्रस्तावनात्मक मनोगतात भावकवितेचा नायक वाचकांशी थेट बोलतो आणि त्यानंतर हे चार भाग येतात. पहिल्या भागात असफल प्रियकर समाजाला विचारतो: ‘असणार की नाही प्रेम? कसे? मणभर की कणभर?’ हा प्रश्न प्रेमाचा असला तरी त्यामागे एक मोठा सांस्कृतिक आक्रोश आहे. प्रचलित काव्यसंकेत, गुळगुळीत शब्दरचना, भावनेचा बाजार नाकारून तो म्हणतो: ‘जी काही निर्मिती आजवरची, त्यावर मारतो मी फुली.’ आपले असफल प्रेम तो रस्त्यावरच्या ‘बिनजिभेच्या’ जनतेला देऊ करतो.
दुसऱ्या भागात ‘तित्तिर पक्षांसारखा चिवचिवाट’ करणाऱ्या कवींना नाकारताना तो काव्याचा नवा उद्देश जाहीर करतो: ‘कापून टाकायला पाहिजे आज वज्रमुष्टीने जगाची खोपडी!’ कविता ही आरशात स्वतःचे सौंदर्य पाहण्याची गोष्ट नाही, तर जगाला हादरे देण्याचे शस्त्र आहे. हे त्याचे काव्यशास्त्र आहे. तिसऱ्या भागात जगाची संरचना मोडकळीस येण्याची प्रतिमा भव्य-दिव्य आहे. बिस्मार्क (१८१५-१८९८), नेपोलियन (१७६९-१८२१), रॉथशील्ड (१७४४-१८१२), गटे (१७४९-१८३२) या सर्व जुन्या व्यवस्थेच्या प्रतीकांची सद्दी संपल्याचे जाहीर करत कवी क्रांतीची अनिवार्यता मांडतो. जुने, सडके, कुजके कापून काढण्यासाठी क्रांती अटळ आहे, हा निष्कर्ष येथे ठळकपणे मांडला आहे. चौथ्या आणि अखेरच्या भागात नायक साक्षात ईश्वरालाच आव्हान देतो: ‘मला वाटलं, तू सर्वशक्तिमान परमेश्वर! पण तू तर अर्धशिक्षित, छोटासा देव आहेस!… धूपाचा वास मारणारा तू, चिरफाडून टाकेन मी तुला इथून पार अलास्कापर्यंत!’ हे केवळ नास्तिकतेचे विधान नाही, हे धार्मिक अधिसत्तेविरुद्धचे, नैतिक वर्चस्वाविरुद्धचे सखोल बंड आहे. ही कविता संपते तेव्हा उपरोधाचा सूर तीव्रतम होतो. हा ‘तेरावा प्रेषित’ इतकी मोठी क्रांती घडवत असताना, जग मात्र गाढ झोपलेले असते. प्रेषिताची शिकवण जगाच्या कानात शिरत नाही.
‘पँट घातलेला ढग’चा आशयच नव्हे, तर भाषाही क्रांतिकारक आहे. माय्कोव्हस्कीने घडवलेली शब्दरचना वापरून भाषेलाच नवी शक्ती दिली. अपारंपरिक छंद आणि ताल वापरून पारंपरिक अलंकार-वृत्ते यांची मोडतोड केली. अतिशयोक्ती आणि अत्यंत अनवट प्रतिमांची इतकी आरास केली की, वाचक अस्वस्थ होतो, हलतो, जागा होतो. याचे एक उत्तम उदाहरण: ‘पडते फाशीच्या स्तंभावरून मुंडके फाशी दिलेल्याचे, पडले बाराचे टोले तसे’ घड्याळाच्या टोल्यांची ही प्रतिमा किती रक्तरंजित व चमत्कृतीपूर्ण आहे माय्कोव्हस्कीच्या काव्यभाषेत रस्त्यावरची भाषा, कारखान्यांचे आवाज, शहरी जगण्याचा ताण यांना शब्दरूप आले. ही कविता वाचताना डोक्यावर झंझावात यावा तशी अनुभूती येते.
इ.स. १९१७ च्या क्रांतीनंतर सोविएत काळात या कवितेला अधिकृत मान्यता मिळाली. ती समाजवादी तरुणांची आवडती कविता बनली. केवळ क्रांतिकारक घोषणा म्हणून नव्हे, तर एका अस्वस्थ, विद्रोही, एकाकी माणसाचे अंतरंग म्हणून कवितेचे नव्याने, अधिक मुक्त दृष्टिकोनातून वाचन सुरू झाले. जागतिक साहित्यावर या कवितेचा प्रभाव उल्लेखनीय आहे. पाब्लो नेरुदा (१९०४-१९७३), बेटोर्ल्ट ब्रेक्ट (१८९८-१९५६) आणि अमेरिकन बीट पिढीतील कवी यांच्यावर या काव्यशैलीचा स्पष्ट ठसा जाणवतो.
या कवितेने रशियन काव्याला तसेच जगभरातील क्रांतिकारक कलाजाणिवांना एक नवे शस्त्र दिले. मराठीमध्ये सदानंद रेगे यांनी ‘पँट घातलेला ढग’ (१९८१) नावाने या कवितेचा अनुवाद केला आहे.
संदर्भ :
- https://cyberleninka.ru/article/n/tragediya-nevostrebovannoy-lyubvi-poema-v-mayakovskogo-oblako-v-shtanah/viewer
- https://licey.net/free/14-razbor_poeticheskih_proizvedenii_russkie_i_zarubezhnye_poety/66-usskaya_poeziya_xx_veka__ocherki_poetiki_analiz_tekstov/stages/3063-analiz_poemy_oblako_v_shtanah.html
- https://www.prlib.ru/history/1894330
समीक्षक : मेघा पानसरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
