(अग्निमांद्य किंवा अपचन). पचनक्रियेत दोष उत्पन्न झाल्यास अजीर्ण हा विकार होतो.

लक्षणे : अन्नाचे पचन व्यवस्थित न होणे, भूक न लागणे, पोट फुगणे, जेवणानंतर अस्वस्थता वाटणे, ढेकर येणे व अपान वायू सरणे ही अजीर्ण विकाराची महत्त्वाची लक्षणे आहेत. याशिवाय अन्नावरील अरुची, पोटात गुरगुरने, जुलाब होणे किंवा बद्धकोष्ठता निर्माण होणे, अशक्तपणा, डोकेदुखी, मूर्च्छा किंवा शुद्ध हरपणे, चक्कर येणे, भ्रम निर्माण होणे, पाठ व कंबर आखडणे, वारंवार जांभई येणे, अंगदुखी, अतितहान लागणे, ताप येणे, उलटी होणे, मलविसर्जनाच्या वेळी त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळतात.

अजीर्ण हा दैनंदिन जीवनात सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परंतु, अजीर्णाचा त्रास सतत होत असेल तर पचनसंस्थेवर ताण येऊन भविष्यात आरोग्याचे पुढील गंभीर परिणाम होऊ शकतात –

(१) पोषक द्रव्यांची कमतरता (Nutrient Deficiencies) : अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीर कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखी महत्त्वाची पोषणद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

(२) जठर ग्रासनली पश्चवाही विकार (GERD; गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज) : सततच्या अजीर्णाने छातीत जळजळ होणे, आंबट पाणी येणे यांसारख्या समस्यांचे रूपांतर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज या विकारात होऊ शकते. यामध्ये व्यक्तीला छातीत दुखणे, अन्न गिळताना त्रास होणे, घसा खवखवणे, दम लागणे किंवा सतत कोरडा खोकला येणे इत्यादी लक्षणे आढळतात.

(३) जठर व्रण (Peptic Ulcers; अल्सर) : दीर्घकाळ पोटात अम्ल (Acid) तयार झाल्यामुळे पोटाच्या किंवा आतड्यांच्या आतील आवरणाला सूज येऊन अल्सर निर्माण होऊ शकतो.

(४) आंत्रविकार : अन्न दीर्घकाळ पोटात साचून राहिल्याने विषारी पदार्थ (Toxins) तयार होतात. यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) किंवा क्षोभकारक आंत्र संलक्षण (IBS; इरिटेबल बाऊल सिंड्रोम) हा आतड्यांसंबंधिचा विकार होऊ शकतो. या विकारात सतत ओटी पोटात दुखणे, पेटके येणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठता या क्रिया एकामागून एक होतात.

(५) रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम : शरीराची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर पचनसंस्थेवर अवलंबून असते. अपचनामुळे ती कमकुवत होते आणि वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.

कारणे : अतिरिक्त अन्नाचे सेवन करणे किंवा खूप कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करणे, अतिप्रमाणात पाणी पिणे, अयोग्य वेळी अन्नाचे सेवन करणे, अन्न नीट न चावता घाईघाईने गिळणे, जेवणानंतर लगेच व्यायाम व श्रम करणे, खूप तेलकट, मसालेदार, अतिथंड, शिळे तसेच क्षिप्रान्न (फास्ट फूड) अतिप्रमाणात खाणे, अन्न पूर्ण पचण्यापूर्वी पुन्हा भोजन करणे, अपथ्य पदार्थांचे सेवन, रात्री जागरण करणे, दिवसा जास्त झोप घेणे किंवा अपुरी झोप, मलमूत्र व अधोवायूचे वेग रोखणे, विषारी किंवा दूषित अन्न सेवन करणे यांमुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. तसेच मत्सर, चिंता, दु:ख, भीती, राग, लोभ, शोक, मानसिक ताण, द्वेष, वेदना इत्यादी मानसिक अवस्थांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये देखील अन्न योग्य प्रकारे पचत नाही. लॅक्टोज असह्यता या विकारात दुग्धजन्य पदार्थांचे पचन व्यवस्थित होत नाही. ग्लुटेन संवेदनशीलता या पचनमार्गाशी संबंधित विकारात तसेच वेदनाशामक औषधे दिर्घकाळ चालू असल्यास अजीर्णाची समस्या उद्भवते.

अजीर्णाचे पुढील प्रकार आहेत –

(१) आमाजीर्ण (कफ प्रकोपामुळे होणारे अजीर्ण) : कफदोषाच्या विकृतीमुळे ‘आमाजीर्ण’ निर्माण होते. या अवस्थेमध्ये डोळ्यांच्या खोबणी व गालांमध्ये सूज येते. जेवण केल्यानंतर लगेच येणाऱ्या ढेकरांसारख्या ढेकर येणे, तोंडात जास्त लाळ साचणे, मळमळ होणे, आळस येणे आणि शरीर जड वाटणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

(२) विष्टब्ध अजीर्ण (वातप्रकोपामुळे होणारे अजीर्ण) : वातदोषाच्या विकृतीमुळे ‘विष्टब्ध अजीर्ण’ निर्माण होते. या प्रकारच्या अजीर्णामध्ये पोटात वेदना होणे, मलावरोध (बद्धकोष्ठता), पोट फुगणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे ही प्रमुख लक्षणे दिसतात.

(३) विदग्ध अजीर्ण (पित्तप्रकोपामुळे होणारे अजीर्ण) : पित्तदोषाच्या विकृतीमुळे ‘विदग्ध अजीर्ण’ होते. या अवस्थेमध्ये तहान वाढणे, चक्कर येणे, भ्रम किंवा गुंगी येणे, आंबट ढेकर येणे आणि शरीरात किंवा छातीत जळजळ होणे ही लक्षणे आढळतात.

(४) रसशेष अजीर्ण : ढेकर स्वच्छ येत असतानाही हृदयाच्या ठिकाणी अस्वस्थता किंवा जडपणा जाणवतो, त्याला ‘रसशेष अजीर्ण’ असे म्हणतात.

चिकित्सा : अजीर्ण चिकित्सेत अतिरिक्त आहाराचे सेवन टाळणे, शिळे व पचण्यास जड असे पदार्थ वर्ज्य करणे, काळजी, मनस्तापादी भावना टाळणे व अन्नासंबंधी सवयी बदलणे या बाबी मूलभूत असून नियमित वेळा सावकाश चावून चावून अन्न खाणे, जेवणानंतर काही वेळ विश्रांती घेणे व जरूर तर हवापालट करणे या बाबींचा यामध्ये चांगला उपयोग होतो.

आयुर्वेदिय चिकित्सेमध्ये आम अजीर्ण असेल तर लंघन, विष्टब्ध अजीर्ण असेल तर स्वेदन आणि विदग्ध अजीर्ण असेल तर वमन हे उपचार सांगितले आहेत. याशिवाय वैद्य व्यक्तीची प्रकृती, अजीर्णाचा प्रकार, वय इत्यादी लक्षात घेऊन चूर्ण, वटी किंवा रसकल्प, घृत, आसव किंवा अरिष्ट अशा प्रकारची औषधे घेण्याचा सल्ला देतात. यामध्ये हिंग्वाष्टक, लवणभास्कर, पंचकोल, अविपत्तिकर ही चूर्णे; संजीवनी, हिंग्वादी, लवंगादी, शंख, रसोन (लसूण), अर्क इत्यादी वटी; अजीर्णकण्टक, अग्नितुण्डी इत्यादी रसकल्प; शंख भस्म; त्र्यूषणादि व चव्यादि घृत; पिप्पल्यासव, कुमार्यासव, अमृतारिष्ट इत्यादी औषधांचा समावेश होतो.

अजीर्णामध्ये आराम मिळण्यासाठी पुढील काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात – आले आणि लिंबाचा रस एकत्र करून चाखल्याने शरीरात पाचक रस वेगाने सक्रिय होतात व अपचनात तत्काळ आराम मिळतो. कोमट पाण्यात लिंबू आणि किंचित सैंधव मीठ मिसळून पिल्याने छातीतील जळजळ थांबते. आल्याचा छोटा तुकडा किंवा त्याचा रस मधासोबत चाटल्यास पचनक्रिया सुधारते आणि मळमळणे थांबते. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोट फुगणे आणि पोटाचे विकार यापासून लगेच आराम मिळतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे आणि थोडा ओवा घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे व त्यानंतर गाळून प्यावे. यामुळे छातीतील जळजळ, पोटातील वायू कमी होतो. जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि खडीसाखर चावून खाल्ल्यास पोटात होणारी जळजळ आणि करपट ढेकर येणे बंद होते. पाव चमचा हिंग एक कप कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोट फुगणे व पोटदुखी यामध्ये आराम मिळतो. कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत सुंठीचे सेवन केल्याने अपचनामुळे होणारे जुलाब आणि मळमळ थांबते. सुंठ आणि जिऱ्याचे चूर्ण मधासोबत चाटल्यास पाचक स्राव सुधारतात. जेवणानंतर ताकात भाजलेली जिरे पावडर, पुदिना आणि सैंधव मीठ टाकून पिणे पचनक्रियेसाठी उत्तम मानले जाते. पुदिना किंवा आल्याचा किंवा जीरे, बडीशेप व ओवा यांचा चहा करून प्यायल्यास अपचनामध्ये त्वरीत लाभ मिळतो.

याशिवाय नियमित चालणे, व्यायाम करणे किंवा योगासने करणे तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करणे (Meditation) यांमुळेही सतत होणाऱ्या अजीर्णाच्या त्रासावर नियंत्रण मिळविता येते.

विशेष दक्षता (काळजी) : घरगुती उपाय करूनही दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ सतत अपचन, चक्कर येणे, तीव्र पोटदुखी किंवा किंवा उलट्या किंवा जुलाब होत असेल तर वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत स्वयंचिकित्सा करून स्वेच्छेने आयुर्वेदिक औषधे घेऊ नयेत. तसेच आयुर्वेदिक औषधांचे दिर्घकाळ सेवन करू नये. विशिष्ट आजारात (उदा., कर्करोग इत्यादी) घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे तसेच गर्भधारणा कालावधीत होणाऱ्या अपचनाच्या त्रासावर केवळ वैद्यांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत. सामान्य वाटणाऱ्या अजीर्ण विकाराचे रूपांतर गंभीर आजारात होऊ नये यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने आहार व जीवनशैली यामध्ये बदल करावा.

संदर्भ :

  • अष्टांग हृदय, सूत्रस्थान, अध्याय ८ (मात्राशितीय अध्याय).
  • चरक संहिता, अध्याय १५ (ग्रहणी दोष चिकित्सा).
  • भैषज्य रत्नावली, अध्याय १० (मंदाग्नि चिकित्सा).
  • https://www.apollo247.com/blog/article/home-remedies-to-deal-with-acidity-problems
  • https://www.easyayurveda.com/remedies-for-indigestion/
  • https://www.healthline.com/health/home-remedies-for-indigestion
  • https://www.manipalhospitals.com/patiala/blog/home-remedies-for-indigestion/

 

समीक्षक : कौस्तुभ चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.