शरीरामध्ये असणाऱ्या आप धातूला सोम असे म्हणतात. सोम म्हणजे पांढरा तसेच सोम म्हणजे चंद्र. चंद्र हे तेजाचे प्रतीक आहे. म्हणूनच ज्या व्याधींमध्ये पांढऱ्या रंगाचा स्त्राव योनीमधून किंवा मूत्रमार्गाने अधिक प्रमाणात स्त्रवतो आणि त्यामुळे शरीर निस्तेज बनते, त्याला सोमरोग म्हणतात.

कारणे : अतिमैथुन, शोक, श्रम, गरदोष (दूषित आहाराचे सेवन; Food poisoning), अतिसार उत्पन्न करणारी कारणे यामुळे शरीरातील वाताचा प्रकोप होऊन तो आपधातूला प्रक्षुब्ध करतो. त्यामुळे आपधातू आपली जागा सोडून मूत्रमार्ग, योनीमार्ग या अधोमार्गातून अतिप्रमाणात बाहेर पडतो. यामुळे शरीराचे तेज कमी होते.

लक्षणे : (१) श्वेतस्त्राव : योनीमार्गातून स्वच्छ, शीत, गंधरहित, वेदनारहित, पाण्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा स्राव बाहेर पडतो. (२) मूत्रातिसार : पांढऱ्या रंगाचे मूत्र जास्त प्रमाणात बाहेर पडते, त्याचा वेग धारण करणेही अशक्य असते. (३) अस्वस्थता वाटते. (४) डोके हलके झाल्यासारखे वाटते. (५) तोंड व टाळा कोरडे पडतात. (६) सारख्या जांभया येतात. (७) मूर्च्छा येते. (८) खाण्यापिण्याचे समाधान लाभत नाही. (९) प्रचंड शारीरिक तसेच मानसिक थकवा येतो. (१०) त्वचा निस्तेज होते.

चिकित्सा : (१) पिकलेली केळी, ताज्या आवळ्याचा रस, मध हे पदार्थ साखर घालून सेवन करावेत. स्त्राव थांबवला जातो. (२) उडीदाचे चूर्ण, जेष्ठमध, भुईकोहळा, मध, साखर हे मिश्रण एकत्र करून ५ ग्रॅम.पर्यंत वैद्यांच्या सल्ल्याने सकाळी दुधासोबत घ्यावे. (३) आवळ्याच्या बिजातील मज्जा मध आणि साखरेसोबत तीन दिवस घ्यावे. (४) नागकेशराचे चूर्ण ताकामध्ये वाटून तीन दिवस घ्यावे व ताकभात खावा. (५) मूत्रातिसार असल्यास वेलदोडा व तालिसपत्र यांचे चूर्ण नवीन मद्याबरोबर सेवन करावे. (६) ताडगोळे किंवा ताडाचे मूळ, खजूर, जेष्ठमध, भुईकोहळा, मध, साखर हे एकत्र करून सेवन करावे. (७) टाकळ्याचे मूळ तांदुळाच्या धुवनामध्ये वाटून ते सकाळी सेवन करावे. सोमरोगाची तुलना श्वेताप्रदराशी केली जाते. कारण याचे वर्णन स्त्रीरोगामध्ये आले आहे. परंतु, काही ग्रंथकार याची मूत्रातिसाराशी तुलना करतात. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार सोमरोगाची तुलना श्वेतप्रदर (leucorrhea) किंवा मधुमेह (Dibetis insipidus) यांच्याशी होऊ शकते.

पहा : गरदोष, श्वेतप्रदर.

संदर्भ :

  • योगरत्नाकर, प्रथमखंड, सोमरोग निदान अध्याय, चौखंबा प्रकाशन.
  • वैद्य निर्मल राजवाडे, कौमारभृत्य तंत्र, काँटिनेंटल प्रकाशन, १९७४.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे