हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि इतर कलांचे शिक्षण देणारी ख्यातनाम संस्था. भारतीय विद्या भवन (भारतीय शैक्षणिक ट्रस्ट) या शिक्षण संस्थेच्या या शिक्षापीठाची स्थापना १९४६ साली थोर भारतीय शिक्षणतज्ज्ञ व समाजकारणी कनैयालाल माणेकलाल मुनशी यांनी ज्येष्ठ संगीतज्ज्ञ श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्या सहकार्याने केली. भारतीय पारंपरिक प्रयोगीय कलांचे (परफॉर्मिंग आर्ट्स) शास्त्रशुद्ध शिक्षण आणि संवर्धन करणे या उद्देशाने या शिक्षापीठाची स्थापना करण्यात आली. आचार्य रातंजनकर हे त्यावेळी लखनौ येथे भातखंडे संगीत विद्यापीठाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षपीठाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि भरीव कार्य केले. त्यांनी अखेरपर्यंत (मृ.१९७४) या पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पश्चात पं. चिदानंद नगरकर (गायक), पं. दिनकर कायकिणी (गायक, संगीत रचनाकार), शशिकला कायकिणी (गायिका), पं. ध्रुव घोष (सारंगीवादक, गायक, रचनाकार) आदी मान्यवरांनी या शिक्षापीठाचे प्रमुखपद कर्तव्यनिष्ठेने सांभाळले. या संस्थेमध्ये काही काळ उस्ताद अल्लारक्खाँ (तबलावादक), मोहम्मदखाँ (रुद्रवीणावादक), पं. एस. सी. आर. भट, पं. के. जी. गिंडे आदी ज्येष्ठ कलाकारांनी विद्यार्थ्यांना गायन-वादनाचे शिक्षण दिले.
या शिक्षापीठामध्ये मुख्यत: हिंदुस्थानी कंठ संगीताचे सारंगी, बासरी, सतार, तबला इत्यादी वाद्य-वादनाचे तसेच कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम् इत्यादी नृत्यांचे शिक्षण दिले जाते. भातखंडे संगीत विद्यापीठाशी हे शिक्षापीठ संलग्न असून त्याद्वारा संगीतविषयक पदवी-पदविका परीक्षाही घेतल्या जातात. सुरुवातीपासून जवळजवळ ५००० विद्यार्थ्यांनी या शिक्षापीठातून संगीत व नृत्याचे शिक्षण प्राप्त केले आहे.
समीक्षक – सु. र. देशपांडे