क्रेब्ज, सर हान्स आडोल्फ : (२५ ऑगस्ट १९०० – २२ नोव्हेंबर १९८१)
जर्मनीत जन्मलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्यांनी सजीवांमध्ये घडणाऱ्या ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड चक्रामध्ये (Tricarboxylic Acid Cycle) होणाऱ्या विविध रासायनिक क्रियेंचा शोध लावला, या शोधाबद्दल त्यांना १९५३ सालाचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयातील नोबेल पारितोषिक फ्रिट्स लिपमान यांच्याबरोबर विभागून मिळाले. ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड चक्राला सायट्रिक ॲसिड चक्र (Citric Acid Cycle) किंवा क्रेब्ज चक्र (Krebs Cycle) असेही म्हणतात.
क्रेब्ज यांचा जन्म हिल्डेशीप, जर्मनी (Hildesheim, Germany) येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण होण्याअगोदर त्यांना पहिल्या जागतिक युद्धासाठी जर्मनीच्या इंपिरियल आर्मीत रुजू व्हावे लागले. जागतिक युद्ध संपताच ते वैद्यकीय शिक्षणासाठी गटिंगेन विद्यापीठात (University of Göttingen) दाखल झाले (१९१८). त्यानंतर ते फ्रायबर्ग (University of Freiburg) विद्यापीठात दाखल झाले (१९१९). तेथे व्हिल्हेल्म फोन मॉलेनडॉर्फ (Wilhelm von Mollendorf) यांच्या मार्गदर्शनाखाली ऊतींवर रंगरोपणाबद्दल (Staining) त्यांनी पहिला शोधनिबंध प्रकाशित केला (१९२३). वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून बर्लिन विद्यापीठात (University of Berlin) रसायनशास्त्र व जीवरसायनशास्त्र यांचा अभ्यास व इस्पितळात रोगनिदानविषयी त्यांनी संशोधन केले (१९२४). पुढे हँबर्ग विद्यापीठाची एम.डी. पदवी मिळवली (१९२५), त्यानंतर ते बर्लिनमधील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट (Kaiser Wilhelm Institute) मध्ये ओटो व्हारबुर्ख (Otto Warburg) यांचे संशोधक मदतनीस म्हणून काम करू लागले (१९२६). पुढील वर्षी फ्रायबर्ग विद्यापीठात कुर्त हान्सलेट (Kurt Hanseleit) या विद्यार्थ्याच्या बरोबर यूरिया उत्पत्तीचे आधारतत्त्व जीवशास्त्रामध्ये चयापचयाच्या मार्गाने कसे होते हे सिद्ध केले, ते ऑर्निथीन चक्र (Ornithine Cycle) नावाने सर्वश्रुत आहे. या शोधामुळे ते विज्ञानक्षेत्रात प्रसिद्ध झाले.
क्रेब्ज यांना दुसऱ्या जागतिक महायुद्धात ज्यू वंशीय असल्यामुळे नोकरी सोडावी लागली. सुदैवाने रॉकफेलर फाउंडेशनच्या साहाय्याने त्यांना सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स (Sir Frederic Gowland Hopkins) यांनी केंब्रिज विद्यापीठात येण्यास आमंत्रित केले, तेथे आपले शोधनिबंध व उपकरणे घेऊन ते हजर झाले. व्हारबुर्ख यांच्या मदतीने तयार केलेले ऑक्सिजन मापनयंत्र त्यांनी ऊतीमध्ये वापरले, हा प्रयोग पुढील संशोधनास उपयुक्त ठरला त्यांनी जीवरसायनशास्त्र शाखेत मार्गदर्शक म्हणून काम केले (१९३४). त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्ड मध्ये त्यांची नेमणूक औषधशास्त्राचे अध्यापक म्हणून झाली (१९३५). त्यांचा संबंध सॉर्बी रिसर्च संस्थेशी (Sorby Research Institute) आला. ते १९४४ साली मेडिकल रिसर्च काउंसिल तर्फे शेफील्ड येथे शोधप्रमुख म्हणून नियुक्त झाले. तेथून ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधविभाग हलवला गेला, तेथे ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९६७पर्यंत कार्यरत होते.
क्रेब्ज यांनी पेशीतील ऊर्जा जीवरसायनातील ज्या क्रियाबदलामुळे निर्माण होते, त्या रासायनिक क्रिया त्यांनी शोधून सिद्ध करून दाखवल्या. त्या क्रिया – यूरिया चक्र (urea cycle) आणि सायट्रिक ॲसिड चक्र नावाने प्रचलित आहेत. सायट्रिक ॲसिड चक्र ऊर्जानिर्मिती साखळीत महत्त्वाचा दुवा आहे. तो क्रेब्ज चक्र (Krebs cycle) म्हणून ओळखला जातो. या शोधामुळे १९५३साली क्रेब्ज यांना नोबेल पारितोषिक मिळाला. त्यांनी हान्स कोर्नबर्ग (Hans Kornberg) यांच्या सोबत पाने, जीवजंतु, बुरशी इ. जैविक गोष्टीत ग्लायऑक्झिलेट चक्रामुळे (Glyoxylate cycle) ऊर्जानिर्मिती होते हा शोध लावला. यूरिया चक्र या शरीरातील चयापचय क्रियेतील पहिल्या चक्राचा शोध क्रेब्ज व हान्सलेट (Henseleit) यांनी १९३२ साली लावला. अमोनिया व कार्बन वायू यांच्या संयोगाने ऑर्निथीनपासून सजीवात सायट्रिक ॲसिड चक्र घडते हे त्यांनी सिद्ध केले. क्रेब्ज व विल्यम जॉन्सन (William Johnson) यांनी शरीरातील शर्करेचे विघटन ऑक्सिजनद्वारे होते आणि त्यातून ऊर्जा उत्पन्न होते ही रासायनिक साखळी उलगडून प्रस्थापित केली. या चक्रात त्यांनी सायट्रिक ॲसिडचे व काही संप्रेरकांचे महत्त्व १९३७ साली सिद्ध केले. त्यांनी १०० वर शोधनिबंध प्रकाशित केले .त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृत्यर्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने एका इमारतीचे नामकरण हान्स क्रेब्ज टॉवर (Hans Krebs Tower) असे केले. तेथे जीवरसायनशास्त्र विभाग आहे. शेफील्ड येथे १९८८ साली क्रेब्ज इन्स्टिट्यूट उभारण्यात आली. जीवरसायन आणि जीवपेशी या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्मृत्यर्थ शिष्यवृत्ती देण्यात येते.
क्रेब्ज यांना २१ विद्यापीठाची डॉक्टरेट लाभली. त्यांना रॉयल मेडल (Royal Medal; 1954), कॉप्ली मेडल (Copley Medal; १९६१) ,गोल्ड मेडल (Gold Medal) (नेदरलॅन्ड), अल्बर्ट लास्कर अॅवार्ड (Albert Lasker Award; 1953) अशा पारितोषकांनी सन्मानित करण्यात आले.
क्रेब्ज यांचे ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Hans-Krebs
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1953/krebs/biographical/
- https://en.wikipedia.org/wiki/Hans_Adolf_Krebs
समीक्षक – सुरेखा नेरुळकर