अर्‍हेनियस, स्वांटे ऑगस्ट (१९ फेब्रुवारी १८५९ २ ऑक्टोबर १९२७).

स्वीडिश भौतिकीविज्ञान रसायनशास्त्रज्ञ. आधुनिक रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक व रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे विजेते (१९०३) असून नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले स्वीडिश आहेत. अऱ्हेनियस समीकरण, आम्लांचा अऱ्हेनियस सिद्धांत, चंद्रावरील अऱ्हेनियस विवर या नावाने त्यांचे संशोधन आजही प्रसिद्ध आहे.

अऱ्हेनियस यांचा जन्म स्वीडनमधील अप्सालानजीकच्या विक या गावी झाला. वयाच्या सतराव्या वर्षी अप्साला विद्यापीठात भौतिकी शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळविला. नंतर त्यांनी एरीक एड्लंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉकहोम येथे शिक्षण घेतले. विद्युत विश्लेष्यातील (जो पदार्थ योग्य अशा द्रवात विरघळविल्यास त्यातून विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या प्रत्यक्ष गमनाद्वारे विजेचा प्रवाह वाहू शकतो अशा पदार्थातील) विद्युत संवाहकतेसंबंधी १५० पानांचा प्रबंध लिहिला, पण त्यांचे मार्गदर्शक पेर क्लेव्ह आणि थॅलंड हे समाधानी नसल्याने त्यांना अप्साला विद्यापीठाची डॉक्टरेट तिसऱ्या श्रेणीत प्राप्त झाली (१८८४). त्यामुळॆ अऱ्हेनियस अप्साला विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरले नाही. अऱ्हेनियस यांचा हा प्रबंध फ्रेंच भाषेत लिहिलेला होता. त्यांनी या प्रबंधाच्या प्रती आपले काम समजावे म्हणून जगभरातील संशोधकांना पाठविल्या. यात याकोबस हेंड्रीकस व्हांट-हॉफ,  व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट, रूडॉल्फ यूलिउस क्लॉसियस, ज्युलिअस थॉमसन आणि लोतार मायर या शास्त्रज्ञांचा समावेश होता. या प्रबंधावर त्यांना मिश्र प्रतिक्रिया मिळाली. यांच्यापैकी वाँट हॉफ आणि ओस्टव्हाल्ट यांची प्रतिक्रिया उल्लेखनीय होत्या. त्यांना भेटण्यासाठी ओस्टव्हाल्ट हे अप्साला विद्यापीठात गेले (१८८४) आणि त्यांच्या रीगा येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्याचे आमंत्रण दिले. वडिलांच्या आजारपणामुळे अऱ्हेनियस तेव्हा रीगाला जाऊ शकले नाहीत, पण नंतर मात्र त्यांनी ही संधी साधली.

अऱ्हेनियस यांना सुप्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली (१८८६-८७) आणि ‘विद्युत विचरण’ याच विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी सुधारित प्रबंध तयार केला (१८८७). पुढे स्टॉकहोम विद्यापीठात ते भौतिकीचे प्राध्यापक झाले (१८९५). आणि ते विद्यापीठाचे कुलमंत्री (रेक्टर) असताना (१८८७१९०२) विद्युत विचरणाच्या ( विश्लेष्याच्या) संवाहकतेविषयी त्यांनी पुष्कळ प्रयोग केले.

अऱ्हेनियस यांच्या मते आम्ल, आम्लारी आणि क्षार जेव्हा पाण्यात विरघळतात तेव्हा त्यांचे विचरण घडून येते आणि विद्युतभारित आयन तयार होतात. उदा. सोडिअम क्लोराईड हा क्षार पाण्यात विरघळल्यावर सोडिअमचे धनभारित आणि क्लोराईडचे ऋणभारित आयन तयार होतात. सर्वसामान्य द्रावणांमध्ये वेगवेगळा विद्युतभार असणे या संकल्पनेला त्यावेळच्या जुन्या रसायनतज्ञ आणि भौतिकतज्ञ यांचा विरोध झाला, पण नवीन पिढीने ही संकल्पना स्वीकारली. विद्युत विचरण ही संकल्पना इलेक्ट्रॉनच्या शोधाला अनुकूल ठरली आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाच रासायनिक सिद्धांतात इलेक्ट्रॉनचा समावेश झाला. या विद्युत विचरणावरील सैद्धांतिक विवेचनाकरिता त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला (१९०३) .

कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये भौतिकी -रसायन पद्धतीने विष व प्रतिविष (विषाचा उतारा) यांच्या विक्रिया कशा होतात यावर त्यांनी व्याख्याने दिली (१९०४). नंतर तीच व्याख्याने इम्यूनो-केमिस्ट्री या नावाने प्रसिद्ध झाली (१९०७). त्यांमध्ये सुधारणा करून व भर घालून ‘काँटिटेटिव्ह लॉज इन बायॉलॉजिकल  केमिस्ट्री’ हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले (१९१५).

१९०० पासून अऱ्हेनियस यांचे ‘नोबेल संस्थे’च्या जडणघडणीत भरीव योगदान आहे. पुढे नोबेल इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली (१९०५) आणि याच पदावरून ते निवृत्त झाले (१९२७). तेथे असतानाच त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने डेव्ही पदकाचा व केमिकल सोसायटीने फॅराडे पदकाचा बहुमान दिला. त्यांच्या काही ग्रंथांची जर्मन व इंग्रजी भाषांत भाषांतरे झालेली आहेत.

अऱ्हेनियस यांचे स्टॉकहोम येथे निधन झाले.

 

संदर्भ:

  1. मराठी  विश्वकोश खंड १
  2. https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1903/arrhenius/biographical/

 

समीक्षक – श्रीराम मनोहर

प्रतिक्रिया व्यक्त करा