गॅबर, डेनिस  (५ जून,१९०० – ९ फेब्रुवारी,१९७९).‍

ब्रिटीश भौतिकीविज्ञ. होलोग्रामचे संशोधक. होलोग्राफी पद्धत शोधून काढल्यामुळे त्यांना १९७१ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

गॅबर यांचा जन्म बुडापेस्ट येथील एका ज्यू कुटुंबात झाला. १९०२ मध्ये या कुटुंबाने आपले गन्सबर्ग  (Gunszberg) या आडनावात बदल करून गॅबर (Gabor) हे आडनाव धारण केले. गॅबर यांनी पहिल्या महायुद्धामध्ये हंगेरियन लष्करात भाग घेतला होता. नंतर त्यांनी बुडापेस्टच्या तंत्रशिक्षण विद्यापीठात अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी बर्लिनच्या टेक्निकल विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी ऋण किरण दोलनदर्शक (कॅथोड बीम ऑसिलोग्राफ)वापरून अत्युच्च दाबाखाली वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन प्रकाशकी या शाखेत गोडी निर्माण झाली. परिणामी त्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी आणि टीव्ही ट्यूब यांत संशोधन केले. शेवटी १९२७ मध्ये ‘रेकॉर्डिंग ऑफ ट्रँझिएट्ंस इन इलेक्ट्रिकल सर्किट्स विथ द कॅथोड रे ऑसिलोग्राफ्स’ (Recording of Transients in Electric Circuits with the Cathode Ray Oscillographs) या विषयासंबंधी पीएच्.डी. करिता प्रबंध लिहून ती पदवी संपादन केली. १९२७–३३ या काळात त्यांनी सिमेन्स कंपनीत संशोधक अभियंता म्हणून काम केले.

इ.स. १९३३ मध्ये गॅबर यांनी जर्मनीतून इंग्लंडमध्ये पलायन केले आणि वॉरविकशायर येथील ब्रिटिश थॉम्सन-ह्यूस्टन कंपनीत काम केले (१९३४–४८). १९४६ मध्ये त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले. तेथेच त्यांनी होलोग्राफी या तंत्राचा शोध लावला. यासाठी त्यांनी पाऱ्याची प्रज्योत हा प्रकाशोद्भव वापरला. १९६० मध्ये लेसरचा शोध लागला. हा प्रकाशझोत सुसंगत (कालसंबद्ध) असल्यामुळे होलोग्राफीसाठी तो फारच उपयोगी ठरला. १९६४ मध्ये पहिला यशस्वी होलोग्राम गॅबर यांनी तयार केला. १९४८ मध्ये गॅबर लंडनच्या इंपिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक झाले. १९५८ मध्ये तेथेच ते उपयोजित भौतिकी (अप्लाइड फिजिक्स) प्राध्यापक झाले. १९६७ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी याच पदाचा कार्यभार सांभाळला.

स्वीडिश रॉयल अॅकॅडेमी या संस्थेने, १९७१ सालचे भौतिकीचे नोबेल पुरस्कार पुढील प्रमाणे जाहीर केले : ‘भौतिकीचे नोबेल पारितोषिक, डॉ. डेनिस गॅबर यांना, होलोग्राफीच्या शोधासाठी देण्यात येत आहे. होलोग्राफी म्हणजे भिंगरहित त्रिमितीय छायाचित्रण (थ्री डायमेन्शनल लेन्सलेस फोटोग्राफी) होय. त्रिमितीत व मूळ रंगात, होलोग्राफी तंत्राने वस्तूची प्रतिमा घेऊन, उद्योगधंदे, वैद्यक, त्रिमितीय नकाशे तयार करण्याचे शास्त्र आणि दूरचित्रवाणीसारखे मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधणारी माध्यमे यांत खूपच प्रगती झाली. म्हणूनच गॅबर यांना या वर्षीचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात येत आहे.’

गॅबर यांनी इन्व्हेटिंग द फ्यूचर (Inventing the Future) हे पुस्तक १९६३ मध्ये लिहिले. त्यामध्ये त्यांनी  आधुनिक जगताला  युध्दे, प्रचंड लोकसंख्या आणि जीवनातले रिकामेपण म्हणजे (Age of Leisure) ही तीन आव्हाने असतील याविषयी चर्चा केली आहे. त्यांनी विविध विषयांवर सु. १०० संशोधनपर निबंध लिहिले.

उत्तरायुष्याचा बव्हंशी काळ त्यांनी इटलीमध्ये रोमच्या लिव्हिनियो भागात व्यतीत केला. तरीपण इंपिरियल महाविद्यालय आणि अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील स्टॅम्फर्ड येथील सीबीएस लॅबोरेटरीज यांमधील त्यांनी संशोधकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य चालूच ठेवले.

गॅबर यांची १९५६ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य आणि १९६४ मध्ये हंगेरियन सायन्स अॅकॅडेमीचे सदस्य म्हणून निवड झाली. १९६८ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे रम्फर्ड (Rumford) पदक मिळाले. १९७० मध्ये त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) हा सन्मान मिळाला.

लेसर आणि होलोग्राफी तंत्रात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे, गॅबर यांना भरपूर यश आणि जागतिक मान्यता मिळाली.

गॅबर यांचे निधन लंडनच्या साउथ केनसिंगटन, लंडन येथे झाले.

 

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Dennis_Gabor
  • https://www.nobelprize.org/prizes/physics/1971/gabor/biographical/

प्रतिक्रिया व्यक्त करा