ओझोन हा वायू पृथ्वीवरील वातावरणातील एक नैसर्गिक घटक आहे. पृथ्वीपासून सु. ५० किलोमीटर उंचीवर (मेसोस्फिअर-आयनोस्फिअर ) येथे असलेले ओझोनचे दाट थर पृथ्वीवरील (ट्रोपोस्फिअर) जीवसृष्टीचे अतिनील (जंबुपार) किरणांपासून रक्षण करतात. मात्र कारखाने, दळणवळणाची वाहने इत्यादींमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषक नायट्रोजन डाय-ऑक्साइड वायूचा सूर्यकिरणांच्या ऊर्जेशी संयोग होऊन शहरांच्या वातावरणात ओझोनची निर्मिती होते. हीच प्रक्रिया उलट दिशेनेही होऊ शकते, परंतु हवेतील इतर घटकांच्या  नायट्रोजन ऑक्साइडशी प्रक्रिया  होतात  आणि ओझोन वातावरणात साचून राहतो. खनिज तेल वापरून धावणाऱ्या वाहनातून बाहेर पडणारी नायट्रोजनची ऑक्साइडे आणि  मिथेन यांवर सूर्याच्या अतिनील (>380 नॅनोमीटर)  लहरींचा परिणाम होऊन तयार होणाऱ्या ओझोनवर बरेच संशोधन झाले आहे आणि चालू आहे.

\ce{NO_2 + O_2 {\underset{\rightleftarrows {\solar energy}}} NO + O_3}

 हा ओझोन सर्व जीवसृष्टीस धोकादायक ठरतो. मानवासह प्राणी, वनस्पती, कृषि-उत्पादने यांवर ओझोनचे होणारे अनिष्ट परिणाम अभ्यासण्यात आले आहेत.

ओझोनामुळे वालाच्या पानांवर झालेला परिणाम.
ओझोनामुळे तंबाखूच्या पानांवर  होणारा परिणाम.

साधारणपणे हवेत दशकोटी भागामध्ये १-२ भाग  (1-2 pphm) ओझोन असतो. शहरी वातावरणात  ५ भागापर्यंत पोहोचला तरी तो वनस्पतींना विषारी ठरू शकतो. खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांची दाटी असलेल्या शहरात हवेच्या दशकोटी भागात १०० भाग इतके तीव्र प्रमाण नोंदले गेले आहे. जमिनीजवळील ओझोनचा जमीन, वनस्पती, इतर वायू इत्यादींबरोबर संयोग होऊन हवेतील त्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.

वनस्पतींच्या सान्निध्यात येणारा ओझोन पानांवरील रंध्रांच्या रक्षक पेशींवर प्रथम परिणाम करतो. पेशींच्या भित्तींना क्षते पडून पेशींमधील पाणी बाहेर निसटते आणि रक्षक पेशी मलूल पडून रंध्रे बंद होतात. बंद रंध्रांमुळे पानांच्या अंतर्भागाचे  रक्षण मात्र व्हावे तसे होत नाही. पानांच्या आतील पेशींच्या भित्ती पोखरल्या जाऊन पाणी पेशीबाहेर पडते, पेशी कोसळतात व पेशींतील हरितद्रव्याचा नाश होतो. पानांवर पिवळे-पांढरे ठिपके वा चट्टे दिसू लागतात.

निरनिराळ्या वनस्पतींच्या पानांवरील ओझोनाचे दुष्परिणाम (प्रयोगशाळेतील संशोधन).

पेशीवरचा दुष्परिणाम दिसून येण्याआधी वनस्पतींच्या चयापचय क्रियेत बरेच परिणाम झालेले असतात. पेशींचे पापुद्रे विरघळणे, पेशींतील मायटोकॉन्ड्रियासारख्या सूक्ष्म अवयवांचा नाश होणे, विकर क्रियात बिघाड झाल्यामुळे कर्बोदके आणि प्रथिने यांची निर्मिती बंद पडणे, हरितद्रव्य आणि मायटोकॉन्ड्रिया यांचे पापुद्रे जळून जाणे, प्रकाश संश्लेषण बंद पडणे आणि श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणे असे अनेक परिणाम झालेले असतात.

पर्यावरणातील इतर घटकांचा ओझोनच्या परिणामांमध्ये सहभाग असू शकतो. उद्योग क्षेत्रे व शहरे अशा ठिकाणी हवेत अनेक प्रदूषके एकाच वेळी असू शकतात. ओझोन आणि सल्फर डाय-ऑक्साइड या मिश्रणाचा मोठा परिणाम वनस्पतींवर आढळून येतो.

ओझोनचा कृषि-उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्यामुळे, प्रामुख्याने अन्नधान्य पुरवणाऱ्या वनस्पतींवर बरेच संशोधन झाले आहे. गहू, राय, जव, वाल, मुळा, मका, टोमॅटो, लसूणघास, तंबाखू  ( विशेषतः बेल डब्ल्यू थ्री हा वाण)  इत्यादी वनस्पती प्रकार ओझोनला अति-संवेदनशील आहेत, तर कापूस, काकडी, बीट वगैरे त्यामानाने  सहनशील आढळले आहेत.

संदर्भ :

  • Rishards, B.L.; Middleton, J.T.;  Hewitt, W.B. Air pollution with relatin to agronomic crops, V. Oxidant stipple of grape. Agron.J. 50:561, 1958. 1958.
  • Hill, A.C.; Littlefield, N. Ozone Effect on apparent photosynthesis, rate of transpiration and stomatal closure in plants.  Env. Sci. Tech. 3 : 52-56, 1969.
  • Treshow, M. Environment and Plant Response. McGraw-Hill. Publications in the Agricultural Sciences. New York, 1970.
  • अग्रवाल, शशी भूषण और चौधरी, निवेदिता. ओझोन प्रदूषण : वनस्पतियो एवं मानव स्वास्थ्य पर प्रभाव, काशी हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी, २०१४.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा