कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार. उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे प्रतिशब्द आहेत. त्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका आणि हिंदीत पहेली असेही म्हणतात. कोडे किंवा कूटप्रश्न हा उखाण्याचा आणखी एक अर्थ आहे. महाराष्ट्रातील वारली आणि आगरी जमातीत उखाण्यांना कलंगुडे असे म्हणतात. मध्यभारतातील छोटानागपूर प्रदेशातील खारियात उखाण्यांसाठी बुझबुझावली असा शब्द प्रचलित असल्याचे दुर्गा भागवतांनी नमूद केले आहे. कर्नाटक राज्यांमध्ये उखाण्यासाठी ओडकथू , ओडगते तसेच आंध्रप्रदेशात विडीकथ हे शब्द प्रचलित आहेत. यावरून उखाण्यांचे स्वरूप हे कथनात्म असल्याचेही लक्षात येते.

घरातील वयस्कर सदस्य लहानमुलांना अनेकदा कोड्यातून प्रश्न विचारतात. एखाद्या वस्तूचे बाह्यवर्णन हे रंगात्मक, प्रतीकात्मक आणि खुणदर्शक पद्धतीने करून संबधित वस्तू कोणती? असे कोडे विचारणे ही बाब जास्त प्रचलित आहे. लहानमुलांच्या विचारशक्तीला चालना मिळावी या हेतूने हे उखाणे विचारले जातात. टोमणे वजा प्रश्नोत्तरातूनही उखाणे विचारले जातात. फुगडी, झिम्मा, झोके तसेच महिला विषयक खेळांमध्ये या उखाण्यांचा वापर होतो. उदा.,

तुझ्या घरी माझ्या घरी आहे बिंदली सरी

फुगडी खेळताना बाई नको तालेवारी

नाव घेण्याचा उखाणा महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव उच्चारल्याने त्याचे आयुष्य कमी होते ही लोकसमजूत समाजमनात रूढ आहे. पती-पत्नी परस्परांना नावाने हाक मारीत नाही. परंतु सण-उत्सव, विधीप्रसंगी पती-पत्नींनी परस्परांचे नाव घ्यावे असा संकेत आहे. महाराष्ट्रात लग्न, डोहाळ जेवण, बारसे, हळदीकुंकू अशा प्रसंगी नावाचे उखाणे घेतले जातात. हे उखाणे काव्यात्म पदबंधातून व्यक्त होतात. या काव्यात्म पदबंधामध्ये दोन यमकबद्ध चरण असतात. दुसऱ्या चरणात पूर्वार्धात नवऱ्याचे नाव घेऊन वेगळ्या अर्थाचे पद घेऊन उखाणा पूर्ण केला जातो. उदा.,

यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवितो पावा,

…….रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा.

यांशिवाय कुटुंबातील विविध नात्यांमध्ये म्हणजे नणंद -भावजय, दीर -भावजय, व्याही-विहीण यांमध्ये थट्टामस्करी व्हावी, त्यातून नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उखाणे घेतले जातात. हे उखाणे दीर्घ असतात. ग्रामीण भागात विहिणी विहिणी एकमेकींना अश्लील उखाणेही घालतात. उदा.,

मांडवाच्या दारी गं पडलं टिपरं

……विहिणीला पोर झालं झिपरं

ईवाय म्हणतो पोर कां हो झिपरं ?

असुंद्या दादा रात्री निजाया गेली होती

तेव्हा नवऱ्या आलं फेफरं

तेव्हा पोर झालं झिपरं .

सर्वसाधारणतः उखाण्यांची भाषा खेळकर व चटकदार असते. प्राचीन काळापासून लोकसंस्कृती मध्ये रूढ असणारी उखाण्यांची परंपरा आजही समाजजीवनात प्रचलित आहे. उखाण्यांमध्ये वापरले जाणारे काव्यबंध, प्रतिमा तसेच कथनरूपे याबाबीतही समकालीन संदर्भ रुजू लागले आहेत.

संदर्भ :

  • मांडे, प्रभाकर,मौखिक वाङ्मयाची परंपरा ,स्वरूप आणि भवितव्य, गोदावरी प्रकाशन, औरंगाबाद, २०१०.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा