लोकजीवनाचा एक भाग. शब्दकोशातील अर्थानुसार उत्सव म्हणजे ‘‘आनंद, आल्हाद, उत्साह’’. आनंदाचा दिवस, समारंभ, सण आदी. नियताल्हादजनक व्यापार (निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार म्हणजे उद्योग तोच उत्सव होय). ‘मह उद्धव उत्सव :’ असे पर्यायी शब्द अमरकोशात दिले आहेत. उत्सवामध्ये सांस्कृतिक मूल्ये जपली जातात. ‘‘उत्सव म्हणजे सामुदायिक पूजा’’ आदिशक्तींच्या प्रतिवर्षाती सर्वच उत्सवांना समाजोत्सवाचे म्हणजेच सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. या लोकोत्सवात देवी माहात्म्याचा गौरव,तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. आदिशक्तींच्या उत्सवांचे विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट कालखंड ठरलेले असतात. लोकपरंपरा आणि स्थानिक लोकाचार यानुसारही काही उत्सव संपन्न होताना दिसतात. नित्य-नैमित्तिक उत्सव अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी संपन्न होत असतात.
देवदेवतांचे उत्सव, जत्रा हा भारतीयांच्या लोकजीवनाचा एक भाग आहे. सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या सर्व लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, ऐकण्याची आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हे प्रधान कार्य उत्सवाचे असल्याचे दिसून येते. देवदेवता, त्यांच्या उपासनांचे विधिविधान, कुलधर्म-कुलाचार, सण-व्रत-उत्सव, यात्रा-जत्रा, संस्कारविधी, कला-क्रीडा, साहित्य, कौटुंबिक व सामाजिक संबंधाविषयीचे संकेत इत्यादी सर्व बाबींत धर्मसंकल्पनांचे प्राबल्य आढळते. विश्वात दिव्य, अद्भुत अशा काही शक्ती असून त्या जशी संकटे आणतात, तसेच त्यांचे निवारण करतात. ह्या समजूतीने देव, असुर, पितर आदींच्या प्रीत्यर्थ सण व उत्सव साजरे केले जातात. सण-उत्सवातून संस्कृतीचे, सामाजिक एकतेचे दर्शन होते. मानवी जीवन हे कष्टमय आणि दुःखमय असते. या चिंता-व्याधीतून बाजूला काढून शरीराला विश्रांती व आनंद देण्याचे आणि सामाजिक सुखाचा अनुभव घडविण्याचे कार्य उत्सव करतात.
ग्रामस्थ,पंचक्रोशीतील भाविक,कुलदेवतेचे उपासक अशा अगणित भक्तगणांच्या सहकार्याने आदिशक्तींचा उत्सव साजरा होत असतो. उत्सव कालावधीत पार पाडणाऱ्या कार्यक्रमांना प्रचंड लोकसमूह उपस्थित असतो. कथा, कीर्तने/प्रवचने इत्यादी कार्यक्रमातून, लोकांचे मनोरंजन, लोकशिक्षण, प्रबोधन होते. धार्मिक ग्रंथपठणाने अनेकांना मानसिक, आत्मिक शांती आणि मनःशुद्धी लाभते. मानवाच्या सामाजिक जीवनाचा विकास उत्सव समारंभाच्या द्वारेच होत असतो. त्याच्या कलात्मक प्रवृत्तीला उत्सवप्रसंगी आविष्काराची संधी मिळते. सण-लोकोत्सावातून आपली लोकसंस्कृती दृगोचर होते. उत्सव जीवनातील दैन्य, दुःखे तेवढ्या काळापुरते तरी विसरायला लावून माणसात नवी जोम निर्माण करतात. कृषिप्रधान भारत देशात निसर्गाशी नाते सांगणारा ग्रामीण समाज सण-उत्सवांमध्ये विशेष रस घेतो; तो कर्ज काढून उत्सवात भाग घेतो; सण साजरे करतो. आपले सण,पंचाग हे निसर्गाशी एकरुप झालेले आहेत. निसर्गात होणारे परिवर्तन उत्सवाच्या स्वरूपात साजरे करणे हीच भारतीयत्वाची खरी ओळख आहे.