सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद. हे प्राचीन उपनिषदांपैकी एक असून जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणाचा हा एक भाग आहे. याचा प्रारंभ ‘केन’ या प्रश्नार्थक सर्वनामाने होत असल्याने या उपनिषदाला केन असे नाव आहे. हे उपनिषद तलवकार ब्राह्मणाचा नववा अध्याय आहे. याला ‘तलवकार’ किंवा ‘ब्राह्मणोपनिषद’ अशीही नावे आहेत.

या उपनिषदाचा काल व कर्ता यांसंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही; परंतु गीतेतील एका वचनावरून केनोपनिषद हे गीतेच्या पूर्वीचे असावे, असे दिसते.

केनोपनिषदाचे एकूण चार खंड असून पहिले दोन पद्यात्मक व पुढील दोन गद्यात्मक आहेत. या उपनिषदाच्या प्रारंभीच्या श्लोकात शिष्याने गुरूला पुढील चार प्रश्न विचारले आहेत.

१. मनाला प्रेरणा कोण देतो?

२. कोणाच्या प्रेरणेने प्राण कार्य करतो?

३. कोणाच्या प्रेरणेने वाणी कार्य करते?

४. डोळे व कान यांना आपापल्या कार्यासाठी कोण नियुक्त करतो?

गुरूने या प्रश्नांचे उत्तर दिले ते असे — वाणी, चक्षु, मन, श्रोत्र, प्राण यांना परब्रह्म प्रेरणा देते. दुसर्‍या खंडात ब्रह्मज्ञान आणि त्याचे फल सांगितले आहे. परस्परविरोधी शब्दांची योजना करून ब्रह्मज्ञानप्राप्ती जाणण्याची जणू खूणच या खंडात सांगितली आहे. या संदर्भात या उपनिषदातील प्रसिद्ध वचन म्हणजे

“यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः।” (२.३)

अर्थ : ज्याला वाटते मी ब्रह्म जाणले नाही, त्याने ते जाणलेले असते आणि ज्याला वाटते मी ब्रह्म जाणले, त्याने ते जाणलेले नसते. ब्रह्मज्ञानी मनुष्याला अमृतत्व प्राप्त होते, असे ब्रह्मज्ञानाचे फळ यात सांगितले आहे.

तिसर्‍या व चौथ्या खंडांत इंद्र आणि उमा हैमवतीची कथा आहे. ब्रह्माच्या शक्तीमुळे असुरांबरोबरच्या युद्धात देवांना विजय प्राप्त झाला; परंतु हा विजय स्वसामर्थ्यामुळे मिळाला असा देवांना गर्व झाला. देवांचा गर्व नष्ट करण्यासाठी ब्रह्म देवांपुढे प्रकट झाले (या उपनिषदात ब्रह्माला ‘यक्ष’ असे संबोधले आहे), परंतु देव ते ओळखू शकले नाहीत. अखेरीस इंद्रापुढे देवी उमा हैमवती प्रकट झाली. प्रकट झाले ते ब्रह्म असून देवांना ब्रह्मामुळेच विजय मिळाला, असे तिने सांगितले. जे नम्र आहेत त्यांनाच ब्रह्मज्ञान प्राप्त होईल हेच या कथेचे तात्पर्य आहे. तप, इंद्रियदमन, कर्म, वेद-वेदांगे आणि सत्य हे ब्रह्म जाणण्याचे आधार अर्थात साधने आहेत असेही केनोपनिषदात सांगितले आहे.

ब्रह्मस्वरूपवर्णन आणि ब्रह्मज्ञानमहत्त्व हे या उपनिषदाचे मुख्य विषय आहेत.

संदर्भ :

  • Ranade, R. D. A Constructive Survey of UpanishadicPhilosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २०१५.
  • सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, म. म. उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

प्रतिक्रिया व्यक्त करा