दॉसे, झां (१९ ऑक्टोबर १९१६ – ६ जून २००९).
फ्रेंच रक्तशास्त्रज्ञ/रुधिरशास्त्रज्ञ (हीमॅटोलॉजिस्ट) आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ (इम्युनोजलॉजिस्ट). दॉसे यांना १९८० सालचा वैद्यक वा शरीरक्रियाशास्त्राचा नोबेल पुरस्कार बारूज बेनासेराफ आणि जॉर्ज डेव्हिस स्नेल यांच्यासमवेत प्रधान परस्परपूरक संबंध/अनुरूप प्रतिजन बनविणाऱ्या जनुकांचा शोध आणि त्यांचे वर्णन याकरिता मिळाला. देण्यात आला. दॉसे यांनी लाल पेशींपासून प्लाझ्मा वेगळा करण्याचे तंत्र विकसित केले. तसेच त्यांनी पांढऱ्या पेशींचे प्रसमूहन करणारा पदार्थ आणि पांढऱ्या पेशींविरुद्ध आयसो-प्रतिपिंड (iso-antibodies) शोधून काढले.
दॉसे यांचा जन्म तूलूझ, फ्रांस येथे झाला. यांनी गणित विषयात शाळेच्या शेवटच्या वर्गाचे शिक्षण घेतल्यानंतर जीन दॉसे यांच्या वडलांनी त्यांना पॅरिस विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याबद्दल समाजावले. पुढे दॉसे ह्यांची सैन्यात भरती झाली आणि त्यांना उत्तर इटली, आफ्रिका, मोरोक्को व ट्युनिशियात पाठविले गेले. जखमी सैनिकांना रक्तदेण्याचे काम करताना त्यांचा प्रथम रक्तशास्त्राशी (हीमॅटॉलॉजी) संबंध आला. नंतर युद्ध संपल्यावर दॉसे पॅरिसला परत आले (१९४४) व सेंट अँटनी रुग्णालयामध्ये प्रादेशिक रक्त पेढी केंद्रामध्ये त्यांनी काम केले.
वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर (१९४५) दॉसे ह्यांनी बॉस्टन येथील लहान मुलांच्या रुग्णालयामध्ये उमेदवारी करत असताना संशोधनाला सुरुवात केली. पुढे ते उच्च शिक्षणासाठी हार्व्हर्ड विद्यापीठात दाखल झाले आणि तेथून फ्रांसला परत आल्यावर नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटर येथे प्रयोगशाळा संचालक यापदावर काम करू लागले. १९५८ ते १९७७ पर्यंत त्यांनी संशोधन, तसेचे पॅरिस विद्यापीठात शिकविण्याचे काम केले. पुढे १९७८ ते १९८७ पर्यंत कॉलेज ऑफ फ्रांस (College of France; Collège de France) येथे प्रयोगात्मक वैद्यक या विभागात प्राध्यापक होते. त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला तो अपूर्ण प्रतिपिंड शोधण्याच्या त्यांच्या नवीन आणि अधिक संवेदनशील पद्धतीवर आधारित होता. पुढे त्यांनी रक्तशास्त्रामध्ये अधिक संशोधन केले. ज्या रुग्णांना पूर्ण रक्त दिलेले चालत नाही, त्यांच्याकरिता नुसता प्लाझ्मा देण्याकरिता त्यांनी लाल पेशींपासून प्लाझ्मा वेगळा करण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी फ्रान्समध्ये रक्तदोषाच्या अशक्तपणावर (हीमोलिटिक अॅनिमिया) संशोधन केले. हे संशोधन करत असताना पांढऱ्या पेशींचे प्रसमूहन करणारा पदार्थ त्यांनी शोधून काढला. त्यांनी पांढऱ्या पेशींविरुद्ध आयसो-प्रतिपिंड शोधले. [विशिष्ठ व्यक्तीसमुहांच्या पांढऱ्या पेशींवर विशिष्ट प्रकारची प्रतिजन (अँटीजन्स) असतात. त्यांच्या विरुद्ध विशिष्ट प्रतिपिंडे तयार केली जातात. त्याला आयसो–प्रतिपिंडे असे म्हणतात]. त्यांनी अशा आयसो–प्रतिपिंडांबद्दल शोधनिबंध प्रकाशित केले.
दॉसे यांनी पांढऱ्या पेशींचे प्रसमूहन (ॲग्ल्यूटीनेशन, agglutination) व त्वचारोपणाची सहिष्णुता (टॉलरन्स) यांच्यातील सहसंबंध आणि प्रतिजनाचा पेशी परस्परपूरक संबंधांवर (हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी) होणारे परिणाम याविषयी लिहिले. त्यांचा पुढचा शोधनिबंध प्रकाशित झाला जेंव्हा त्यांनी पांढऱ्या पेशींवरील प्रतिजनमधील सहत्वता/अनुरूपता (कॉम्पॅटिबिलिटी) आणि त्वचारोपणाला प्रतिपिंड तयार होणे यातील संबंध स्पष्ट दाखवून दिला. नंतर दॉसे यांनी डझनभर शोधनिबंध ह्या विषयावर प्रकाशित केले. दॉसे ह्यांनी पांढऱ्या पेशींवरील सर्व प्रतिजन हे Hu-1 या संमिश्राचा भाग असते असे पुढे सांगितले. या संमिश्राला प्रधान परस्परपूरक संबंध/अनुरूप संमिश्र (मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स – Major Histocompatibility complex, MHC) असे संबोधले गेले. दॉसे ह्यांनी Hu-1 प्रतिजनच्या इंजेक्शनचा त्वचारोपण नाकारण्याचा परिणाम दाखवून दिला. Hu-1 प्रतिजनाला ‘प्रतिरोपण प्रतिजन’ असे संबोधले गेले आणि त्यांचा त्वचारोपणावर परिणाम होतो हे दाखविले. प्रधान परस्परपूरक संबंध/अनुरूप संमिश्रला नंतर HLA (Human Leucocytes Antigen)संबोधले गेले. त्याच्या जनुकीय प्रसाराच्या अभ्यासात दॉसे ह्यांचे प्रमुख योगदान होते. ह्या सर्व कामगिरीबद्दल जीन डोसेट ह्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दिला (१९८०).
दॉसे ह्यांनी नोबेल पुरस्काराचे पैसे व फ्रेंच टेलिव्हिजनने केलेली मदत यातून ह्यूमन पॉलिमॉर्फिझम स्टडी सेंटर- सीईपीएच (Human Polymorphism Study Center अर्थात Centre D’étude du Polymorphisme Humain-CEPH) ची स्थापना केली. ह्या संस्थेचे नाव पुढे त्यांच्या सन्मानार्थ फाऊंडेशन झां दॉसे -सीईपीएच (Foundation Jean Dausset-CEPH) असे ठेवण्यात आले. दॉसे CEPH- सीईपीएच चे अध्यक्ष बनले. CEPH- सीईपीएच सिस्टिमने आंतरराष्ट्रीय मानवीय जनुकांचा अभ्यास करणाऱ्या केंद्राना डीएनए च्या ६१ मोठ्या गटांची माहिती दिली. CEPH- सीईपीएच ही विनाफायदा तत्त्वावर काम करणारी संस्था असून फ्रेंच सरकारची त्यांना मदत मिळते.
युद्धानंतर दॉसे यांच्या लक्षात आले की रुग्णालयांची दुरावस्था झालेली आहे. त्यांनी डॉक्टर्सचा एक गट तयार केला. त्यांनी फ्रेंच वैद्यकीय सेवासुधारायचे ठरविले. दॉसे यांच्या क्रियाशील भूमिकेमुळे त्यांना नॅशनल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे सल्लागार बनविले गेले. त्यांनी प्राध्यापक रॉबर्ट डेबरे यांच्याबरोबर वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी समिती बनविली. फ्रान्समध्ये प्रथमच विद्यापीठांबरोबर रुग्णालये संलग्न केली गेली आणि डॉक्टर्सना वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वर्ग घ्यावे लागले. ह्या बदलांमुळे फक्त विद्यापीठात नाही तर रुग्णालयांमध्ये संशोधन सुरू झाले. आणि डॉक्टरांमध्ये पूर्णवेळ कामाची कल्पना स्थापित झाली.
दॉसे हे फ्रेंच सायन्स अकादमीचे सभासद होते. ते फ्रान्समधील महाविद्यालयात प्राध्यापकही होते. तसेचे ते अमेरिकेच्या सायन्स अकादमीचे प्रभावी परदेशी सभासद होते. ह्यूमन जीनोम ऑर्गनायझेशनचे (Human Genome Organization) ते सह-अध्यक्ष होते. दॉसे ह्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यात लँडस्टाइनर पुरस्कार, कॊच आणि वोल्फ फाऊंडेशनचे पारितोषिक इत्यादींचा समावेश आहे. दॉसे यांचे आत्मचरित्र ए विंक ॲट लाइफ या नावाने (Clin d’oeil à la vie )१९९८ मध्ये प्रकाशित करण्यात आले. दॉसे हे बऱ्याचशा संशोधन संस्थाच्या सल्लागारमंडळांवर होते.
दॉसे यांचे पाल्मा (माजॉर्का, स्पेन) येथे निधन झाले.
संदर्भ :
- Jean Dausset, From Wikipedia, The Free Encyclopedia, https://en.wikipedia.org/wiki/Jean_Dausset
- Jean Dausset – Biographical – Nobelprize.org, https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1980/dausset-bio.html
- Jean Dausset, Facts, https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1980/dausset-facts.html
- The Nobel Prize in Physiology or Medicine 1980, https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1980/
- Jean Dausset, The American Association of Immunologists, http://www.aai.org/about/History/Notable_MembersNobel/Dausset_Jean.html
- https://www.britannica.com/biography/Jean-Dausset
समीक्षक – रंजन गर्गे