होग्लंड, मलोन बुश  (५ ऑक्टोबर १९२़१ – १८ सप्टेंबर २००९).

अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होग्लंड यांनी टी-आरएनएचा (t-RNA) शोध लावला. ते अनुवांशिक संकेताचा (कोडचा) भाषांतरकार आहे. त्यांनी टी-आरएनएचा (t-RNA) अभ्यास केला व प्रथिने तयार करण्यातली  टी-आरएनए ची  भूमिका शोधून काढली.

होग्लंड यांचा जन्म बॉस्टन, मॅसॅचूसेट्स येथे झाला. त्यांनी राऊंड हिल स्कूलमधून पदवी घेतली (१९४०). त्यांनी हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमधून बालरोग तज्ञ डॉक्टर व्हायच्या हेतूने एम.डी. पदवी प्राप्त केली (१९४८). क्षयाचा संसर्ग झाल्याने त्यांना आपल्या  व्यवसायाचा  मार्ग  बदलावावा  लागला  व  त्यांनी  संशोधनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.

होग्लंड यांनी मॅसॅचूसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये पॉल झॅमकनीक यांच्या प्रयोगशाळेत संशोधनाकरिता स्थान मिळविले. त्या ठिकाणी त्यांनी टी-आरएनएचा अभ्यास केला व प्रथिने तयार करण्यातली टी-आरएनएची भूमिका शोधून काढली.  होग्लंड यांनी हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये सहयोगी प्राध्यापकाचे काम  केले(१९५३-६७). हार्व्हर्ड सोडल्यानंतर डार्टमाऊथ मेडिकल स्कूलमध्ये त्यांची जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१९६७). पुढे १९७० साली वर्सेस्टर फाउंडेशन नावाच्या प्रायोगिक जीवशास्त्राच्या संस्थेत होग्लंड हे वैज्ञानिक संचालक झाले.

हटिंग्टन  प्रयोगशाळेत  होग्लंड  जेंव्हा  जायला  लागले  तोपर्यंत  त्यांचे  तिथले  सहकारी  प्रथिनांच्या संश्लेषणावरील कामासाठी प्रसिद्ध होते. होग्लंड आणि त्यांचे सहकारी यांनी अमिनो अम्लाच्या  शृंखलेचे (पॉलीपेप्टाइडचे) संश्लेषण रिबोसोमवर होते, हे दाखवून दिले होते (१९५०). त्यांनी उंदरांना किरणोत्सारी (रेडिओ अॅक्टिव्ह) अमिनो अम्लांची इंजेक्शने दिली. त्यानंतर काही वेळांनी त्या उंदरांचे  यकृत बाहेर काढले व यकृताच्या पेशींमध्ये किराणोत्सारिता (रेडिओ अॅक्टिव्हिटी) तपासली. त्यांच्या असे  लक्षात आले की, काही तास किंवा दिवसानंतर किराणोत्सारिता असलेली प्रथिने सर्वभागात होती. जर थोडा वेळ जाऊ दिला तर किराणोत्सारिता काही कणांमध्येच असायची. त्यांनी हे कण प्रथिने तयार करण्याच्या जागा आहेत असे अनुमान काढले. ह्या कणांना त्यांनी रिबोसोम असे नाव दिले. उंदरांच्या यकृताच्या पेशींवरील प्रयोगात होग्लंड आणि झॅमकनीक यांच्या असे लक्षात आले  की,  ATP च्या संपर्कात, अमिनो अम्ल उष्ण्‍ विद्राव्य आरएनए सोबत असतात. उष्णता विद्राव्य आरएनएला त्यांनी ट्रान्सफर-आरएनए (टी-आरएनए) असे नाव दिले. या अमिनो अम्ल व टी-आरएनए यांच्या संयुक्ताला पुढे अमिनोआसायल- टीआरएनए  असे संबोधले गेले. होग्लंड यांचे या प्रयोगशाळेला प्रमुख योगदान म्हणजे अमिनो अम्ल सक्रिय करणाऱ्या वितंचकांवरील काम. त्यांनी असे दाखवून दिले की, काही वितंचक अमिनो अम्ल सक्रिय करून टी-आरएनएला जोडले जाण्यासाठी आवश्यक असतात. त्यानंतरच ते नवीन प्रथिनात सामील होतात. ह्या वितंचकांना अमिनोआसायलटी-आरएनए सिंथेटेज असे नाव दिले गेले. टी-आरएनएच्या शोधामुळे वॉटसन आणि क्रिक यांनी सुचविलेल्या रेण्वीय जीवशास्त्राच्या संयुक्ताच्या (कॉम्प्लीमेंटॅरीटी) सिद्धांताला पाठबळ मिळाले. होग्लंड यांच्या इतर संशोधनात बेरिलिमचा कर्करोगजन्य परिणाम (कर्करोग होण्याचे कारण), को-एन्झाईम-ए चे संश्लेषण, यकृताचे पुनर्निर्माण व नियंत्रण या गोष्टींचा समावेश होतो.

विज्ञानाच्या प्रगतीसाठी संशोधनाएवढेच अध्यापनाचे महत्त्व आहे, असे होग्लंड यांना वाटायचे. याकरिता त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात लोकांना जीवशास्त्र समाजवण्याकरिता चार पुस्तके लिहिली. तसेच वैद्यक शास्त्राच्या प्रगतीसाठी  मूलभूत संशोधनाला आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. याकरिता त्यांनी निवृत्तीनंतर बर्ट डोडसन या कलाकारांसोबत वैज्ञानिक शोध व रंग वापरून द वे लाईफ वर्क हे पुस्तक लिहिले. त्याला अमेरिकन वैद्यकीय लेखनाचे पारितोषिक मिळाले. त्यापाठोपाठचे पुस्तक एक्सप्लोरिंग द वे लाईफ वर्कस  हे  होते. होग्लंड यांना फ्रँकलिन पदकाने सन्मानित करण्यात आले (१९७६).

होग्लंड यांचे टेटफोर्ड, व्हरमाँट येथे निधन झाले.

 

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा