क्लार्क, सर सिरिल ॲस्टली : (२२ ऑगस्ट १९०७ — २१ नोव्हेंबर २०००).

ब्रिटीश वैद्यक, जनुकशास्त्रज्ञ आणि पतंग व फुलपाखरे यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. त्यांनी ‘ऱ्हीसस लोहिताविलयी विकार‘ (ऱ्हीसस हीमोलेटिक डिसीज; Rhesus Haemolytic Disease; RHD) किंवा यलो बेबी (Yellow Baby) या विकारावर प्रभावी लस विकसीत करण्यास मदत केली.तसेच त्यांनी पतंगामध्ये जनुकीय उत्परीवर्तन केले.  त्यांचे संशोधन नैसर्गिक निवडीच्या उत्क्रांती सिद्धांताचे समर्थन करते.

क्लार्क यांचा जन्म इंग्लंडमधील लेस्टर (Leicester) शहरातील एका वैद्यकीय कुटुंबात झाला. लेस्टर विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांच्या वडिलांची प्रमुख भूमिका होती, तर ते पर्सी जी (Percy Gee) यांचे पुतणे होते. वायग्स्टन ग्रामर स्कूल फॉर बॉईज (Wyggeston Grammar School for Boys) या शाळेत ते शिकत होते. पीट्र्सबर्गजवळील (Peterborough) आउंडल स्कूलमध्ये (Oundle School) त्यांनी नंतर प्रवेश घेतला. आपल्या शालेय जीवनामध्ये त्यांना फुलपाखरे आणि पतंग यांची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी गॉनव्हिल अँड कैस कॉलेज, केंब्रिज येथून निसर्ग विज्ञान (Natural Sciences) विषयामधील पदवी संपादन केली (१९२९) आणि नंतर, गाईज हॉस्पिटल, लंडन येथून वैद्यकीय क्षेत्रातील शल्यविशारद (Surgeon) ही पदवी मिळवली (१९३२). दुसऱ्या महायुद्धामध्ये‍‍‌‌ नौदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून रॉयल नेव्हल व्हालेंटिअर रिझर्व (Royal Naval Volunteer Reserve) येथे त्यांनी काम केले. ब्रिटिश कैद्यांमधील वारंवार आढळून येणाऱ्या अपचनामुळे मज्जासंस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी शोधनिबंध सादर केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांना बर्मिंगहॅम येथील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये (Queen Elizabeth Hospital,Birmingham) सचिव म्हणून नेमण्यात आले. लिव्हरपूल येथील डेव्हिड लेविस नॉर्दर्न हॉस्पिटलमध्ये त्यांची सन्माननीय शल्यचिकित्सक म्हणून निवड करण्यात आली (१९४६). नफील्ड युनिट ऑफ मेडिकल जेनेटिक्स (Nuffield Unit of Medical Genetics) या लिव्हरपूल विद्यापीठातील संस्थेचे मुख्य सचिव म्हणून त्यांची निवड झाली (१९६३). तेथेच वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. एक अत्यंत उत्साही तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. तेथील क्लिनिकल जेनेटिक्स विभाग त्यांच्यामुळे भरभराटीस आला. १९६७ साली रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स (Royal College of Physicians) यांनी त्यांची मुद्रण नियंत्रक (Censor) म्हणून निवड केली. पुढील चार वर्षे त्यांनी वरिष्ठ मुद्रण नियंत्रक म्हणून  कारभार पहिला. लॉर्ड रोझेनहॅम (Lord Rosenheim) यांची मुदत संपल्यानंतर क्लार्क यांना रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे (Royal College of Physicians) अध्यक्षपद देण्यात आले (१९७२-७७). संस्थेच्या घटनेमध्ये बदल करून एमआरसीपी परीक्षेमध्ये (MRCP Examination) वैद्यकीय कौशल्याची परीक्षा घेण्यात यावी असा बदल त्यांनी घडवून आणला.

गरोदरपणात Rh-धन (Rh पॉझिटिव्ह; आरएच +; Rh-positive) गर्भावर Rh-ऋण (Rh निगेटिव्ह;  आरएच –; Rh-negative) मातेच्या रक्तातून स्रवलेल्या Rh प्रतिद्रव्याचा परिणाम होऊ नये म्हणून Rh- ऋण मातांना देण्यात येणाऱ्या प्रति-RhD (Anti-RhD) लस तयार करणाऱ्या गटाचे क्लार्क हे एक सदस्य होते. ऱ्हीसस-ऋण (Rh-negative) आई आणि ऱ्हीसस-धन (Rh-positive) वडील यांच्यापासून जन्मलेल्या अर्भकांचा ‘ऱ्हीसस लोहिताविलयी विकार’ किंवा यलो बेबी (Yellow Baby) यांमुळे मृत्यू ओढवत असे. यावर संशोधन करून अशा मातापित्यांसाठी अँटि-डी इम्युनोग्लोबिन (Anti-D immunoglobulin) तयार करून यापासून अनेक बालकांचे प्राण वाचवल्याबद्दल क्लार्क जगभर प्रसिद्धीस आले.

ऱ्हीसस रक्तगटाबद्दल केलेल्या अनमोल संशोधनामुळे डॉ. रोनाल्ड फिन (Dr. Ronald Finn), डॉ. विन्सेंट फ्रेडा (Dr.Vincet Freda) आणि डॉ. विल्यम पोलॅक (Dr. William Pollack) यांच्या समवेत क्लार्क यांना ॲल्बर्ट लास्कर पुरस्कार (Albert Lasker Award) देण्यात आला (१९८०). १९७०साली त्यांना रॉयल सोसायटीचे सभासद करण्यात आले. त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले (१९७२).

क्लार्क यांचे हॉयलेक, चेशायर, इंग्लंड येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #हीमोलेटिकडिसीज, #अँटि-डी इम्युनोग्लोबिन, #ऱ्हीसस #पतंग #फुलपाखरू #Rh-धन #Rh-ऋण

संदर्भ : 

समीक्षक – मोहन मद्वाण्णा