व्हेर्नर, आल्फ्रेट : (१२ डिसेंबर १८६६ – १५ नोव्हेंबर १९१९ ).
फ्रेंच-स्विस रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी सहसंबद्ध सिद्धांत (Coordination Theory; Werner’s Theory of Coordinate Compounds) प्रतिपादित केला. या सिद्धांतामुळे अकार्बनी संयुगांचे साधे वर्गीकरण करणे शक्य झाले. अकार्बनी पदार्थांच्या रेणूंमधील अणूंच्या संरचना या कार्याबद्दल त्यांना १९१३ सालचे रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळविणारे ते पहिले स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि अकार्बनी रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळविणारेही पहिले शास्त्रज्ञ होते.
व्हेर्नर यांचा जन्म ॲल्सेसमधील (फ्रान्स) म्यूलूझ येथे झाला. त्यांना शालेय जीवनापासून रसायनशास्त्र विषयात आवड होती. तरुणपणी त्यांनी रसायनशास्त्रात पहिले संशोधन केले. एक वर्ष ते फ्रांको-जर्मन बॉर्डरजवळ फौजेत कार्यरत होते (१८८५-८६). स्वित्झर्लंडमधील झुरिक येथील फेडरल तांत्रिक शाळेतून त्यांनी तांत्रिक रसायनशास्त्रात शिक्षण घेतले (१८८६). या अभ्यासक्रमादरम्यान त्यांच्यावर प्राध्यापक आर्थर हान्श (Arthur Hantzsch) यांचा खूप प्रभाव पडला. झुरिकच्या त्याच तांत्रिक विद्यालयात प्राध्यापक लंग्ज यांच्या प्रयोगशाळेत व्हेर्नर साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्रयोगशाळेत त्यांनी प्राध्यापक हान्श यांच्या संशोधनात सहकार्य करायला सुरुवात केली. रेणूंमधील अणूंच्या संरचनेबरोबरच संयुगामधील सहबद्धता या सिद्धांतासाठी व्हेर्नर यांचे नांव घेतले जाते. नायट्रोजन असलेल्या अणूंच्या त्रिमितीय रचनेबाबतच्या संशोधनावर त्यांनी पीएच. डी. संपादन केली (१८९०). आपल्या प्रबंधात त्यांनी युगप्रवर्तक, पण वादग्रस्त सहसंबद्धता सिद्धांत प्रतिपादित केला होता. या सिद्धांतामुळे अकार्बनी संयुगांचे साधे वर्गीकरण करणे शक्य झाले, तसेच समघटकतेची (रासायनिक संघटन तेच असून रासायनिक संरचना भिन्न असणाऱ्या अविष्काराची; isomerism; आयसोमेरिझम) संकल्पना व्यापक झाली. प्रथम ते कार्बनी रसायनशास्त्र शिकवत असतं. त्यानंतर त्यांनी अकार्बनी रसायनशास्त्रसुध्दा शिकवायला सुरुवात केली.
व्हेर्नर यांना अनेक मानसन्मान व सन्माननीय पदव्या मिळाल्या. रॉयल सोसायटी ऑफ सायन्स, गटिंगेन आणि फिजिको मेडिकल सोसायटी, एर्लागेन या संस्थांचे ते सदस्य होते. जिनीव्हातील सोसायटी ऑफ फिजिक्स अँड नॅचरल हिस्ट्री, केमिकल सोसायटी ऑफ लंडन, इंपिरिअल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ नॅचरल हिस्ट्री यांसारख्या अनेक संस्थांचे ते सन्माननीय सदस्य होते.
व्हेर्नर यांनी Lehrbu ch der Stereochemie (Lecture in Stereochemistry; लेक्चर इन स्टिरिओकेमिस्ट्री; १९०४), Neuere Anschauungen auf dem Gebiete der anorganischen Chemie (Recent Views in the Field of Inorganic Chemistry; रिसेंट व्हयूज इन द फील्ड ऑफ इनऑरगॅनिक केमिस्ट्री; १९०५) ही पुस्तके लिहिली.
व्हेर्नर यांचे झुरिक येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1913/werner/facts/
- https://vishwakosh.marathi.gov.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F/
समीक्षक – श्रीराम मनोहर
#सहसंबद्धतासिद्धान्त #अकार्बनी संयुगे #अकार्बनी पदार्थ #नोबेलपारितोषिक #coordinationtheory #inorganiccompounds #nobelprize #nobelprizechemistry #chemistry # WernersTheoryofCoordinateCompounds