रॅली, जॉन विल्यम स्ट्रट (१२ नोव्हेंबर १८४२  ३० जून १९१९).

ब्रिटिश भौतिकीविज्ञ. आर्‌गॉन या अक्रिय वायूच्या यशस्वी विलगीकरणाकरिता त्यांना सर विल्यम रॅम्झी यांच्या समवेत भौतिकशास्त्रातील १९०४ सालच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रॅली यांनी ध्वनी, प्रकाश आणि विद्युतचुंबकीय लहरी यासंबंधी महत्वपूर्ण संशोधन केले. या संशोधनामुळे द्रायुंमधील तरंग प्रसरणाच्या ‍सिद्धांताला दुजोरा मिळाला. ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोन वायुंची घनता अचूक ठरविण्यासाठी त्यांनी संशोधन केले आणि या संशोधनातूनच पुढे त्यांना आर्‌गॉन वायुचा शोध लागला. रॅली यांचा जन्म लँगफर्ड ग्रोव्ह (इंग्लंड मधील इसेक्स परगण्यातील किथॅम गावच्या टर्लिंग पॅलेस) येथे झाला. लहानपणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. मात्र घरी शिक्षक ठेवून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले गेले. त्यांनी केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून खगोलशास्त्राची शिष्यवृत्ती मिळवली. त्यांनी पुढे रँग्लर परीक्षा उत्तीर्ण केली (१८६५). ट्रिनिटी कॉलेजने त्यांची फेलो म्हणून नेमणूक केली; लंडनच्या रॅायल सोसायटीचे सभासद म्हणून त्यांची निवड केली गेली (१८७१). त्याचवेळी त्यांना लॉर्डशिप मिळून ते लॅार्ड रॅली या नावाने ओळखले जाऊ लागले. जेम्स क्लार्क मॅक्सवेलच्या पश्चात केंब्रिज विद्यापीठाच्या जगप्रसिद्ध कॅव्हेंडिश प्रयोगशाळेचे संचालक म्हणून लॉड रॅली यांची नेमणूक करण्यात आली (१८७९). संशोधन व अध्यापन यांचे एक प्रमुख केंद्र म्हणून प्रयोगशाळेला मान्यता मिळवून देण्यासाठी लॉर्ड रॅली यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांची रॉयल सोसायटीचे चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली (१८८५); तर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, ऑर्डर ऑफ मेरीट चा किताब (१९०२), ‍रॉयल सोसायटीचे अध्यक्ष (१९०५) आणि केंब्रिज विद्यापीठाचे कुलपती (Chancellor) म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आली (१९०८). लॉर्ड रॅली व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मिडलसेक्स परगण्यामध्ये टेडिंग्टन येथे इंग्लंडच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीची स्थापना झाली (१९००). हवेत उड्डाण करण्याविषयी लॉर्ड रॅली यांना विशेष रस असल्याने ब्रिटिश सरकारला सल्ला देणाऱ्या कमिटी ऑफ एरोनॅाटिक्सचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविले गेले. हवेत उड्डाण करण्यासाठी जी विमाने बनविली जातील त्यांच्या मापाच्या प्रमाणात लहान प्रतिकृती करून प्रथम त्यांची चाचणी करावी आणि नंतर मोठी विमाने बनवावी, असा त्यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला विशेष उपयुक्त ठरला. आजही अशा प्रकारच्या छोट्या प्रतिकृतींच्या चाचण्या हा विमान बांधणी तंत्राचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

विमान वाहतुकीप्रमाणेच जहाजे व ती चालविणारे खलाशी यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणाऱ्या ट्रिनिटी हाऊसने लॉर्ड रॅली यांना सल्लागार म्हणून नेमले. लॉर्ड रॅली यांनी धुक्यातून जहाजे चालविताना धेाक्याची सूचना देण्यासाठी आवाजाऐवजी बिनतारी तारायंत्राचा वापर करावा अशी मोलाची सूचना केली. लॉर्ड रॅली यांचा विद्युतचुंबकीय लहरींविषयी पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध झाला (१८६९). त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांनी भौतिकशास्त्राच्या सर्व शाखांत संशोधन केले. त्यांनी सहस्पंदन (Resonance) या विषयावर एक संशेाधन निबंध प्रसिद्ध केला (१८७०). त्यानंतर ध्वनी विषयक अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. ध्वनीलहरींविषयक सर्व शोधनिबंध एकत्रित करून ट्रीटाइज ऑन साऊं नावाचा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.

हवेतून जाणाऱ्या लहरींचा आणि प्रकाशाचा अभ्यास लॉर्ड रॅली यांनी केला. सूक्ष्मकणांद्वारे प्रकाशाचे विकीरण (Scattering), लोलक (Prism) आणि विवर्तन जालक (डिफ्रॅक्शन ग्रेटींग) यांवर त्यांनी संशोधन केले. सूर्यप्रकाशातील रंगांचे विकीरण होऊन हवेतील सूक्ष्म घनकणांमुळे आकाशाला निळा रंग प्राप्त होतो असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी रंगीत छायाचित्र काढण्याची पद्धत सुचविली (१८८७) आणि याच तत्त्वावर पुढे ग्राब्रिएल लीपमान या शास्त्रज्ञाने रंगीत छायाचित्र काढण्याचे तंत्र विकसित केले.

विद्युत विरोध मोजण्यास ओहम हे एकक वापरतात, त्याच्या मूल्यासंबंधी काही वाद निर्माण झाला. तो वाद मिटविण्यासाठी लॉर्ड रॅली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यांच्या सूचनांवरून आवश्यक त्या सुधारणा करून त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विद्युत संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेने त्यांनी सुचविलेले ओहम एकक मान्य केले (१९०८). मात्र नोबेल पुरस्कार ज्या संशोधनासाठी  यांना मिळाला तो म्हणजे, आर्‌गॉन वायूचा शोध. ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोन वायुंची घनता अचूक ठरविण्यासाठी त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन केले. या संशोधनातूनच पुढे आर्‌गॉनचा शोध लागला. हवेतील नायट्रोजन वेगळा करण्यासाठी त्यांनी प्रथम प्रयोग केले. हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन वगळता शिल्लक राहिलेला वायू जवळ जवळ एक टक्का असून या वायूची घनता नायट्रोजनच्या जवळजवळ दीडपट असल्याचे आढळून आले. या वायूचे ऑक्सिडीकरण होत नाही तसेच तो मॅग्नेशियमबरोबर अभिक्रियाही करत नाही असे लॉर्ड रॅली व सर रॅम्झी यांना आढळले. या वायूच्या रासायनिक अभिक्रियेत भाग न घेण्याच्या गुणधर्मावरून त्याचे नाव आर्‌गॉन ठेवले; कारण, ग्रीक भाषेत आर्‌गॉन म्हणजे सुस्त, निष्क्रिय. ब्रिटिश ॲसोसिएशनच्या ऑक्सफर्ड येथील अधिवेशनात लॉर्ड रॅली व सर विल्यम रॅम्झी यांनी हा शोध जाहीर केला (३१ जानेवारी १८९५). हवेतील या निष्क्रिय वायूंविषयी संशोधन पुढे चालू ठेवून आर्‌गॉनखेरीज हीलियम, निऑन, क्रिप्टान आणि झेनॅान हे वायू हवेत सूक्ष्म प्रमाणात असतात, हे सर विल्यम रॅम्झी यांनी शोधले. १९०४ साली लॉर्ड रॅली आणि सर विल्यम रॅम्झी यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक आर्‌गॉन या अक्रिय वायूच्या संशोधनाबद्दल देण्यात आले,  याशिवाय स्मिथ प्राइज (१८६५), रॉयल मेडल (१८८२), डीमॉर्गन मेडल (१८९०), मॅसेस्टुएट मेडल (१८९४), कॉप्ली मेडल (१८९९), ॲल्बर्ट मेडल (१९०५), इलीऑट क्रिसन मेडल (१९१३), रम्‍फर्ड मेडल (१९१४) अशी संशोधनातील अनेक अव्वल पारितोषिके लॉर्ड रॅली यांनी मिळविली.

आर्‌गॉन वायूच्या शोधाबरोबरच डयुप्लेक्स थिअरी (Duplex theory), रॅली व्हेव्हज (Rayleigh Waves), रॅली स्कॅटरिंग (Rayleigh Scattering), रॅली-श्रॉडिंगर पर्टर्बेशन थिअरी (Rayleigh  Schrodinger perturbation theory), रॅली-जीन्स लॉ (Rayleigh Jeens law) यासंबंधीदेखील महत्त्वपूर्ण संशोधन केले.

जॉन विल्यम स्ट्रट रॅली (तिसरे बॅरन) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी इंग्लंडमधील टर्लींग येथे निधन झाले.

 

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/John_William_Strutt,_3rd_Baron_Rayleigh
  • https://www.nobelprize.org/prizes/physics/1904/strutt/biographical/
  • शिल्पकार कोश – विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड ३
  • neglactedNeglected  Scientists – American Institute of Physics
  • Anecdotes from lives of Scientists

समीक्षक – हेमंत लागवणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा