सदर्न, सर एडविन मेल्लोर  ( ७ जून, १९३८).

इंग्लिश रेणवीय जीवशास्त्रज्ञ. ते लास्कर  पारितोषिक  विजेते  आहेत. निवृत्तीनंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी महाविद्यालयाचे अधिछात्र (फेलो) आहेत. एडविन सदर्न,  सदर्न ब्लोट तंत्राकरिता [Southern Blot Technique] प्रामुख्याने ओळखले जातात.

सदर्न यांचा जन्म बर्ली, लँकाशर येथे झाला. त्‍यांनी मँचेस्टर विद्यापीठातून बी.एससी. केले. ग्लासगो विद्यापीठाच्या रसायनशास्त्र  विभागात प्रयोग साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले व डॉक्टरेटची पदवी मिळवली (१९६२).

सदर्न हे ऑक्सफर्ड जनुक तंत्रज्ञानाचे (Oxford Gene Technology) संस्थापक, अध्यक्ष आणि प्रमुख वैज्ञनिक अधिकारी आहेत. ते कीर्क हाऊस ट्रस्टच्या स्कॉटिश चॅरिटीचे संस्थापक, अध्यक्ष आहेत. या ट्रस्टची स्थापना जीवशास्त्र आणि वैद्यक शास्त्रातील शिक्षण व संशोधन यांसाठी झाली. याशिवाय इडिना ट्रस्टची स्थापना त्यांनी केली. तिचा उद्देश शाळांमधून विज्ञान शिक्षणाला चालना देणे हा होता.

सदर्न यांनी तयार केलेल्या सदर्न ब्लॉट तंत्राचा उपयोग डीएनएचे पृथक्करण करण्याकरिता जनुकीय अंगुली मुद्रणासाठी आणि पितृत्व चाचणीसाठी केला जातो. ही प्रक्रिया जनुकांच्या किती प्रति आहेत हे समजण्यासाठी पण बऱ्याचदा वापरली जाते. सदर्न ब्लोटचे तत्त्व आधुनिक मायक्रोअॅमरेकरिता मोठ्या प्रमाणात कामाला येते. नॉर्दर्न ब्लॉट ही प्रक्रिया आरएनए ओळखण्यासाठी वापरली जाते तर, वेस्टर्न ब्लॉट हे प्रथिने ओळखण्यासाठी वापरले जाते. ही नावे सदर्न नावापासून तंत्राच्या साधर्म्यामुळे दिली गेली. ऑक्सफर्ड जीन टेक्नॉलॉजी (Oxford Gene Technology) ही  कंपनी सदर्न  यांनी  स्थापन केली  या कंपनीने  डी.एन.ए. मायक्रोअॅरेचे तंत्रज्ञान विकसित केले.

सदर्न  यांच्या  इतर संशोधनामध्ये अनेक शोधांचा समावेश आहे. गुणसूत्रावर  डीएनए  क्रम कसा लावला जातो यासंबंधी मूलभूत संशोधन सदर्न  यांनी  केले. सदर्न यांनी प्रथमच प्रगत पेशीतील रंगसूत्रावर असलेल्या न्यूक्लिइक अम्लांची क्रमवारी लावली. छोट्या  व  मोठ्या  डीएनएची  क्रम पुनरावृत्ती  यावर त्यांनी बरेच संशोधन केले. या आणि अशा अनेक संशोधनानंतर सदर्न  यांना  नॉन-कोडींग डीएनएमध्ये कशी उत्क्रांती झाली यासंबंधी रासायनिक कात्रीने (रिस्ट्रिक्शन एंझाइम) तुकडे केल्यानंतर तयार होणाऱ्या  अनेक डीएनएमधून विशिष्ट क्रम कसा ओळखायचा हे दाखवून देणाऱ्या त्यांच्या सदर्न  ब्लॉट तंत्राचे तर नंतर अनेक फायदे झाले. डीएनए क्रमाचे वेगवेगळ्या आरएनएमध्ये रूपांतर आणि डीएनएमध्ये मिथाइल ग्रुप  घालणे यासंबंधीचे  प्रकार  यावर  त्यांनी  बरेच  संशोधन  केले.

सदर्न यांना वैज्ञानिक संशोधनाबद्दल अनेक बहुमान मिळाले. गेर्डनर फाउंडेशन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे रॉयल पदक, डीएनए मायक्रोअॅरे  तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत केल्याबद्दल नाइट बॅचलरचा सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले. रोग निदान शास्त्रातील संशोधनाकरिता त्यांना प्रतिष्ठित ॲल्बर्ट लास्कर पारितोषिक देण्यात आले. लीसेस्टर विद्यापीठाच्या अॅलेक जॅफेरीस (Alec Jeffreys) यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने ब्लॉट ह्या तंत्रज्ञानाच्या शोधाकरिता देण्यात आले. त्यांना अॅसोसिएशन ऑफ बायोमॉलिक्युलर रिसोर्स सुविधा या संघटनेकडून जैव रेणवीय तंत्रज्ञानातील  अप्रतिम  शोधाबद्दल पारितोषिक देण्यात आले.

 

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा