सिंग, लालजी  (५ जुलै १९४७-१० डिसेंबर २०१७).

भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ. डीएनए अंगुलिमुद्रण शाखेमध्ये लालजी सिंग यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना भारतातील डीएनए अंगुलिमुद्रणातील मार्गदर्शकाचे स्थान मिळाले आहे.

लालजी सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कलवारी गावामध्ये झाला. बारावीनंतर बनारस हिंदू विद्यापीठामधून प्राणीविज्ञान व पेशी आनुवंशिकीमधील पदवी त्यांनी मिळवली. त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंध क्रोमोसोम या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. भारतीय सापांच्या गुणसूत्रांचा तौलनिक अभ्यास त्यांच्या प्रबंधात केलेला आहे. या कामाबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले.

लालजी सिंग यांनी मानवी स्थलांतर व उत्क्रांती,  वन्य प्राणी संरक्षण या शाखेत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आली (२००४). त्यांनी अनेक संशोधन संस्था स्थापन केल्या. त्यातील उल्लेखनीय संस्था म्हणजे ‘डीएनए अंगुलिमुद्रण व चिकित्सा संस्था’(१९९५). अस्तित्व धोक्यात आलेल्या वन्य जीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी लॅकोनिस   (Lacones) संस्था स्थापन केली (१९९८). नामशेष झालेल्या गिधाडांच्या अंड्यांचे संवर्धन या संस्थेमध्ये केले जाते. या संस्थेमध्ये जगात सर्वप्रथम चितळ प्राण्याच्या कृत्रिम गर्भधारणेतून जन्म झाला आहे. जीनोम फाउंडेशन स्थापन करण्यामागील हेतू भारतीय वंशाच्या व्यक्तीमधील आनुवंशिक आजार शोधणे हा आहे (२००४).

लालजी सिंग यांना बनारस हिंदू विद्यापीठाचे पंचविसावे कुलगुरू होण्याचा मान मिळाला (२०११-१४). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होण्याआधी हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल अ‍ॅंड मॉलेक्युलर बायॉलॉजी (सीसीएमबी) या संस्थेमध्ये ते संचालक होते (१९९८-२००८). त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याच्या अंगावर असलेल्या कपड्यावर व व्यक्तीच्या शरीरातील डीएनए  एकच आहे, याचा बळकट पुरावा मिळाला. डीएनए अंगुलिमुद्रण तंत्र पूर्णपणे भारतात विकसित करण्यामागे त्यांचे प्रयत्न आहेत. यामुळे भारताचे मौल्यवान परकी चलन वाचलेले आहे.

लालजी सिंग यांनी डीएनए अंगुलिमुद्रण तंत्रातील नैपुण्यामुळे सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अ‍ॅंड डायग्नोसिस या संस्थेची स्थापना भारतीय शासनाने केली. मानवी ओळख पटवण्यासाठी ही संस्था सध्या विस्तृत प्रमाणावर काम करते. माय ट्रॅवल्‍स इन विटनेस बॉक्स हे त्यानी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांनी गुन्हा शाबीत करण्यासाठी केलेल्या संशोधनामागील कहाणी आहे. याशिवाय त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. जगभरातील शोधनिबंधामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.

संदर्भ : 

समीक्षक – अ. पां. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा