स्टीफन्सन, मेरी लुईस ( १९२१ – २६सप्टेंबर, २००९).
अमेरीकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. स्टीफन्सन यांनी पॉल झॅमकनीक आणि मलोन बुश होग्लंड यांच्या सहकार्यांनी प्रयोगाद्वारे असे दाखवून दिले की, प्रथिनांच्या संश्लेषणाकरिता एटीपी (ATP; ॲडेनोसीन ट्रॉय फॉसफेट) ची गरज असते.ॲमिनो आम्ल अडेनीलेट्स तयार होऊन ही गरज पूर्ण होते
स्टीफन्सन यांनी कनेक्टिकट महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर जीवरसायनशास्त्रात हार्वर्ड वैद्यकीय संस्थेतून पीएच्.डी. मिळवली. त्यांना अमेरिकेतील कला आणि विज्ञानाच्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांना सन्मान देणाऱ्या संस्थेचा फाइ बीटा कप्पा (Phi Beta Kappa) हा सन्मान मिळाला. हार्वर्ड वैद्यकीय संस्थेत त्यांची जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. मॅसॅचूसेट्स जनरल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी ४० वर्षे संशोधन केले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर व्यावसायिक जर्नल्समध्ये ३० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे काही शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत रेणवीय जीवशास्त्र, कर्करोग आणि अणुशक्तीचा शांततेसाठी उपयोग या विषयांवर होते.
झॅमकनीक आणि मलोन होग्लंड आणि मेरी स्टीफन्सन यांनी प्रथिनांच्या संश्लेषणाच्या मार्गातील महत्त्वाचा घटक शोधून काढला. हा घटक ॲमिनो आम्लाची प्रथिने तयार करण्याच्या जागेपर्यंत म्हणजे रिबोसोमपर्यंत ने-आण करतो. रिबोसोमवर मग ही ॲमिनो आम्लाची साखळी तयार होते व प्रथिने तयार होतात. या नवीन शोधलेल्या घटकाला ट्रान्सफर आरएनए किंवा टी-आरएनए असे संबोधले गेले. हा शोध रेणवीय जीवशास्त्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरला.
झॅमकनीक यांच्याबरोबर काम करताना मेरी स्टीफन्सन यांनी अँटीसेन्स सिद्धांताची चाचणी घेतली आणि पहिले सकारात्मक परिणाम दाखविले. विशिष्ठ क्रम असलेले एम आरएनए तयार करण्याचे तंत्रज्ञान तोपर्यंत विकसित झालेले होते आणि कृत्रिम न्यूक्लिक आम्ल धागे बनवता येत होते. रॉस सरकोमा विषाणूचा क्रम तोपर्यंत समजलेला होता. १३ न्यूक्लिओटाइड लांबीचा व रॉस सरकोमा विषाणूच्या न्यूक्लीओटाइड क्रमाला पूरक अँटीसेन्स क्रम बनविला गेला. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याने रॉस सरकोमा विषाणूची कोंबडीच्या भ्रूणामधील वाढ थांबली.
झॅमकनीक आणि त्यांची सहकारी मेरी एल. स्टीफन्सन यांनी असे सुचविले की अँटीसेन्स रेणूचा उपयोग सर्व प्रकारच्या संसर्गावर उपचार करण्याकरिता आणि कर्करोगाचा उपचार करण्याकरिता होऊ शकेल. ह्यात आरएनएचे प्रथिनात रूपांतर थोपवून आक्रमण करणाऱ्या गोष्टींना लागणारी प्रथिने तयार होणे टाळता येईल.
संदर्भ :
- Mahlon B Hoagland, $ Mary Louise Stephenson, Jesse F. Scott, Liselotte I. Hecht, and Paul C. Zamecnik, A Soluble Ribonucleic Acid Intermediate in Protein Synthesis? www.njc.rockefeller.edu/pdf4/Class4-HoaglandZemecnik1958.pdf
- Mary Louise Stephenson,Obituary, Legacy.com http://www.legacy.com/obituaries/bostonglobe/obituary.aspx?n=mary-louise-stephenson&pid=133664168
- Antisense makes sense, MIT Technology Review, July 1, 2001, https://www.technologyreview.com/s/401109/antisense-makes-sense/
- Dr. Mary Louise Stephenson, Marblehead Reporter, Wicked Local, 28 September 2009 http://marblehead.wickedlocal.com/x1128384489/Dr-Mary-Louise-Stephenson
समीक्षक – रंजन गर्गे