स्वामी कुवलयानंद (३० ऑगस्ट १८८३ – १८ एप्रिल १९६६).

भारतीय योगाचार्य. त्यांचे संपूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. स्वामी कुवलयानंद यांना शालेय वयात बलोपासनेची आवड निर्माण झाल्याने महाविद्यालयात अध्यापन करीत असताना योगावर संशोधन सुरू करून १९२४ मध्ये लोणावळ्याला कैवल्याधाम संस्थेची स्थापना केली. तेथे योगाचे शिक्षण, संशोधन आणि रोगोपचार करून आपल्या आयुष्यातील ४२ वर्षात संस्था जगप्रसिद्ध केली.

स्वामी कुवलयानंद यांचा जन्म बडोदा जिल्ह्यातील दभई येथे झाला. शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात व पदवीचे शिक्षण बडोदा विद्यापीठात झाले. संस्कृत विषयाचे अध्यापन करत असतानाच त्यांनी शारीरिक शिक्षणाचे धडेही घेतले. पुढे अंमळनेर येथील खानदेश शिक्षण संस्थेच्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काही काळ काम पहिले. अकरा वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि नंतर सोळा वर्षे राष्ट्रीय शारीरिक शिक्षण समितीचे मानद सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वामी कुवलयानंद हे नाव धारण करून लोणावळ्याला कैवल्यधाम या संस्थेची स्थापना केली. तेथे शास्त्रीय संशोधन विभागाची विशेष स्थापना करून योगसाधना सप्रमाण सिद्ध करण्यास सुरवात केली. प्रथम समस्या काय आहे त्याचे अवलोकन करणे, जुन्या साहित्यामध्ये त्याबद्दल काय दाखले आहेत ते शोधणे, समस्या निवारणाचा आराखडा तयार करणे, ग्रंथसाहित्यामध्ये सापडलेल्या दाखल्यांची शहानिशा करणे, त्या समस्यांचे निवारण कोणत्या आधारे करावयाचे ते ठरविणे, प्रत्यक्षात त्यावर अभ्यास व प्रयोग करणे आणि प्रयोगाचे निकाल तपासून पाहणे व पडताळणी झाल्यावर त्याचा प्रत्यक्षात उपयोग करणे ही स्वामीजींची कार्यपद्धती होती.

स्वामी कुवलयानंद यांनी योग अभ्यासाने निरनिराळ्या व्याधीत कसा फरक पडतो ते सप्रमाण सिद्ध केले तसेच, उडीयाननौली ह्या क्रियांमध्ये उदरातील आतड्यांमध्ये ऊर्ध्व दिशेने चलनवलन (नियमित नैसर्गिक पद्धतीच्या विरुद्ध) होते असा समज होता. परंतु स्वामीजींनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले की, नौली क्रियेमध्ये पोटाचे दोन्ही नळ म्हणजे रेक्टस स्नायू वेगळे करून दाखविले जातात आणि छाती व उदर यांना विभागणारा पडदा (diaphgram ) वर उचलला जातो, ज्यामुळे पोटाच्या आतल्या पोकळीत वाढ होते. यामुळे आतड्यावरील दाब कमी होतो व मोठ्या आतड्यांना प्रसरण पावण्याची संधी मिळते. ह्या क्रियेमुळे बद्धकोष्ठता होत नाही, मलनि:सारण व्यवस्थित होते, हेही दाखवून दिले. योगावरील संशोधनाची माहिती सर्वांना व्हावी ह्यासाठी त्यांनी योगमीमांसा नावाच्या योगसंशोधन पत्रिकेची सुरुवात केली. पारंपरिक योग शिक्षणाबरोबर जटिल समजल्या जाणाऱ्या हटयोगामधील शुद्धीक्रियांचे प्रशिक्षण सामान्य लोकांना देण्यास सुरुवात केली. नेती, दंड धौती, वस्त्र धौती, नौली इत्यादी शुद्धिक्रियांच्या शिक्षण व संशोधनास सुरुवात केली. प्राचीन योगिक ग्रंथांचे भाषांतर व प्रकाशन योजना हाती घेतल्या व पूर्णत्वास नेल्या.

स्वामी कुवलयानंद यांना संस्कृत विषयात सर्वात जास्त गुण मिळविल्याबद्दल त्यांना शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली होती.

समीक्षक – आशिष फडके

प्रतिक्रिया व्यक्त करा