शेण्ड्ये, माधव गणेश (२० फेब्रुवारी १९२८-९ नोव्हेंबर २००२).
माधव गणेश शेंड्ये यांचे आयुर्वेदाचे शिक्षण पुण्याच्या लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालयात झाले व तेथेच ते स्वस्थवृत्त विषयाचे प्राध्यापक होते. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते व आयुर्वेदातील सर्वांगीण उपचार करीत असत.
वैद्यकीय पद्धतीजन्य भूल न देता रुग्ण सामान्य अवस्थेत पूर्णपणे शुध्दीवर असताना ते दात उपटत असत. ही कला त्यांनी हुबळी येथील वैद्य पां. वि. जायदे यांच्याकडून प्राप्त केली होती. या विद्येचा उपयोग त्यांनी अनेक रुग्णांवर त्यांच्या हयातभर केला. दंतोत्पाटन करताना ते जालंधर बंधाचा प्रयोग करीत असत व तदनंतर रुग्णांना त्रिफळा, हरिद्रा, गैरिक ह्या द्रव्ययुक्त कोमट काढ्याच्या गुळण्या करण्यास सांगत असत. तसेच दंतोत्पाटनानंतर दंतरुग्ण चिकित्सेत तुत्थ हरितकी किंवा बाल हरितकी व गुळवेल चूर्ण दंतमंजन स्वरुपात उपयोगात आणीत असत.
सर्वांगीण दंतपंक्तीच्या आरोग्याविषयी सांगताना ते मनुष्याच्या तीनही अवस्थेतील दंतपंक्तीच्या आरोग्याचा विचार करीत असत. उदा., बाळ सहा महिन्याचे झाले की, त्याच्या मुखात दात दिसायला हळूहळू सुरवात होते. अशा अवस्थेत दिवसागणिक विकसित होणाऱ्या देहामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियमची गरज असते. म्हणून ते बाळाला ‘दात दिसायला लागेपर्यंत, सांबरशिंग’ उगाळून गुटीबरोबर देण्यास सांगत असत. त्यामुळे दात सहजपणे येत असत. तारुण्यामध्ये नेहमीच सर्वांनी काहीही खाल्ल्यानंतर दात घासावयाचा ब्रश पाण्यामध्ये भिजवून त्याने दात घासावेत त्यामुळॆ खाल्ल्यानंतर अडकलेले अन्नाचे कण वेळीच अलग होऊन दातांचे आरोग्य राखले जाते. तसेच गोडेतेल थोडेसे गरम करून ते हिरड्यांना हळूवारपणॆ मसाज करुन लावावे व नंतर थोडा वेळ थांबून कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे दात शिवशिवणे, दातांमधून कळा येणॆ ही लक्षणे त्वरित जातात. वृध्दापकाळात दातांचे आरोग्य सुस्थितीत राहावे म्हणून शतावरी चूर्ण आणि अश्वगंधा चूर्ण दुधात घालून प्राशन करण्यास ते सुचवित असत.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी गुळवेल चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण या कषाय व तिक्त रसाच्या वनस्पतींचा उपयोग करण्यास ते आग्रहाने सांगत असत. कारण ह्या वनस्पतीच्या उपयोगामुळे तोंडातील कफ दुष्टी निघून जाते व तोंडाला येणारा चिकटाही हळूहळू निघून जातो. त्यामुळे मुखशुध्दी राखणे सहजपणे जमते. ह्या प्रकारे दांत स्वच्छ ठेवण्यामुळे तोंडातील कफ दुष्टी जाते व दातांचे नैसर्गिक सौंदर्य परत प्रस्थापित होते आणि मुखदुर्गंधीही लोप पावते.
तसेच भक्कमपणा गमावलेल्या, हलणाऱ्या दातांना त्रिफळा चूर्ण आणि हळद ह्या मिश्रणाने मंजन करण्यास सुचवित असत. दात सैल झाल्यामुळे, हिरड्यातील वेदना शमविण्याकरिता तिळाचे तेल कोमट करून हिरड्यांना हळूवार मसाज करून त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करण्यास सुचवत असत. कृमीदंतामध्ये हिरड्यांना सूज आली असेल तर त्या जागी जलौकाव्दारे रक्तस्त्रुती करीत असत.
माधव शेण्ड्ये यांचा मुख्य वैद्यकीय व्यवसाय हा आयुर्वेदिक सर्वंकष दंतव्याधी उपचार हाच होता. ते यात त्यांच्या विद्यार्थ्यांना सामावून घेत असत व ही कला त्यांनाही अवगत करून देत असत. माधव शेण्ड्ये हे सिध्दांतवादी होते. त्यांचा ओढा औषधनिर्मिती करण्याकडे होता. अपस्मारासाठी पारद जल, कॉंग्रेस गवत ह्या वनस्पती द्रव्याची मशी करून सोरायसिस, एक्झिमासारख्या त्वचा विकारात, लोखंडी कढईत त्रिफळा काढा सिध्द करून त्या काढ्याचे तवंग एकत्रित करून त्याचा नस्यासाठी उपयोग करीत व उर्वरित काढा केशतेलासाठी अशी औषधे ते तयार करून वापरत. पांडू व्याधीमध्ये रक्तातील सामान्य पातळीपेक्षा कमी झालेले हिमोग्लोबीनचे प्रमाण परत पहिल्या पातळीवर आणण्यासाठी रक्तबस्तीचा प्रयोग ते करीत असत. वेखंडाचा गंध संपूर्णपणे सुरक्षित राहून तो तेलात उतरवून ते वचा-तेल बनवत.
पुण्याच्या वैद्य प. य़. खडीवाले प्रतिष्ठानने त्यांना दंतोत्पाटन महर्षी ही पदवी देऊन गौरविले होते.
संदर्भ:
- आयुर्वेद पत्रिका ,जानेवारी २०१२, वैद्य मा.ग.शेंड्ये स्मृती विशेषांक
समीक्षक – आशिष फडके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.