प्राचीन व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदातील हे नववे उपनिषद आहे. ते सामवेदाच्या तलवकार शाखेच्या छांदोग्य ब्राह्मणातील असून प्राचिनता, गंभीरता व ब्रह्मज्ञानाचे विवरण या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे उपनिषद आहे. आठ अध्यायांच्या या उपनिषदातील पाच अध्याय उपासनाकाण्डसदृश् असून उर्वरित तीन तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सहाव्या अध्यायामधील श्वेतकेतू आणि उद्दालक आरुणी यांचा संवाद तत्त्वज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवणारा म्हणून प्रसिद्ध आहे. तत्त्वमसि (तू ब्रह्मच आहेस) हे चार अक्षरी महावाक्य याच उपनिषदातील आहे.
पहिल्या अध्यायामध्ये उद्गीथाची (प्राणाची/आत्म्याची) माहिती, व्याख्या असे विषय हाताळलेले दिसतात. यामध्ये बक दाल्भ्य ऋषी (ग्लाव मैत्रेय) आणि पांढर्या कुत्र्याची काहीशी विचित्र कथा आहे. तीनुसार कुत्र्याचे भुंकणे म्हणजेच उद्गीथाचे स्वरूप (शौव उद्गीथ) आहे. कदाचित ऐहिक स्वार्थासाठी कर्मकांड करणार्यांचा उपहास करण्याचा हा प्रयत्न असावा. तर वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मतानुसार, प्रत्येक प्राणकेंद्राच्या मध्ये असलेल्या मध्यप्राणाला श्वेत कुत्रा म्हटले आहे.
तिसर्या अध्यायातील ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ या सिद्धान्ताचे प्रतिपादन करणारा भाग (छांदोग्योपनिषद ३.१४) अतिशय महत्त्वाचा आहे. यात ब्रह्माचे वर्णन केलेले आहे. अन्तर्हृदयातील आत्मा (उद्गीथ) तांदळापेक्षा, यवापेक्षा, मोहरीपेक्षा लहान आणि पृथ्वीपेक्षा, अंतरिक्षापेक्षा, स्वर्गापेक्षा आणि या सर्व लोकांपेक्षा मोठा आहे, असे यामध्ये म्हटले आहे. यामध्ये सूर्यालाच उद्गीथ म्हटले आहे.
चौथ्या आणि पाचव्या अध्यायांमध्ये अनुक्रमे सत्यकाम जाबाल या तत्त्वज्ञाने उपकोसलाला (जाबालचा शिष्य) केलेला ब्रह्मज्ञानाचा उपदेश, आणि प्रवाहण जैवली (धर्मशास्त्रातील विद्वान–पांचाल देशाचा राजा) सिद्धान्त तसेच अश्वपती कैकय (प्राचीन काळातील एक आत्मज्ञानी पुरुष) याने विशद केलेली सृष्टिविषयक तत्त्वे यांचे विवेचन आले आहे.
सहाव्या अध्यायामध्ये महर्षी आरुणी (उद्दालक) याच्या सिद्धान्ताचे विवेचन आहे. हा महान तत्त्वज्ञानी आणि आचार्य याज्ञवल्क्याचा गुरू मानला जातो. बारा वर्षे गुरुगृही शिकून घरी आलेला आरुणीचा पुत्र श्वेतकेतू गर्वाने ताठर झाला होता. तेव्हा पित्याने त्याला विचारले की, जे ऐकल्याने सर्व ऐकल्यासारखे होते, न जाणलेले सर्व जाणल्यासारखे होते, ते काय? यावर श्वेतकेतूने उत्तर देण्यास नकार दिल्यानंतर आरुणी म्हणतो की, ज्याप्रमाणे मातीचा गोळा पूर्ण कळल्याने सर्व मातीचे, मातीच्या वस्तूंचे ज्ञान होते तसेच सोन्याच्या किंवा लोखंडाच्या एका वस्तूचे पूर्ण ज्ञान झाल्यानंतर लोखंडाचे सर्व प्रकार जाणल्यासारखे होतात, विकार हे केवळ नावाचे असून वाणीमुळे खरे वाटतात, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीपूर्वी, प्रारंभी असणारे एकमेवाद्वितीय असे ’सत्’ जाणल्यानंतर सर्व काही जाणल्याप्रमाणे होते. (छांदोग्योपनिषद ६.१.३).
ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या अतिसूक्ष्म बीजातील अतिसूक्ष्म कणापासून वटवृक्ष निर्माण होतो, त्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म अशा सत, आत्मतत्त्वापासून हे सर्व जगत उत्पन्न होते. (छांदोग्योपनिषद ६.१२). यामध्ये ब्रह्माचे सूक्ष्मत्व आरुणीने श्वेतकेतूला पटवून दिले.
पंचाग्निविद्येचा (अंतरीक्ष, पर्जन्य, पृथिवी, पुरुष व योषा म्हणजे स्त्री यांचा) प्रथम निर्देश या उपनिषदामध्ये सहाव्या अध्यायात झालेला दिसतो. या पाच अग्नींना परमात्मा व्यापून राहिला आहे. त्यामुळे या पंचाग्नींच्या द्वारे जो परमात्म्याला जाणतो, तो मुक्त होतो, असे वर्णन यात केले आहे. (छांदोग्योपनिषद ६.२.१-४).
सातव्या अध्यायामध्ये नारद व सनत्कुमार (विष्णूचा अवतार मानला गेलेला सुविख्यात तत्त्ववेत्ता) यांचा आध्यात्मिक सुखवादासंबंधीचा प्रसिद्ध संवाद आहे. तसेच आठव्या अध्यायामध्ये इंद्र आणि विरोचन यांची कथा आली आहे. शरीर हे मर्त्य आहे पण तरीही अविनाशी व अशरीरी अशा आत्म्याचे ते अधिष्ठान आहे. शरीराशी संबंधित असताना प्रिय आणि अप्रिय यांनी युक्त असणारा आत्मा शरीराशी संबंध तुटल्यावर मात्र प्रिय आणि अप्रिय यांनी अस्पर्श राहतो. हाच आत्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे त्याचे ज्ञान होणारा ब्रह्मलोकाला जातो. आत्मा हा अमृत, अभय व ब्रह्म आहे. तो सर्व लोकांना धारण करतो, दिवस आणि रात्र यांनी परिच्छिन्न (वेगळा) होत नाही. त्या आत्म्याला जरा, मृत्यू किंवा शोक अशा अवस्था नाहीत. सर्व पाप आणि पुण्य त्याच्यापासून निवृत्त होतात.
छांदोग्योपनिषदातील उल्लेखांनुसार अध्यात्मविद्या क्षत्रियांकडेच असल्यामुळे तिच्या सामर्थ्याने क्षत्रियांचे शासन या जगात स्थापित झाले. यावरून काही जर्मन संशोधकांचे असे मत झाले की, वैदिक यज्ञकर्त्या ब्राह्मणांना उपनिषद तत्त्वज्ञान क्षत्रियांनीच प्रथमत: शिकविले. चैत्तरथ राजा हा शूद्र होता व तो रैक्व (सयुग्वा–बैलगाडीखाली राहणारा) या तत्त्वज्ञानी आचार्याकडे अध्यात्मविद्या शिकण्याकरिता गेला, असे या उपनिषदात म्हटले आहे.
गुरुदेव रानडे नमूद करतात की, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे उपनिषद बृहदारण्यकोपनिषदाइतके उच्चतम पातळीवर पोहोचलेले नसले, तरीही वेदान्तशास्त्राच्या आचार्य़ांनी अनेकदा ते उद्धृत केले आहे, यातच त्याचे महत्त्व स्पष्ट होते.
संदर्भ :
- Ranade, R. D. A Constructive Survey of UpanishadicPhilosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
- दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
- सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
- http://vedicheritage.gov.in/upanishads/chandogyopanishad/
समीक्षक – भाग्यलता पाटस्कर