अथर्ववेदाशी संबंधित असलेले अतिशय महत्त्वाचे असे हे उपनिषद. नऊ प्रमुख उपनिषदांपैकी एक आहे. कालदृष्ट्या तसेच आशयाच्या दृष्टीने हे उपनिषद कठोपनिषदाशी तसेच श्वेताश्वेतरोपनिषदाशी अधिक जवळचे वाटते, असे गुरुदेव रानडे यांचे मत आहे.  तसेच या ग्रंथामध्ये आलेल्या काही संकल्पनांचे छांदोग्योपनिषदातील काही तत्त्वांशी साधर्म्य दिसते. मुण्डकोपनिषदाच्या नावाविषयी दोन व्युत्पत्ती आहेत. एका व्युत्पत्तीनुसार मुण्डन हे संन्यासाचे चिन्ह असल्याने संन्यासधर्माचा पुरस्कार करणारे उपनिषद म्हणून या उपनिषदाला संन्यासोपनिषद असेही म्हटले जाते. तर दुसर्‍या व्युत्पत्तीनुसार देहाचा सर्वाधिक महत्त्वाचा अवयव असलेले मुण्ड अथवा मुण्डक म्हणजे मस्तक, उत्तमाङ्ग यावरून हे नाव पडले असावे. ब्रह्मविद्येची ओळख पटवून देणारे सर्वांत महत्त्वाचे उपनिषद, आत्मानुभवाविषयी वाचकांच्या मनात तीव्र जिज्ञासा निर्माण करणारा अद्वितीय ग्रंथ असेही याच्याविषयी म्हटले जाते. या उपनिषदाचा कर्ता शौनक महाशाल आहे. गुरुदेव रानडे यांच्या मते या उपनिषदामध्ये सांख्य आणि वेदान्त या दर्शनांचा मिलाप दिसतो. विशेषतः सृष्टीच्या उत्पत्तिविषयक मंत्रांमध्ये याचा प्रत्यय येतो.

“कस्मिनु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति।”  (मुण्डकोपनिषद १.१.३)

अर्थ : कोणत्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाले असता सर्वकाही ज्ञात झाले, असे मानण्यात येते? हा गहन प्रश्न सुरुवातीलाच येथे चर्चिला गेला आहे. त्यावर दोन प्रकारच्या विद्यांचे विवेचन या उपनिषदामध्ये केले आहे. एक, अपराविद्या. जिच्यामध्ये वेद आणि वेदांगे यांचा समावेश होतो व दुसरी पराविद्या. तिची व्याख्या करताना उपनिषदकार म्हणतात की, अक्षर अशा परब्रह्माचे ज्ञान करून देणारी विद्या ती पराविद्या. जिच्या ज्ञानाने सर्वकाही जाणल्याप्रमाणे होते.

या उपनिषदात परब्रह्माचे स्वरूप स्पष्ट करताना ‘अस्ति’ व ‘नास्ति’ अशा दोन्ही प्रकारे केलेले दिसते. ते अदृश्य, अग्राह्य, तसेच अगोत्र, वर्णरहित, डोळे, कान नसलेले, हात-पाय नसलेले, नित्य, व्यापक, विविधरूपी, अतिसूक्ष्म, अव्यय, जगाचे उत्पत्तिस्थान असे केलेले आहे.

हे परब्रह्मच जगताचे उपादान तसेच निमित्तकारण आहे. त्यासाठी इतर कोणत्याही वस्तूची गरज परमतत्त्वाला भासत नाही. त्यासाठी कोळी व त्याच्या नाभीतून उत्पन्न होणारा तंतू (कोळ्याचे जाळे), पृथ्वी व तिच्या उदरातून उगवणार्‍या वनस्पती, शरीर आणि शरीरावरचे केस यांचा दृष्टांत दिला आहे.

जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध तसेच जीवमुक्तीचे वर्णन करताना शरीररूपी वृक्षावर मित्र होऊन एकत्र राहणारे, जीव व आत्मा हे दोन पक्षी राहतात, असे म्हटले जाते. शरीररूपी वृक्षावर असलेला पुरुषरूपी पक्षी कर्मानुसार आलेली फळे चाखतो व दुःख भोगतो; पण मुक्त झालेल्या दुसर्‍याला जेव्हा पाहतो, तेव्हा शोकमुक्त होऊन आत्मस्वरूप प्राप्त करतो. (मुण्डकोपनिषद ३.१.१-२). परंतु हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवचने, मेधा, बहुश्रुतपणा, यज्ञयाग पुरेसे नाहीत. आत्मज्ञानासाठी संन्यासाश्रम आवश्यक आहे, असे प्रतिपादन केलेले दिसते. उपासनेचा विचार करताना मुण्डकोपनिषदाने उपनिषदातील ज्ञानाचे तसेच प्रणवोपासनेचे माहात्म्य सांगितले आहे.

ज्ञानरूपी बळकट धनुष्य घेऊन त्यावर ध्यानरूपी बाण जोडावा. हे धनुष्य श्रद्धायुक्त अंतःकरणरूपी दोरी जोडून ओढावे. मग त्यायोगे अक्षरब्रह्माचा वेध घ्यावा. ॐकार हे धनुष्य, आत्मा हा शर, आणि ब्रह्म हे लक्ष्य होय. त्याच्या साहाय्याने सावधपणे बाण मारावा. बाणाप्रमाणे चित्त एकाग्र असावे, असे या उपनिषदात म्हटले आहे.

‘सत्यमेव जयति, नानृतम…..'(मुण्डकोपनिषद ३.१.६)

अर्थ : सत्याचाच विजय होतो असत्याचा नाही, देवांचा मार्ग सत्यानेच वेढलेला असून ज्यांच्या इच्छा तृप्त झाल्या आहेत असे ऋषी याच मार्गाने सत्याच्या मार्गाने परमनिधानापर्यंत पोचतात.  हे तत्त्व याच उपनिषदामध्ये येते.

मोक्षावस्थेचे अतिशय सुंदर वर्णन मुण्डकोपनिषदामध्ये केले आहे. जशा वाहणार्‍या नद्या समुद्राला मिळाल्यानंतर नामरूपरहित होतात, तसा ज्ञाता परमात्म्यात विलीन झाल्यानंतर नामरूपरहित होतो व दिव्य स्वरूप प्राप्त करतो.

प्रस्तुत उपनिषदामध्ये उच्चतम तत्त्वज्ञानाची प्रमेये काव्यमय भाषेत अत्यंत सुंदर पण साधेपणाने सांगितलेली दिसतात. त्यामुळॆ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने मुण्डकोपनिषदाचे माहात्म्य अद्वितीय आहे.

संदर्भ :

  • Ranade, R. D. A Constructive Survey of UpanishadicPhilosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
  • सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
  • http://vedicheritage.gov.in/upanishads/mundakopanishad/

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

प्रतिक्रिया व्यक्त करा