प्रस्तुत उपनिषद अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेचे आहे. या उपनिषदाचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने याचे नाव ‘प्रश्नोपनिषद’ असे आहे. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच नाव आहे. हे संपूर्ण उपनिषद गद्यात्मक असून यात एकूण ६७ वाक्ये आहेत. आद्य शंकराचार्यांनी ज्या प्राचीन उपनिषदांवर भाष्य लिहिले, ती उपनिषदे महत्त्वाची मानली जातात. महत्त्वाच्या प्राचीन नव्य उपनिषदांपैकी प्रश्नोपनिषदाचा अर्वाचीन गटात समावेश असून त्याचा कालखंड गीतेपूर्वीचा मानला जातो.

या उपनिषदात पिप्पलाद ऋषी आणि सहा ब्रह्मनिष्ठ शिष्यांचा संवाद आहे. या शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि पिप्पलादांनी त्यांना दिलेली समर्पक आणि मार्मिक उत्तरे हे याचे वैशिष्ट्य असून प्रस्तूत लेखात व संक्षेपाने दिले आहे.

कबंधी कात्यायनांनी विचारलेला पहिला प्रश्न : ह्या प्रजा कुठून उत्पन्न झाल्या?

पिप्पलादांचे उत्तर : प्रजापतीने (ब्रह्मदेवाने) तप करून निर्माण केलेल्या रयी आणि प्राण या दोन तत्त्वांपासून प्रजा उत्पन्न झाली आहे.

भार्गवी वैदर्भींचा प्रश्न : कोणत्या शक्ती या शरीराचे धारण करतात? त्यांना प्रकाशित कोण करते? त्यांपैकी वरिष्ठ कोण?

पिप्पलादांचे उत्तर : आकाश, वायु, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व वाचा, मन, चक्षु (डोळे), श्रोत्र (कान) या नऊ शक्ती शरीराला धारण करतात. दहावा प्राण हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याच्या आधीन सर्व शरीर आहे.

तिसरा प्रश्न कौशल्य आश्वलायनाने विचारला : प्राण कशापासून उत्पन्न होतो? या शरीरात तो कसा येतो? स्वत:ला विभागून कसा रहातो? इत्यादी.

पिप्पलादांचे उत्तर : प्राण आत्म्यापासून निर्माण होतो. मनाने केलेल्या पूर्व कर्माने तो शरीरात येतो. देहाच्या बरोबर जशी छाया त्याचप्रमाणे आत्म्याच्या बरोबर हा प्राण असतो.

गार्ग्य सौर्यायणीचा चौथा प्रश्न : या शरीरात कोणती इंद्रिये झोपतात? कोणती जागृत रहातात? कोणता देव स्वप्ने पाहतो?

पिप्पलादांचे उत्तर : निद्रावस्थेत सर्व इंद्रिये आपल्या विषयांसह त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशा दिव्य मनात लीन होतात म्हणजेच सुषुप्ती अवस्थेत जातात. शरीरात प्राण जागृत असतात. मन स्वप्नांचा अनुभव घेते. सुषुप्ती अवस्थेमध्ये महाभूते, इंद्रिये आत्म्यामध्ये लीन होतात.

पाचवा प्रश्न शैब्य सत्यकामाने विचारला : आमरण ओंकारोपासना करणार्‍याला कोणता लोक मिळतो?

पिप्पलादांचे उत्तर : ओंकारोपासना करणारा ज्या प्रकारच्या ब्रह्माचे ध्यान करतो त्याच्याकडे जातो. ओंकाराचे ध्यान जो तीनही मनांनी (अ, उ, म) युक्त असे करतो तो ज्ञान प्राप्त करतो आणि अजर, अमर, अभय असे परब्रह्म जाणतो व ब्रह्मलोकाला जातो.

सहावा प्रश्न सुकेशी भारद्वाजाने विचारला : षोडशकलावान पुरुष कुठे राहतो?

पिप्पलादांचे उत्तर : षोडशकलावान पुरुष मनुष्याच्या शरीरात रहातो. त्याच्या सोळा कला पुरुषाशी एकरूप होतात. मनुष्यात वास करणारी आणि वैश्विक घडामोडी चालवणारी शक्ती एकच आहे हे जाणणे हेच ज्ञानी पुरुषाचे लक्षण आहे.

संदर्भ :

  • Ranade, R. D. A Constructive Survey of Upanishadic Philosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
  • सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
  • http://vedicheritage.gov.in/upanishads/prashnopanishad/

समीक्षक : भाग्यलता पाटस्कर