माँटेसरी, मारिया (Montessori, Maria) : (३१ ऑगस्ट १८७०–६ मे १९५२). प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ज्ञ, शारीरविज्ञ व माँटेसरी शिक्षणपद्धतीची जनक. त्यांचा जन्म इटलीतील क्याराव्हाले या गावी मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील राज्यसंचालित उद्योगांचे संचालक होते.
माँटेसरी यांची वाढ होत असताना इटलीमध्ये स्त्रीयांच्या सामाजिक भूमिकेबद्दल रूढीवादी मूल्ये बजावली गेली. त्यामुळे त्यांचे कुटुंब गाव सोडून रोमला गेले. स्त्री शिक्षणाला बंदी असताना त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी तेथील मुलांच्या तांत्रिक शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्यांनी गणित विषयातील योग्यता आणि विज्ञानात विशेषत: जीवशास्त्रातील हितसंबंध विकसित केले. इटली देशात सार्वजनिक शाळेत जाणारी पहिलीच मुलगी असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळे घरातील व बाहेरील लोकांच्या टीकेला लहानपणापासूनच त्यांना तोंड द्यावे लागले. १८९६ मध्ये त्यांनी रोम विद्यापीठाची वैद्यकाची पदवी मिळविली; मात्र त्यांना अभियंता होण्याची इच्छा होती. वैद्यकाची पदवी मिळविणाऱ्या इटलीतील त्या पहिल्याच महिला होय. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर रोममधील सार्वजनिक रुग्णालयातील वैद्यक (Doctor) या जागेसाठी झालेल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि त्यात त्यांना यश मिळाले. त्या इटलीमधील पहिल्याच महिला वैद्यक होय. १८९७ मध्ये यूरोप खंडात अशा मानाच्या जागी निवडलेली माँटेसरी या पहिल्याच महिला होय. वृत्तपत्रांनी त्यांना सूर्यकिरण (Sun Ray) म्हणून गौरविले होते.
माँटेसरी या १८९८ मध्ये रोममधील मंदबुद्धी मुलांच्या शाळेची प्रमुख झाल्या आणि त्यांच्या मनात शिक्षणकार्याविषयी कुतूहल जागृत झाले. १८९८ मध्ये तूरीन येथे भरलेल्या वैद्यकीय परिषदेत भाषण करताना त्यांनी मतिमंद मुलांकडे समाज व वैद्यक यांचे होणारे दुर्लक्ष हे गुन्हेगारीचे खरे कारण होय, असा विचार मांडला. त्यांच्या या स्पष्ट सडेतोड विधानाचा यूरोपभर परिणाम झाला. खुद्द इटलीत मंदबुद्धीच्या मुलांसाठी संस्था स्थापन झाल्या. मानसिक वैफल्य ही वैद्यकशास्त्रातील समस्या नसून ती प्रामुख्याने शैक्षणिक समस्या आहे, असे त्यांना वाटत असे. या दृष्टीने त्यांनी मनोविकलांच्या शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. १८९९ मध्ये रोममधील महिला विश्वविद्यालयात आरोग्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९०० मध्ये लंडनमधील महिला परिषदेस इटालियन महिलांची प्रतिनिधी म्हणून त्या हजर होत्या. त्या ठिकाणी नॅशनल लीगने सुरू केलेल्या ऑर्थोफर्निक स्कूलमध्ये सह समन्वयक म्हणून त्यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी ३ ते ६ वर्षे वयांच्या बालकांच्या शिक्षणसाठी अनेक शैक्षणिक साधने निर्माण केली. नवीन पद्धती तयार करताना त्यांनी जीन इटार्ड आणि एडवर्ड सेग्विन या त्यांच्यापूर्वीच्या दोन मानसशास्त्रज्ञांच्या विचारांचा आधार घेतला. १९०४ मध्ये निष्णात वैद्यक म्हणून संपूर्ण रोममध्ये त्यांची प्रसिद्धी झाली. तसेच रोम विद्यापीठात मानवशास्त्राची प्राध्यापिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. वृत्तपत्रांनी त्यांना सूर्यकिरण (Sun Ray) म्हणून गौरविले होते.
माँटेसरी यांनी रोममध्ये त्या काळी गृहनिर्माण समितीने बांधलेल्या प्रत्येक घरात शिशुगृहे उघडण्याची कल्पना शोधून काढली. घरात राहणाऱ्या भाडेकरूंच्या २ ते ७ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना एकत्र करून त्यांची देखरेख शिक्षिकेवर सोपवायची व तिलाही त्याच घरात राहावयास जागा द्यावयाची, अशी ही योजना होती. या समितीने बांधलेल्या घरांचे तेथे राहणाऱ्या मुलांकडून नुकसान होऊ नये, हा या योजनेचा उद्देश होता. त्यातूनच ६ जानेवारी १९०७ रोजी माँटेसरी यांनी वरील वयोगटातील बालकांसाठी रोमच्या गलिच्छ वस्तीत बालघर (Casa Dei Bambini) ही पहिली शाळा सुरू केली. येथूनच एक अभिनव पद्धत सुरू झाली. समितीच्या सर्व घरांत नियोजित केलेल्या शिशुगृहांचे संचालकत्व माँटेसरी यांच्याकडे देण्यात आले आणि सामान्य बालकांच्या शिक्षणाला नवी दिशा देण्याची संधी त्यांना मिळाली. यानंतर माँटेसरी यांनी वैद्यकीय व्यवसायातील प्रतिष्ठा व पैसा यांचा मोह टाळून शैक्षणिक कार्यास स्वतःस वाहून घेतले.
मतिमंद मुलांचा मनोविकास होण्यासाठी त्यांच्या ज्ञानेंद्रियांची संवेदनशक्ती व स्नायूंची संचलनशक्ती विकसित करणे आवश्यक आहे, असे डॉ. एडवर्ड सेग्विन या मानसोपचारतज्ज्ञाचे मत आहे. या मताचा माँटेसरी यांच्या मनावर प्रभाव पडून त्यांनी मतिमंदांच्या शिक्षणासाठी बालकांना आकर्षून घेणारी, एकाग्रता वाढविणारी आणि त्यांच्या क्षमतेचा विकास घडविणारी अनेक शैक्षणिक साहित्य, खेळणी तयार केली. त्यांतून बालघराचा शास्त्रीय अभ्यासक्रम आणि आखावी कार्यक्रम तयार केला. या साहित्याच्या उपयोगाने मतिमंदांची प्रगती होत असल्याचे दिसून आले. त्यांपैकी काही मुले तर सर्वसामान्य मुलांची बरोबरी करू शकली. या अनपेक्षित यशाने भारावून जाऊन माँटेसरी यांनी रोम विद्यापीठात तत्त्वज्ञान, मानवशास्त्र व मानसशास्त्र या विषयांचा सात वर्षांचा अभ्यासक्रम पुरा केला. या अभ्यासक्रमाचा उपयोग करण्यासाठी त्यांना योग्य संधी लाभली. मनोविकास साधणाऱ्या शिक्षणाची नवीन पद्धती त्यांनी शोधून काढली. ती माँटेसरी शिक्षण पद्धती (Montessori Teaching Methods) या नावाने जगभर संबोधली जाते.
माँटेसरी यांनी बालकांच्या शिकण्याची प्रक्रिया लक्षात घेत लर्निंग बाय कनेक्टिंग हा सिद्धांत मांडला. त्यात त्यांनी शिकण्याच्या तीन पायऱ्या मांडल्या.
- बालकांकडून नैसर्गिक रित्या मात्र त्यांच्या सक्रीय सहभागातून दिवसभरातील संपूर्ण घटना आत्मसात केले जाते.
- बालकांना नियंत्रित उपक्रम देणे, त्याचे पुन्हा पुन्हा सराव करावे लागते. हेतुपूर्ण सराव आणि आधी इंद्रियांद्वारे आत्मसात केलेल्या माहितीमुळे बालकांना शिकणे दृढ होते.
- संकल्पना स्पष्ट होण्यासाठी बालकांना उपयुक्त आणि अर्थपूर्ण वाटेल असे काम द्यावे लागते. बालकेही ते अर्थपूर्ण करण्यासाठीचे खेळ अथवा कृती शोधून काढतात.
वरील तीन पायऱ्यांच्या आधारे बालकांच्या सर्व गरजा पुरविणारे आणि विकासाची साधने माँटेसरी यांना आपल्या शिक्षण पद्धतीत निर्माण केल्या.
माँटेसरी यांनी आपल्या दि ॲब्सॉर्बन्ट माइंड या आपल्या ग्रंथात बालकांच्या विचार प्रक्रियेचा शोध घेतला आहे. त्यात त्यांनी बालकांच्या मनाला ग्रहणशील मन असे संबोधले आहे. प्राथमिक कौशल्ये अतिशय शिस्तबद्धपणे, मानवी मनाकडून कशी आत्मसात केली जातात, याचा सिद्धांत त्यांनी आपल्या ग्रंथातून मांडला आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे मन संवेदनशील असते. त्यांच्या बुद्धीला याच काळात जास्त आकार मिळत असतो. ही बालके अजाणता, उत्स्फूर्तपणे बाहेरील प्रत्येक गोष्ट, घटना आपल्या मनात साठवून ठेवत असतात आणि त्याबाबत विचारपूर्क अर्थ लावत असतात. कळत नकळत जग समजावून घेण्याचा हा कालावधी असतो. त्यामुळे बालकांना कोणतीही कौशल्ये आणि ज्ञान नकळत आत्मसात होईल, अशी व्यवस्था करणे गरजेचे असते. हीच माँटेसरी शिक्षण पद्धतीमागील मुख्य भूमिका आहे.
माँटेसरी यांनी १९०९ मध्ये माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षक-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग उघडला. माँटेसरी यांची शिक्षणविषयक कल्पना वस्तूनिष्ठतेवर उभारलेली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. १९१६ मध्ये त्यांनी ६ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांना उपयुक्त ठरेल अशी गणित, व्याकरण, भूमिती शिकविण्याची सोपी पद्धत तयार करून त्यावर आधारित सेल्फ एज्युकेशन इन एलीमेंटरी स्कूल हा ग्रंथ लिहिला. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर त्यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर त्या अमेरिकेत गेल्या. न्यूयॉर्क येथे त्यांनी माँटेसरी शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्याकडे सोपविले. दुसऱ्या महायुद्धापासून त्यांच्या प्रवासास सुरुवात झाली. या प्रवासात त्यांनी शिशुशिक्षणपद्धतीचे बीजारोपण केले. स्पेनला जाऊन त्यांनी प्रयोगशाळा व विद्यालय स्थापन केले. नव्या पद्धतीच्या प्रसारासाठी त्यांनी इंग्लंड, इटली, स्पेन इद्यादी ठिकाणी प्रवास केला. आज जगातील १०१ देशांत सुमारे २२,००० माँटेसरीच्या शाळा आहेत.
माँटेसरी या शिशुशिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढले. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो, असे त्यांचे म्हणणे होते.
माँटेसरी यांना भारतातील शांततेसाठीचे शिक्षण या शैक्षणिक कार्यासाठी दोन वेळा नोबेल शांती पुरस्काराचे नामांकन मिळाले आहेत. माँटेसरी यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे : (१) दि डिस्कव्हरी ऑफ दि चाइल्ड (१९१२), (२) माँटेसरी मेथड (१९१२), (३) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४), दि सिस्टिम ऑफ एज्युकेशन (१९१५), दि मदर ॲण्ड दि चाईल्ड (१९१५), (४) दि अँडव्हान्स्ड माँटेसरी मेथड (१९१६), (६) पीस ॲण्ड एज्युकेशन (१९३६), (७) एज्युकेशन पॉर ए न्यू वर्ल्ड (१९४६), (८) दि सिक्रेट ऑफ चाइल्डहूड (१९४८), (९) दि ॲब्सॉर्बन्ट माइंड (१९४९).
माँटेसरी यांचे नोर्टवाइक (हॉलंड) येथे निधन झाले.
संदर्भ :
- पानसे, रमेश, डॉ. मारिया माँटेसरी नवे दर्शन.
- वर्तक, कुंदा, शास्त्रशुद्ध बालशिक्षणाच्या प्रणेत्या माँटेसरी.
- Gettman, David, Basic Montessori Learning activities for under five.
- Kramer, Rita, Maria Montessori : A Biography, 1976.
- Lillard, Paula, Montessori : A Modern Approach, 1972.