गिलॉटीन : (शिरच्छेद यंत्र). अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील शिक्षा करण्याचे एक परिमाण. या यंत्रामुळे रक्तरंजित व भयभीत करणाऱ्या सार्वजनिक देहदंडाचा प्रघात सुरू झाला. हे शिरच्छेद यंत्र बनविण्यासाठी दोन खांब, एक दोरखंड, एक आडवा बार, शरीरास आधार मिळेल असा सपाट लाकडाचा भाग, डोके पकडून ठेवील असे साधन आणि धारदार पोलादी पाते इत्यादी साहित्य आवश्यक होते. यांद्वारे शिरच्छेद यंत्र बनवून व्यक्तीची मान या यंत्रात कापली जात असे. मान कापण्यासाठी पोलादाचे पाते वापरले जात असे. पाते ८९ इंचाचे (२२६ सेंमी.) होते. पोलादी पात्याचे वजन आणि त्यास असणारी धार यांचा विचार करता अगदी डोळ्याची पापणी लवण्यापूर्वी मान कापली जाई. हे यंत्र कुशल कारागिरांच्या मदतीने बनविले जात असे. यामध्ये सुतार, पोलादकाम करणारे कामगार आणि लोहार इत्यादी येत असत. त्यामध्ये कलाकुसर किंवा आधुनिकता नसल्याने त्याची निर्मिती करणे सोपे होते. हे यंत्र सर्वत्र सहजसुलभ वाहून नेण्याच्या दृष्टीने पुढे त्याच्या आकार व वजनात बदल करण्यात आला. अशी यंत्रे घोडागाडीतून नेली जात.
गिलॉटीनचा इतिहास :
गिलॉटीनचा इतिहास फ्रेंच राज्यक्रांतीशी जोडला जात असला तरी, इ. स. १३०७ साली आयर्लंडमध्ये गिलॉटीन यंत्राशी साधर्म्य असणारे यंत्र वापरले गेले होते. तसेच पर्शियन लोकांनी सर्वप्रथम हे यंत्र बनविल्याचे मानले जाते. स्कॉटलंड, इंग्लंड व इतर उपखंडांतील काही प्रदेशांत हे यंत्र वापरल्याची नोंद मिळते. १६ व्या शतकात इटली आणि दक्षिण फ्रान्समध्येही या यंत्रासमान एक यंत्र वापरल्याची नोंद आहे, ज्याला ‘मॅनेव्हिया’ (Mannavia) असे म्हणत; तथापि केवळ खानदानी अथवा श्रीमंत लोकांच्या शिक्षेसाठी हे शिरच्छेद यंत्र वापरले जात असे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर या यंत्रास गिलॉटीन हे नाव पडले. एडिंबरोच्या पुरातन वस्तुसंग्रहालयामध्ये हे यंत्र पाहावयास मिळते. स्कॉटिश लोकांनी सन १६६१ साली या यंत्राद्वारे मार्किस ऑफ आर्गील या व्यक्तीचा शिरच्छेद केला. त्यानंतर सन १६६५ मध्ये त्याचा मुलगा अर्ल ऑफ आर्गील याचाही या यंत्राने शिरच्छेद करण्यात आला.
इंग्लंडमध्ये हे यंत्र वापरले जात नव्हते. परंतु सन १६५० सालानंतर हॅलिफॅक्स, वेस्टरिडिंग, यॉर्कशर या राज्यांमध्ये आरोपींच्या शिक्षेकरिता हॅलिफॅक्स गीबेट या यंत्राचा वापर केला जात होता. हॅलिफॅक्स अँण्ड इट्स गिबेट लॉ (१७०८) या ग्रंथात या यंत्राचे चित्र उपलब्ध आहे. मध्ययुगात जर्मनीमध्ये शिरच्छेद यंत्राचा वापर केल्याचे उल्लेख मिळतात. या यंत्राची नावे डायल, होबेल किंवा डोलाब्रा अशी होती. दोन जर्मन खोदकामगार जॉर्ज पेनेझ व हेन्रीच एलग्रेव्हर यांनी टायटस मॅनलीयसच्या मुलाचा यासारख्या यंत्राने वध केल्याची नोंद आहे. पुढे जोसेफ इन्यॉस गिलॉटीन (२८ मे १७३८ – २६ मार्च १८१४) यांनी सर्वप्रथम हे यंत्र रीतसरपणे वापरले जावे, अशी शिफारस फ्रेंच प्रतिनिधिगृहात केली.
जोसेफ इन्यॉस गिलॉटीन हे वैद्यक शास्त्रज्ञ होते. त्यांची फ्रान्सच्या कनिष्ठ सभागृहावर (नॅशनल असेम्ब्ली) निवड करण्यात आली (१७८९). त्यांनी राष्ट्रीय शिक्षा देण्याबाबत अभ्यास करून शिक्षा म्हणून मृत्युदंड दिला जावा व तोही शिरच्छेद यंत्राच्या मदतीने दिला जावा, अशी शिफारस केली. त्यांच्या मते, ‘मृत्युदंड ही शिक्षा शिरच्छेद यंत्राच्या मदतीने सुखकर व सुलभपणे दिली जाईल’. सभागृहातील त्यांच्या भाषणात त्यांनी शिरच्छेद यंत्राचे महत्त्व सांगितले (१ डिसेंबर १७८९). परंतु गिलॉटीन यांच्या भाषणाकडे सभागृहातील सदस्यांनी हास्यास्पद व विनोद म्हणून पाहिले; तेव्हा गिलॉटीन यांनी अतिशय चिकाटीने या यंत्राचे महत्त्व सभागृहास पटवून दिले. अखेर अनेक वादविवादांनंतर ६ ऑक्टोबर १७९१ रोजी गिलॉटीन यांनी शिफारस केलेले यंत्र कायद्यानुसार राष्ट्रीय शिक्षा देण्याकरिता मान्य करण्यात आले. याच दरम्यान चार्लस हेन्री सॅन्सन यांनी या यंत्राची शिफारस केली होती व त्यास फ्रान्समधील सर्जन ॲकॅडमीचे सचिव ॲटनी लुईस यांनी पाठिंबा दिला. एप्रिल १७९२ मध्ये जर्मन पियानो बनविणारे टेबीयस स्मिथ यांनी केवळ एका आठवड्यात कार्यवाही करणारा या यंत्राचा एक नमुना तयार केला. १७ एप्रिल १७९२ रोजी शिरच्छेद करणाऱ्या सरकारनियुक्त व्यक्तींच्या मार्फत हॉस्पिटलमधील मृत व्यक्ती, बकरे, मेंढ्या व तत्सम प्राण्यांवर या यंत्राच्या चाचण्या घेण्यात आल्या. या शिरच्छेद यंत्राद्वारे कायदेशीर रीत्या इतिहासात प्रथमच निकोलस पेलेटीयर या आरोपीस २५ एप्रिल १७९२ रोजी शिक्षा देण्यात आली. सुरुवातीला या यंत्रास ‘लुईसनʼ किंवा ‘लुईसेटीʼ असे म्हटले जात होते. कारण ॲटनी लुईस यांनी हे यंत्र वापरात आणले होते. जरी गिलॉटीन यांनी प्रत्यक्ष शिरच्छेद यंत्र तयार केले नसले, तरी त्यांच्या स्मरणार्थ या यंत्रास पुढे ‘गिलॉटीन यंत्रʼ असे संबोधण्यात येऊ लागले.
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्सचा राजा सोळावा लुई व राणी मारी आंत्वानेत यांचाही याच गिलॉटीनच्या आधारे शिरच्छेद करण्यात आला (१७९३). सु. १७,००० ते ४०,००० सर्वसामान्य लोकांचा फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान गिलॉटीनने शिरच्छेद केल्याची नोंद उपलब्ध आहे. त्यापैकी एकतृतीयांश लोक हे निरपराध मारले गेले, असे म्हटले जाते. फ्रान्समधील पॅरिस शहरात मोठ्या प्रमाणात शिरच्छेद केले गेले. जर्मनीमध्येही ॲडॉल्फ हिटलर या नाझी तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या हुकूमशहाने या गिलॉटीन यंत्राचा वापर करून हजारो लोकांना शिक्षा दिल्या. फ्रान्समध्ये १९७७ सालापर्यंत राष्ट्रीय देहदंडाचे साधन म्हणून गिलॉटीनचा वापर केला गेला. पुढे १९८१ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रांस्वा मित्तरँद (१९१६-१९९६) यांनी मृत्युदंडाची ही प्रथा बंद केली.
संदर्भ :
- Cavendish, Richard ‘Death of Joseph, Ignace Guillotinʼ, History Today, Volume 64, London, 2014.
- Guillon, Edmund Vincent, Build Your Own Guillotine : Make a Model That Actually Works, New York, 1982.
समीक्षक – अरुणचंद्र पाठक