विविध स्तरावरील संगीत परीक्षांद्वारे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाद्वारे संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या भारतातील मोजक्या संस्थांपैकी एक अग्रेसर संगीत संस्था.
गुरुवर्य विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची, विलक्षण तळमळीच्या कार्याची आणि अथांग कर्तुत्वाची स्मृती जपण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. अर्थात त्यांच्या अनेक शिष्यांनी भारतात सर्वत्र गांधर्व महाविद्यालये उभारून संगीत प्रसाराचे कार्य तद्नंतर सुरू ठेवले होतेच. त्याचप्रमाणे ही संस्था अहमदाबाद, गुजरात येथे डिसेंबर १९३१ मध्ये स्थापन करण्यात आली. विष्णु दिगंबरांचे निकटचे शिष्य नारायण मोरेश्वर खरे, व्ही. ए. कशाळकर, शंकर गणेश व्यास, विनायकबुवा पटवर्धन आदींनी तिचे नामकरण ‘गांधर्व महाविद्यालय मंडळ’ असे केले. याच संस्थेमध्ये अहमदाबादमध्ये १९२२ रोजी नारायण मोरेश्वर खरे यांनी स्थापन केलेली ‘राष्ट्रीय संगीत मंडळ’ ही संस्था विलीन केली. वरील व्यक्तींशिवाय काही ठिकाणी ग. द. कुलकर्णी, ग. शा. कबनूरकर, गोपाळराव जोशी यांचीही नावे संस्थापक म्हणून आढळतात. हे मंडळ पुढे रजिस्टर्ड करण्यात येऊन त्याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे उभारण्यात आले. पंडितजींनी घालून दिलेल्या शिस्त व अभ्यासक्रमाप्रमाणे चालणाऱ्या संगीत संस्थांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, संगीत परिषदा भरविणे व संगीत प्रचाराचे कार्य सतत सुरू ठेवणे, ही या मंडळाची प्रमुख उद्दिष्टे होती.
अहमदाबाद येथे स्थापन झालेल्या या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रथम नारायण मोरेश्वर खरे यांच्याकडेच आली. त्यानंतर विनायकराव पटवर्धन, शंकरराव व्यास, बी. आर. देवधर, विनयचंद्र मौदगल्य इ. दिग्गजांनी हे पद भूषवून आपले योगदान दिले. कालांतराने या संस्थेचे नाव ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ’ असे करण्यात आले. सरकार दरबारी आणि जनमानसात आदर आणि मान्यता पावलेल्या या संस्थेमार्फत विशिष्ट अभ्यासक्रम राबवून दरवर्षी प्रारंभिक वर्गापासून मध्यमा (पदविका), संगीत विशारद (पदवी), संगीत अलंकार (पदव्युत्तर) व संगीताचार्य (पीएच.डी.) या स्तरांवर गायन, वादन आणि नृत्य यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. सध्या भारतातील सर्व विभागातील जवळजवळ १२०० संस्था या मंडळाशी संलग्न असून देशविदेशातील सुमारे ८०० केंद्रांवरून सुमारे एक लाख विद्यार्थी परीक्षा देतात. हे परीक्षाकार्य मिरज (जिल्हा सांगली) येथील रजिस्ट्रार कार्यालयाकडून नियमितपणे नियंत्रित केले जाते. हे परीक्षाकार्य हा या संस्थेचा प्रमुख उपक्रम आहे. याशिवाय मिरज येथे स्थित असलेला संस्थेचा ‘ध्वनी मुद्रण प्रकल्प’देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्थेच्या सचिव आणि अध्यक्षपदावर कार्य केलेल्या बळवंत जोशी यांच्या अथक प्रयत्नानंतर साकारलेला आणि भारतातील हिंदुस्थानी संगीतातील कलाकारांचे सुमारे तीन हजार तासांचे ध्वनिमुद्रण असलेला हा संग्रह रसिक, कलाकार आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभा आहे.
या मंडळातर्फे १९४७ पासून मराठी व हिंदी भाषांतून नियमित प्रकाशित होणारे संगीत कला विहार हे मासिक हा या संस्थेचा आणखी एक उपक्रम. यातील संगीत विषयावर विविधांगी लेख, माहिती, मतमतांतरे आदी प्रकाशित होणाऱ्या साहित्यामुळे वाचक, अभ्यासक, संशोधक यांची मोठीच सोय झाली आहे.
वाशी (नवी मुंबई) येथे राज्य सरकारकडून दिल्या गेलेल्या जमिनीवर संस्थेने ‘विष्णु दिगंबर’ स्मारक उभारले आहे. येथे ग्रंथालय, संगीत वर्ग, गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाची सोय, सभागृहे इ.ची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे अध्यक्षपद कुमार गंधर्व, वि.रा. आठवले आदींनी भूषविले होते .
पदवीदान समारंभ, त्रैवार्षिक संमेलने, संगीत कार्यशाळा, शिबिरे, चर्चासत्रे, सांगीतिक पुस्तकांची आणि सीडी यांची प्रकाशने आदी नवीन आणि विधायक उपक्रमाद्वारे संगीत प्रचार, प्रसार आणि संवर्धन यांचे कार्य या संस्थेद्वारे नियमितपणे सुरू आहे .
समीक्षक – सु. र. देशपांडे