एक रूपकप्रकार. यात देव, राक्षस, नागराज, पिशाच्चेइत्यादींच्या चरित्राचे चित्रण असावे. यात एकंदर सोळा नायक असावेत असे म्हटले आहे. शांत, शृंगार आणि हास्य हे रस यात वर्ज्य असून मुख्यतः दीप्तरसांचा म्हणजे वीर आणि रौद्र या रसांचा आविष्कार असतो. द्वंद्वयुद्ध, आह्वान,संफेट तसेच माया, इंद्रजाल, उल्कापात, चंद्रसूर्यग्रहण आदी गोष्टींचेही विपुल प्रमाणात दर्शन होते. कथानकाचा विषय प्रसिद्ध असावा, तसेच नायकही प्रसिद्ध व उदात्त असावा. सात्वती आणि आरभटी या वृत्ती असतात.महत्त्वाचे म्हणजे कैशिकी वृत्ती नसावी.विविध प्रसंगांतून दिसणाऱ्या विविध भावांनी डिम हा प्रकार युक्त असावा. यात चार अंक असतात. तसेच विष्कंभक व प्रवेशक नसतात.

असा संभव आहे की ह्या प्रकाराचे फक्त एकच उदाहरण नाट्यशास्त्रकारापुढे होते. नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात असा उल्लेख आढळतो की, हिमालयावर शंकरासमोर अमृतमंथन नावाच्या समवकाराचा प्रयोग करून दाखविल्यानंतर त्रिपुरदाह नावाच्या डिमाचाही प्रयोग करून दाखविला. मात्र त्रिपुरदाहाच्या कथेत सोळा नायक असण्याची शक्यता फार कमी वाटते.संस्कृत साहित्यांत डिमाची उदाहरणे आढळत नाहीत.

संदर्भ :

  • धनंजय, दशरूपक ,चौखम्भा विद्याभवन, वाराणसी

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा