भाषेचा आकलनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणारी भाषा विज्ञानातील एक अभ्यासपद्धती . १९७० च्या दशकात निर्माण झालेली, गेल्या अर्धशतकभर विकसित होत असणारी व सद्य काळातील महत्वाची अशी ही अभ्यासपद्धती आहे. भाषिक आकलन हे मानवी समग्र आकलनाचाच भाग असून आपणास भाषिक आकलन (ज्ञान) व इतर आकलन (ज्ञान) असा फरक करता येत नाही, असे बोधात्मक भाषावैज्ञानिकांचे मत आहे.लिओनार्द टालमीच्या मते, संकल्पनांचे नेमके स्वरूप कसे असते व त्या भाषेतून कशा व्यक्त होतात, हा बोधात्मक भाषाविज्ञानाच्या अभ्यासाचा गाभा आहे. भाषा ही विविध गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रिया, बोधकार्ये व मानवी आकलन समजावून घेण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे. भाषेद्वारे आपणाला विचारप्रक्रियेबाबत काही अनुमान काढणे शक्य होते. टालमीच्या मते, भाषाभ्यासाचे तीन दृष्टिकोन आहेतः रूपाधारित, मानसिक व सांकल्पनिक. भाषाभ्यासाचा रूपाधारित दृष्टिकोन हा मानसिक व सांकल्पनिक दृष्टिकोन विचारात घेतो, मानसिक दृष्टीकोन हा रूपाधारित व सांकल्पनिक दृष्टिकोन विचारात घेतो, त्याचप्रमाणे सांकल्पनिक दृष्टिकोन हा रूपाधारित व मानसिक दृष्टिकोन विचारात घेतो. मात्र रूपाधारित व मानसिक हे दोन्ही दृष्टिकोन सांकल्पनिक संरचना पद्धतशीरपणे मांडत नाहीत. त्याउलट, सांकल्पनिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे बोधात्मक भाषाविज्ञान हे काळ व अवकाश, दृश्ये व प्रसंग, वस्तू व प्रक्रिया, स्थान व गती आणि बल व कार्यकारणभाव अशा संकल्पना भाषेत कशा व्यक्त होतात याचा व्यवस्थित खुलासा करते.याचबरोबर ते भाषेच्या रूपाचा व रचनांचाही सांकल्पनिक दृष्टिकोनातून समग्र अभ्यास करते.
भाषाविज्ञानात भाषेचे रूप व कार्य यावर आधारित अभ्यास करण्याचे दोन मुख्य प्रवाह आहेत. रूपपद्धतीने केलेला अभ्यास अपूर्ण व असमाधानकारक वाटल्याने बोधात्मक भाषाविज्ञान उदयास आले. बोधात्मक भाषाविज्ञान ही भाषेच्या कार्यपध्दतीवर आधारित अभ्यास करणा-या अभ्यासपद्धतींमधील एक आहे.इवान्स् हा बोधात्मक भाषाविज्ञान पद्धतीस बोधात्मक भाषाविज्ञान चळवळ असे संबोधतो, कारण (१) ही पद्धती कोणाही एका व्यक्तीने निर्माण केलेली नाही तर अनेक तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नातून आणि अनेक विद्याशाखांच्या समन्वयातून निर्माण झाली आहे. (२) बोधात्मक भाषाविज्ञान हा विशिष्ट असा सिद्धांत नसून एक दृष्टिकोन आहे. काही सामायिक व पूरक अशा तत्त्वांवर, गृहीतकांवर व विविध दृष्टिकोनांवर तो आधारित आहे.
बोधात्मक भाषाविज्ञान ही बोधविज्ञानाचीही शाखा आहे.बोधविज्ञान(कॉग्निटीव्ह सायन्स्) या आधुनिक व आंतरशाखीय विज्ञानात प्रामुख्याने तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मानवशास्त्र, भाषाविज्ञान, मेंदूविज्ञान, शिक्षणशास्त्र आणि संगणकशास्त्र यांतील घटकांचा आधार घेतला जातो. बोधात्मक भाषाविज्ञान ही अभ्यासपद्धती भाषाविज्ञान व बोधविज्ञान या दोन्ही शास्त्रांत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावते. बोधविज्ञान आणि बोधात्मक भाषाविज्ञान हे परस्परावलंबी व पूरक आहेत. बोधविज्ञानातील अभ्यासपद्धती वा निष्कर्ष बोधात्मक भाषाविज्ञान स्वीकारते व बोधात्मक भाषाविज्ञानाचा मानवी बोधाभ्यासास (हयुमन कॉग्निशन) चांगला उपयोग होतो.
मनोभाषाविज्ञान(सायकोलिंग्विस्टीक्स्) व बोधात्मक भाषाविज्ञान या दोन्ही पद्धती मानसशास्त्रासंबंधी असल्या तरी दोहोंमध्ये खूपच अंतर आहे. यातील पहिली पद्धती ही रचनावादी पद्धतीची चौकट मान्य करते, भाषेचे आकलन व इतर आकलन वेगवेगळे होत असल्याचा दावा करते, तसेच ध्वनी, रचना व अर्थ यासारखे स्वतंत्र विभाग मान्य करते. याउलट बोधात्मक भाषाविज्ञान रचनावादी पद्धत अकारण असल्याचे सांगून भाषेचे आकलन इतर समग्र आकलनाचाच भाग असल्याचे सांगते.तसेच ध्वनी, रचना व अर्थ यांचा एकत्रित विचार करते.
बोधात्मक भाषाविज्ञान हे अर्थाच्या अंगाने भाषेच्या अभ्यासाकडे पाहत असून अर्थ हाच भाषाभ्यासाचा मुख्य हेतू असल्याचे मानते. या पद्धतीत अर्थाला केंद्रिभूत मानून अभ्यासाचा रोख अर्थाकडून रचनेकडे असतो. याउलट भाषाविज्ञानाच्या संरचनावादी पद्धतीत वाक्यरचनेस केंद्रीभूत मानले जाते व अभ्यासाचा रोख वाक्यरचनेकडून अर्थाकडे असा असतो. रूपवादी व रचनावादी अभ्यासपद्धती अनुक्रमे भाषेच्या रूपास व रचनेस प्राथमिक व अर्थास दुय्यम स्थान देतात. मात्र बोधात्मक भाषाविज्ञान अर्थास केंद्रिभूत मानून कार्य करते. अर्थनिर्मिती प्रक्रियेदरम्यान तयार होणा-या (भाषिक) रचना या अर्थोद्भवी, ओघवत्या व अनुषंगिक असतात, तसेच सांकल्पनिक रचना व भाषिक रचना या समांतर व सहसंबधी आहेत, असे बोधात्मक भाषाविज्ञान मानते. सांकल्पनिक (अदृश्य) रचना समजून घेण्यासाठी आपणांस भाषिक (दृश्य) रचनांचा अभ्यास करावा लागतो. मूलतः सांकल्पनिक ही अव्यक्त पातळी व भाषिक ही व्यक्त पातळी आहे. या दोन टोकांच्या पातळींना जोडणारा तिसरा दुवा म्हणजे संवेदन पातळी होय. इवान्स̖च्या मते, मानवास येणा-या विविध बाह्य अनुभवांचा, विविध ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांचा तसेच मानवास लाभलेल्या विशिष्ट अशा शारीरिक व मेंदूच्या रचनेचा व कार्याचा परिणाम होऊन त्यामधूनच मानवाचे ज्ञान तयार होते. या विविध अनुभूतींमधूनच त्याच्या संकल्पना तयार होतात. त्यामुळे सत्य हे बाहेरील जगात नसून ते व्यक्तीच्या मनावर उमटलेल्या अनुभवविश्वाच्या प्रतिबिंबातून तयार होते. बोधात्मक भाषाविज्ञानात संकल्पनानिर्मिती म्हणजेच अर्थनिर्मिती होय.
बोधात्मक भाषाविज्ञानातील निष्कर्ष हे अधिक बळकट असण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये वापरलेल्या अभ्यास पद्धती ह्या तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मानवशास्त्र, भाषाविज्ञान, मेंदूविज्ञान, शिक्षणशास्त्र आणि संगणकशास्त्र या विविध विद्याशाखांतील प्रयोगांती स्वीकारल्या जातात. तसेच बोधविज्ञानाच्या या विविध विद्याशाखांतून मिळालेले अद्ययावत निष्कर्षही बोधात्मक भाषाविज्ञान स्वीकारते. अनेक तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नातून आणि उपरोक्त विद्याशाखांच्या समन्वयातून तयार होणारे निष्कर्ष अधिकाधिक तर्कशुद्ध, सखोल व अर्थपूर्ण होतात.
लिओनार्द टालमी (१९४२), रोनाल्ड लॅंगाकर (१९४२) व जॉर्ज लॅकॉफ (१९४१) हे बोधात्मक भाषाविज्ञानाचे तीन जनक मानले जातात. सन १९७० च्या दशकात लिओनार्द टालमी व १९८० च्या दशकात रोनाल्ड लॅंगाकर व जॉर्ज लॅकॉफ यांनी भाषेचा बोधात्मक दृष्टीने स्वतंत्ररीत्या अभ्यास केला. टालमी यांनी सुरवातीपासूनच ही बोधात्मक भाषाविज्ञान अभ्यासपद्धती अंगीकारली, तर रोनाल्ड लॅंगाकर व जॉर्ज लॅकॉफ यांनी सुरवातीस संरचनावादी अभ्यासपद्धतीचा अवलंब करून नंतर १९८० च्या दशकात ते बोधात्मक भाषाविज्ञानाकडे वळले. आजअखेर हे तिन्ही तज्ज्ञ बोधात्मक भाषाविज्ञान पद्धतीचा पुरस्कार करतात व या पद्धतीने कामही करतात.
बोधात्मक भाषाविज्ञानाच्या दोन शाखा आहेतः बोधात्मक अर्थविज्ञान(कॉग्निटीव्ह सिमँस्टीक्स्) व बोधात्मक व्याकरण(कॉग्निटीव्ह ग्रामर). प्रामुख्याने लिओनार्द टालमी यांनी केलेल्या अभ्यासातून बोधात्मक अर्थविज्ञान या शाखेची निर्मिती झाली. टालमी यांनी १९७२ मध्ये सिमँस्टीक् स्ट्रक्चर्स् इन इंग्लिश ऍन्ड अत्सुगेवी या विषयावरील पीएच. डी. अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून संपादन केली. या प्रबंधापासूनच त्यांनी बोधात्मक अर्थविज्ञानविषयक विचार मांडायला सुरवात केली. तद्नंतर त्यांनी विविध शोधनिबंध प्रकाशित केले. सन १९७२ ते २००० मध्ये प्रसिद्ध झालेले हे सर्व शोधनिबंध त्यांनी टुवर्ड अ कॉग्निटीव्ह सिमॅंटीक् या नावाने दोन खंडात प्रसिद्ध केले. त्यांचे जवळजवळ सर्वच शोधनिबंध भाषाभ्यासाच्या दृष्टिने क्रांतिकारी ठरले. विषेशतः टालमीचे भाषेचे संकल्पनात्मक-सामग्रीप्रणाली व संकल्पनात्मक-संरचना प्रणाली असे वर्गीकरण, भाषेतील आकृती-पृष्ठभूमी संकल्पना, भाषिक काळ व अवकाश, बल-गतीविज्ञान, सिमँस्टीक् स्टक्चरींग सिस्टम्स्, भाषा व इतर बोधात्मक पद्धती यांचा सहसंबंध, जगातील भाषांचे व्हर्ब-फ्रेम्ड व सेटेलाईट-फ्रेम्ड असे वर्गीकरण, इ. बाबतचे संशोधन मुलभूत प्रकारचे आहे.
रोनाल्ड लॅंगाकर यांनी बोधात्मक व्याकरण लिहिले. त्यांनी अनुक्रमे १९८७ मध्ये बोधात्मक व्याकरणाचा प्रथम खंड व १९९१ मध्ये द्वितीय खंड प्रसिद्ध केला. पहिला खंड बोधात्मक व्याकरणाच्या सिद्धांतास वाहिलेला असून दुस-या खंडात त्यांची उपयुक्तता सोदाहरण विषद केली आहे. टालमीने गृहीत धरलेले भाषेचे खुला वर्ग (ओपन क्लास) व मर्यादित वर्ग(क्लोज्ड् क्लास) हे लॅंगाकरला मान्य नाहीत.(अर्थात टालमी खुल्या वर्गात फक्त नाम, विशेषण व क्रियापद यांच्या मुळ रूपांचा समावेश करतो व मर्यादित वर्गात इतर सर्व बाबींचा समावेश करतो.)लँगाकरच्या मते, भाषेतील सर्वच शब्द एकसारखे असून असा भेद निरर्थक ठरतो. बोधात्मक व्याकरण वा बोधात्मक व्याकरणपद्धती या बोधात्मक अर्थविज्ञानातील संकल्पना व निष्कर्ष गृहीत धरतात. बोधात्मक भाषाविज्ञानपद्धतीने व्याकरणातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी लॅंगाकर यांच्या बोधात्मक व्याकरणाचा स्त्रोत म्हणून सर्वात अधिक आधार घेतला जातो.
थोडक्यात, बोधात्मक भाषाविज्ञानातील पहिली शाखा – बोधात्मक अर्थविज्ञान – ही सैद्धांतिक असून दुसरी शाखा – बोधात्मक व्याकरण – ही पहिल्या शाखेवर आधारित अशी आहे.
वरील दोन प्रमुख स्तंभांबरोबरच (शाखांबरोबरच) जॉर्ज लॅकॉफ यांचा रुपक-सिद्धांत (मेटॅफर थेसिस) हा बोधात्मक भाषाविज्ञानाचा तिसरा महत्वपूर्ण स्तंभ आहे. मानवी विचारप्रक्रियेत रूपकाचे मौलिक स्थान असून लॅकॉफने सुरवातीस साहित्य व नंतर मेंदूविज्ञानाच्या अभ्यासाद्वारे ते सिद्ध केले. हा सिद्धांत भाषेबरोबरच तत्त्वज्ञान, साहित्य, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, गणितशास्त्र व कला इ. मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला गेला.
वरील त्रयींबरोबरच चार्लस् फिलमोर (फ्रेम सिमँटीक्स्), गाइल्स फोकोनी (मेंटल स्पेसेस), अदिली गोल्डबर्ग (कंस्ट्रक्शन ग्रामर), जॉर्ज लॅकॉफ व मार्क टर्नर (कॉग्निटिव्ह पोएटीक्स्), जॉर्ज लॅकॉफ व मार्क जॉहान्सन (कन्सेप्च्युअल मेटॅफर, एमबॉडीमेंट थेसिस), गाइल्स फोकोनी व मार्क टर्नर (कन्सेप्च्युअल ब्लेंडींग थेअरी),इ. तज्ज्ञांचे सिद्धांतही बोधात्मक भाषाविज्ञानात महत्वाचे आहेत.
शेवटी बोधात्मक भाषाविज्ञानात रे याकेनडॉफचा उल्लेख आवश्यक वाटतो. त्यांचा सिद्धांत सांकल्पनिक अर्थविज्ञान नावाने ओळखला जातो. सांकल्पनिक अर्थविज्ञान व बोधात्मक भाषाविज्ञान यांत बरेच साधर्म्य आहे. मात्र याकेनडॉफ स्वतःला बोधात्मक भाषावैज्ञानिक मानत नाही. तो भाषेतील अवकाशीय संकल्पना व रचना गणितीय सुत्रांद्वारे मांडतो व भाषाभ्यासाच्या संरचनावादी पद्धतीस पुष्टी देतो.
पहा. बोधात्मक अर्थविज्ञान, बोधात्मक व्याकरण, रूपसिद्धांत
संदर्भ :
- Evans,Vyvyan ; Green, Melanie,Cognitive Linguistics, An Introduction ,Edinburgh University Press,2006.
- Talmy,Leonard, Toward A Cognitive semantic ,MIT press,2000.