भाषावापरशास्त्र : आधुनिक भाषाविज्ञानात अर्थ संकल्पनेचा उदय फार उशिरा झाला, वाक्याची संरचना फक्त निर्दोष असून भागत नाही तर ती अर्थपूर्ण पण असावी लागते, कारण भाषेचा मुख्य उद्देश संप्रेषण करणे हाच आहे हे भाषावैज्ञानिकांच्या लक्षात आल्यावर अर्थसंकल्पनेचा विचार सुरू झाला. अर्थविज्ञान ही नवी शाखा अस्तित्वात आली. अर्थविज्ञान अर्थाचा शब्दाच्या पातळीवर आणि वाक्याच्या पातळीवर अभ्यास करते. हा अर्थ वाक्यातील शब्दांचा किंवा वाक्याचा अर्थ असतो. कालांतराने काही संभाषितांचे विश्लेषण करण्यासाठी अर्थविज्ञानाच्या कक्षेपलीकडचे काहीतरी आवश्यक आहे, असे भाषावैज्ञानिकांच्या लक्षात आले. वाक्याचा अर्थ कधी कधी बोललेल्या वा लिहिलेल्या शब्दांमध्ये नसून अव्यक्त  किंवा अलिखित शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये सामावलेला असतो, असे लक्षात आले आणि लवकरच भाषेच्या संदर्भगत अर्थाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणून भाषावापरशास्त्र या ज्ञानशाखेचा उदय झाला.

इतिहास – भाषक भाषेचा वापर कसा करतात किंवा भाषिक अभिव्यक्तीचा सांदर्भिक अर्थ कसा असतो याचा अभ्यास करणाऱ्या भाषावापरशास्त्राला ज्ञानाच्या क्षेत्रात स्थान मिळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. आता ही भाषाविज्ञानाच्या मुख्या शाखांपैकी एक मानली जात असली तरी ती मुळात भाषेच्या तत्त्वज्ञानातून उगम पावलेली आहे. प्रॅग्मॅटिक्स हे नाव पहिल्यांदा चार्ल्स मॉरिस यांनी १९३० च्या आसपास वापरले, त्यांनी ही चिह्नविज्ञानाची एक शाखा असल्याचे जाहीर केले. १९५०च्या सुमारास ऑक्सफोर्ड येथे जे. एल. ऑस्टिन यांनी पूर्वपरंपरेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तार्किक विचारसरणीवर काम करण्याऐवजी (फ्रेगे, तारस्की, रसेल) नैसर्गिक भाषेच्या विचाराला प्राधान्य दिले. नंतर स्वत: ऑस्टिन, त्यांचे विद्यार्थी एच. पी. ग्राईस यांनी थियरी ऑफ स्पीच एक्ट आणि थियरी ऑफ कॉन्व्हर्सेशनल इम्प्लिकेचर हे दोन सिद्धान्त मांडले. नंतर या परंपरेतील पुढचे अभ्यासक म्हणजे पीटर स्ट्रॉसन, जॉन सर्ल आणि विटगेनस्टाईन. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भाषावापरशास्त्राला ‘केराची टोपली’ संबोधले जात होते कारण एकूणच चॉम्स्की यांच्या प्रतिपादनानंतर भाषागत अर्थ हीच गोष्ट निरर्थक ठरली होती. पण यातूनच एका अर्थाने अत्यंत वेगळी अशी ही ज्ञानशाखा असल्याचे पुढे अभ्यासकांच्या लक्षात आले आणि हळूहळू या नव्या ज्ञानशाखेने आकार धारण केला.

भाषावापरशास्त्र म्हणजे काय :  भाषावापरशास्त्र म्हणजे वक्त्याने (किंवा लेखकाने) संप्रेषित केलेल्या आणि श्रोत्याने (किंवा वाचकाने) लावलेल्या अर्थाचा अभ्यास. वक्त्याने उच्चारलेल्या शब्दांचा मूळ अर्थ कोणता हे इथे महत्त्वाचे नसून वक्त्याने संप्रेषित केलेला आणि श्रोत्याने लावलेला अर्थ कोणता हे महत्त्वाचे असते. या अभ्यासात विशिष्ट संदर्भात एखाद्या उद्गाराचा कसा अर्थ घेतला जातो हे पाहणे अंतर्भूत आहे म्हणजेच भाषावापरशास्त्र म्हणजे सांदर्भिक अर्थाचा अभ्यास. वक्त्याला जे म्हणायचे आहे, त्याचे अनुमान श्रोता वक्त्याच्या उद्गारातून कसे काढतो हे या दृष्टिकोनात महत्त्वाचे ठरते. त्यामुळे, जे सांगितले गेलेले नसते ते, वक्ता जे संप्रेषित करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचा अपरिहार्य भाग असते.

वाक्यरचनेचे नियम (सिन्टॅक्स) अर्थविज्ञान (सिमॅन्टिक्स) आणि भाषावापरशास्त्र (प्रॅग्मॅटिक्स) – भाषिक रूपे आणि त्यांच्या अर्थपूर्ण क्रमाचा अभ्यास वाक्यरचनेच्या नियमांमध्ये केला जातो. या अभ्यासात निर्देशात्मक जग आणि कथित भाषिक रूपे प्रत्यक्षात वापरणारा कुठेच गणला जात नाही. अर्थविज्ञानात निर्देशात्मक जगातील वस्तू आणि त्यांच्या अभिधानांचा संबंध अभ्यासला जातो. शाब्दिक वर्णने आणि जगातील सत्य-असत्य गोष्टी यांच्यातील संबंध अभ्यासला जातो ; पण ही वर्णने करणाऱ्याशी अर्थविज्ञानाचा संबंध नसतो. भाषागत अर्थाचा विचार अर्थविज्ञान करते, तर संदर्भगत अर्थाचा विचार भाषावापरशास्त्र करते

या तिन्ही ज्ञानशाखांपैकी फक्त भाषावापरशास्त्रच माणसाला विश्लेषणात स्थान देते. ते, भाषिक रूपे आणि ती वापरणाऱ्या व्यक्ती यांच्यातील संबंधांचा अभ्यास करते. भाषावापरशास्त्राच्या माध्यामातून भाषेचा अभ्यास करण्याचा फायदा असा, की वक्त्याच्या उद्गारांमागचा नेमका उद्देश काय, काय गृहीत धरून तो बोलतो आहे, त्याच्या भाषिक कृती कोणत्या या विषयी माहिती मिळू शकते पण या अभ्यासाचा एक तोटा पण आहे. तो असा, की अत्यंत मानवी पातळीवर असलेल्या या संकल्पनांचे विश्लेषण वस्तुनिष्ठ रीतीने करणे अत्यंत अवघड असते. उदा.

‘आला का?’

‘झोप आता. पहाट झाली’.

या दोन वाक्यांचे अर्थ कळणे अवघड नाही. पण परस्परांशी वरवर पाहता मुळीच संबद्ध नसलेल्या या दोन वाक्यांचा संवाद म्हणून विचार कसा करायचा हा प्रश्न पडतो. त्यांचा परस्परांशी असलेला संबंध कळायला एकच कळीची गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे संदर्भ.

‘आला का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’च असू शकते. असे असताना ‘झोप आता, पहाट झाली’ हे उत्तर देणाऱ्या व्यक्तीला ‘आला का?’ या प्रश्नामागे प्रश्नकर्त्याचा काय हेतू आहे, त्याला काय जाणून घ्यायचे आहे, हे माहीत आहे. ‘हो’ किंवा ‘नाही’ हे सोपे पर्याय उपलब्ध असताना वक्ता असे विचित्र उत्तर का निवडतो त्याला श्रोत्यापर्यंत काय पोहोचवायचे असते, ‘ज्याच्याविषय़ी विचारले तो आलेला नाही, प्रश्न विचारणे बंद कर’ हा संदेश त्याला द्यायचा असेल का? ही या संवादामागे असलेली अनुच्चारित संरचना, आणि हा भाषावापरशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे. वरील संभाषण निश्चितच अर्थपूर्ण आहे. वक्ता आणि श्रोता या दोघांनाही एकमेकांना काय म्हणायचे आहे, ते कळलेले आहे. थोडक्यात, वक्ता आपले म्हणणे श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या रणनीतीचा वापर करतो आणि श्रोता वक्त्याच्या आशयापर्यंत कसा पोहोचतो हा या अभ्यासाचा गाभा आहे.

काही महत्त्वाच्या संकल्पना

अर्थ – अर्थ या संकल्पनेचा सखोल विचार अनेक ज्ञानशाखांनी केला आहे. संस्कृत काव्याशास्त्राने वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ असे तीन अर्थाचे प्रकार मानले. वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ, लक्ष्यार्थ म्हणजे लक्षणेने प्राप्त झालेला अर्थ आणि व्यंग्यार्थ म्हणजे व्यंजनेने प्राप्त झालेला अर्थ. हाच सर्व साहित्यव्यापाराच्या मुळाशी आहे असे मानले जात होते. तत्त्वज्ञान या ज्ञानशाखेनेही भाषेचा अतिशय़ सखोल विचार केला आहे. पण अर्थविज्ञानातील अर्थ ही संकल्पना संभाषितांचे विश्लेषण करताना कधी कधी अपुरी पडते, असे भाषावैज्ञानिकाच्या लवकरच लक्षात आले.

संदर्भगत अर्थ

‘इथे दोनच लाडू आहेत.’ या वाक्यात ‘लाडू’ या शब्दाचा एक, गोलाकार, गोड खाद्यपदार्थ असा अर्थ असेल. ‘दोन’ या शब्दातून संख्या दाखवली जाईल, ‘इथे’ या क्रियाविशेषणातून लाडू वक्त्याच्या जवळ आहे याची नोंद होईल, ‘आहेत’ या क्रियापदातून लाडूचे अस्तित्व दाखवले जाईल. पण हा सगळा पसारा शब्दगत वा वाक्यगत अर्थाचाच असेल. या अर्थाच्या पलीकडे जास्त विश्लेषण शक्य नाही. पण या छोट्याशा वाक्यात अजून बरेच काही सांगितलेले आहे, जे अर्थविज्ञानाच्या कक्षेपलीकडे आहे.

  • हे आता मी खाणार आहे.
  • एवढे लाडू कुणी खाल्ले?
  • तू म्हणाली होतीस, बरेच लाडू उरलेत.
  • आता नवा घाणा करायला हरकत नाही.

अशा वेगवेगळ्या शक्यता असू शकतात. हा अर्थ आपल्यासमोर आलेल्या वाक्यात तर नाही आहे, मग हा अर्थ किंवा या अर्थाच्या शक्यता निर्माण तरी कुठून होतात, कोणती गोष्ट या वेगवेगळ्या शक्यता घेऊन येते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून एकाच गोष्टीकडे बोट दाखवता येते, ती म्हणजे संदर्भ. ज्या अवकाशात हे वाक्य उच्चारले गेले, त्याच अवकाशात वक्ता आणि श्रोता यांच्यात हा संदर्भ सामायिक आहे. याचा अर्थ असा की, वक्त्याने कोणत्या संदर्भात हे वाक्य उच्चारले आहे हे श्रोत्याला माहीत आहे, एवढेच नाही तर, श्रोत्याला हे माहीत आहे म्हणूनच वक्त्याला आपल्या वाक्यात जास्त माहिती देण्याची आवश्यकता वाटत नाही. अशा तऱ्हेने हजारो संभाषिते वक्ता आणि श्रोता यांच्यातील संदर्भाच्या सामायिक पायावर उभारली जातात. यालाच संदर्भगत अर्थ असे म्हणतात. भाषावापरशास्त्राचा पायाच मुळी हा संदर्भगत अर्थ आहे.

 संलग्नता (कोहेरन्स) – आपल्या बोलण्यात, ऐकण्यात, लिहिण्यात, वाचण्यात बहुतांशी सुसंगती असते, हे आपल्याला माहीत असते. साधारण अनुभव प्रत्येक भाषकाकडून त्याच्या स्थानिक पातळीवर विश्लेषित केला जातो, तरीही तो परिचित आणि अपेक्षित गोष्टींशी बांधलेला असतो. एखाद्या दारावर पाटी असते, ‘दोन लि.’ तेव्हा ही पाटी दूधवाल्यासाठी आहे हे सर्वांना माहीत असते. या लिखित संदेशात जी माहिती लिहिलेली नाही ती आपण आपल्या पूर्वानुभवातून भरत असतो. तरीही ती तेवढ्या स्थानिक क्षेत्रात सर्वांना परिचित आणि अपेक्षित असते. त्यामुळे काय लिहिले आहे त्यापेक्षा सर्वांना ज्ञात असणारे जे संप्रेषित होते ते महत्वाचे असते.

स्थितिनिर्देश (डेक्सिस) आणि अंतर – व्यक्त आणि अव्यक्त यातून निवड कशी करायची या प्रश्नाच्या उत्तरासाठी अंतर (डिस्टन्स) ही संकल्पना महत्त्वाची ठरते. समीपता(क्लोजनेस) आणि अंतर या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. अंतर हे भौगोलिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा अनेक प्रकारचे असते. वक्ता आणि श्रोता यांचे वय, त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, श्रोता किती जवळचा आहे, यावर वक्त्याचे काय आणि कितपत सांगायचे हे ठरत असते. जवळच्या मित्राला एखादी गोष्ट सांगताना त्रोटक, अत्यावश्यक माहिती तेवढी पुरवली जाते, बाकीच्या गोष्टी तो समजून घेईल असे गृहीत धरले जाते. याचाच अर्थ, सामाजिक, वैयक्तिक समीपतेवर वा अंतरावर संदेशातील शब्दांची निवड वा वगळणे अवलंबून असते. भाषावापरशास्त्र सापेक्ष अंतरांच्या अभिव्यक्तींचा अभ्यास करते.

दुवे [Hyperlink ] – १.परस्पर सामंजस्याचे तत्त्व (कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल) आणि अन्वयार्थके (इम्प्लिकेचर्स) २.भाषिक कृती (स्पीच एक्ट)

निर्देश (रेफरन्स) आणि अनुमान (इन्फरन्स)- वक्ता किंवा लेखक श्रोत्याला किंवा वाचकाला एखादी गोष्ट ओळखता यावी म्हणून निर्देशात्मक भाषिक रूपांचा वापर करतो. निर्देशात्मक भाषिक रूपे विशेषनामे किंवा नामपदबंध असू शकतात. जेव्हा वक्त्याला, श्रोत्याला काय माहीत आहे, हे माहीत असते, तेव्हा त्या माहितीच्या आधारे तो कोणती निर्देशात्मक भाषिक रूपे निवडायची हे ठरवतो. जेव्हा दोघेही एकाच जागी असतात, तेव्हा दर्शक सर्वनामे निर्देशात्मक भाषिक रूपांचे काम करतात.

उदा. ‘हे घे.’ जिथे निर्देशासाठी हे पुरेसे नसते तिथे जास्त स्पष्टीकरण देणारे पदबंध वापरले जातात. उदा. ‘तो नाही का, गणपतीच्या देवळापाशी भीक मागणारा.’ निर्देश हा वक्त्याच्या उद्दिष्टावर अवलंबून असतो. निर्देशाचे कार्य पूर्ण होण्यासाठी अनुमानाची भूमिका महत्त्वाची असते. वस्तू आणि त्यांची नावे यांच्यातला संबंध यादृच्छिक असल्याने एखाद्या पदबंधाचा उल्लेख करताना वक्त्याला काय अपेक्षित आहे, याचे अनुमान करण्याची जबाबदारी श्रोत्यावर पडते.

निर्देश हा वस्तुनिष्ठरीत्या अचूक नाव देण्यावर अवलंबून नसतो. उलट फक्त उभयपक्षी वापरता येईल असा तो सांकेतिक निर्देश असू शकतो, आणि तरीही संप्रेषणाचे कार्य पार पाडू शकतो. याचे कारण तो उभयपक्षी मान्य असतो. सगळ्या निर्देशात्मक भाषिक रूपांना ओळखता येण्याजोगे निर्देश असतात असे नाही.

‘तो माणूस तुला भेटायला आलाय’ यात भाषिक रूप स्पष्ट आहे, निर्देश स्पष्ट आहे. पण,

‘मला तरतरीत, हुशार तरुणांना घेऊन हे काम करायचंय’.

इथे तरतरीत, हुशार तरुण अस्तित्वात असतील असे गृहीत धरून केलेला हा निर्देश आहे. इथे ‘तरतरीत, हुशार तरुण’ या जागी कुणीही येऊ शकेल. अशा प्रकारच्या निर्देशाला गुणधर्मात्मक निर्देश म्हणतात. भाषिक रूपे ही मुळात निर्देशात्मक असतीलच असं नाही तर वक्ता त्यांचा गुणधर्मात्मक किंवा वैशिष्ट्यदर्शक वापर करून श्रोत्याला  तो काय म्हणतो आहे, ते ओळखायला निमंत्रित करतो.

नामे आणि नामनिदर्शक – काही विशेषनामे सांस्कृतिक क्षेत्रात परिचित असतात. अशा नामांचा उपयोग दुसऱ्याच एखाद्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी पण करता येतो. उदा. संत तुकारामांचे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहीत असते. पण या उदा. त या नामाचा उपयोग पहा.

‘तुझं तुकाराम कुठेय?’

‘ड्रॉवरमध्ये बघ.’

यातून हे सूचित होते, की दोन व्यक्ती संत तुकारामांच्या गाथेबद्दल बोलत आहेत. हे ‘तुझं’ या सार्वनामिक विशेषणाने कळून येते. अशा उल्लेखांनी वक्ता आणि श्रोता एकाच सांस्कृतिक पर्यावरणाचे भाग आहेत हे स्पष्ट होते. अशा वेळी जे सांगितले जाते त्यापेक्षा जास्त संप्रेषित केले जाते. आणि म्हणून हा विषय भाषावापरशास्त्राच्या क्षेत्रांत येतो.

पूर्वगृहीतके आणि क्रमानुमान – भाषितांच्या उच्चारणापूर्वी वक्त्याच्या मनात त्या भाषिताविषयी जी गृहीतके असतात त्यांना पूर्वगृहीतके म्हणतात तर भाषितांमधून जे तर्क सहजक्रमाने निघतात त्यांना क्रमानुमान म्हणतात.

‘सुषमाच्या बहिणीने हिऱ्याचे दागिने आणले.’ यात सुषमा नावाची एक व्यक्ती अस्तित्वात आहे आणि तिला एक बहीण आहे ही पूर्वगृहीतके असू शकतात ; पण वक्ता हेही गृहीत धरू शकतो की सुषमाला एकच बहीण आहे आणि ती फार श्रीमंत आहे, ही पूर्वगृहीतके वक्त्याची आहेत आणि ती चुकीची असू शकतात. तसेच वरील वाक्यातून अनेक तर्कसंगत विधाने निघू शकतात.

सुषमाच्या बहिणीने काहीतरी आणले,

सुषमाच्या बहिणीने दागिने आणले,

सुषमाच्या बहिणीने हिऱ्याचे दागिने आणले.

ही भाषितातून निघणारी अनुमाने आहेत, वक्त्याचे पूर्वगृहीतक नव्हे. ही विधाने तर्कसंगत आहेत, तसेच त्यात वक्त्याला काहीच स्थान नसल्यामुळे हळूहळू क्रमानुमान हा विषय भाषावापरशास्त्राच्या क्षेत्रातून बाजूला पडायला लागला आणि वक्त्याच्या पूर्वगृहीतकाचा विचार जास्त महत्त्वाचा ठरू लागला.

महाभाषित (डिस्कोर्स) आणि संस्कृती – जर वक्त्याने आपले संदेश लिहिले तर श्रोता उपस्थित नसल्यामुळे संप्रेषणाची प्रक्रिया लगेच होत नाही आणि प्रतिसादही मिळत नाही, वक्त्याला त्या प्रतिसादावर अवलंबून राहता येत नाही. मग त्याला आपल्या संदेशाची मांडणी अधिक बांधेसूद करावी लागते. या दृष्टिकोनातून पाहिले तर, वक्ते आणि लेखक (कथित संदेशाचे लेखक) केवळ व्यक्तीव्यक्तीतील सामाजिक देवाणघेवाणीचे कार्य करत नाहीत, तर सुव्यवस्थित संरचना असलेला संदेश तयार करण्याचे लेखनगत कार्य, विचार आणि कल्पनांची सुसंगत मांडणी करण्याचे कल्पनागत कार्य पण करत असतात. भाषेचे रूप आणि कार्य यांचा अशा व्यापक पटावर विचार करण्याला महाभाषिताचे विश्लेषण म्हणतात.

पार्श्वभूमीचे ज्ञान – हे जे आपण आपोआप संदेशाच्या अलिखित आणि अव्यक्त भागाकडून संदेशात नक्की काय सांगायचे आहे, यापर्यंत पोचतो त्यामागे निश्चितच पूर्वज्ञानाचा वाटा मोठा असतो. आपल्या पूर्वज्ञानाच्या उजेडातच आपण नवीन अनुभवाकडे पाहतो याला आकृतिबंध (स्किमा) म्हणतात. आकृतिबंध म्हणजे स्मृतीत अस्तित्वात असलेली पूर्वानुभवाची संरचना. त्या संरचनेला चौकट असेही संबोधले जाते. ही चौकट त्या त्या सामाजिक गटातील सर्वच घटकांच्या स्मृतीत आदिरूप (प्रोटोटाइप्स) म्हणून उपस्थित असते. म्हणूनच,

‘२बेडरुम भाड्याने, हवेशीर, २००००, ५० डिपॉझिट, एजंट क्षमस्व.’

या छोट्या जाहिरातीत २ बेडरुम्सचा हवेशीर फ्लॅट, ५०००० डिपॉझिट, दरमहा २०००० भाड्याने देणे आहे, इच्छुकांनी मध्यस्थाला न घेता व्यवहार करावा. ही माहिती स्थानिक माणसाला कळते, २०००० भाडे वर्षाचे आहे, असे कुणी समजत नाही.

अर्थात पूर्वज्ञानामध्ये जो सांस्कृतिक भाग असतो, तो आंतरसांस्कृतिक भाषावापरशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.

उदा. ‘माझ्या मुलाला नोकरी लागली,’

‘अरे वा! आलीच की चहापोह्यांची वेळ!’

यात ‘चहापोह्यांची वेळ’ म्हणजे त्या मुलाच्या लग्नासाठी वधूसंशोधन करायला जाणे, हे मध्यमवर्गीय मराठी माणसालाच कळू शकेल.

समारोप – भाषावैज्ञानिक विचारव्यूहामध्ये दिवसेंदिवस संदर्भगत अर्थाचे महत्त्व वाढते आहे. भाषावापरशास्त्राची सुरुवात जरी चिह्नमीमांसेतून झाली असली तरी, लवकरच आधुनिक ज्ञानव्यवहारात प्रत्येक गोष्ट वैश्विक होत असल्याने मानवी समूहांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी बोली वा लिखित संप्रेषणातील अव्यक्त वा अलिखित सांदर्भिक माहितीचा धांडोळा घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे संदर्भ ही आजच्या युगातील महत्त्वाची संकल्पना ठरली आहे आणि या संकल्पनेच्या पायावर उभे असलेले भाषावापरशास्त्र, महाभाषितांचा अभ्यास ही क्षेत्रे आता निश्चितच महत्त्वाची ठरणार आहेत.

वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये प्रत्यक्ष किंवा मानसिक अंतर किती आहे यावर वक्ता आपल्याला काय बोलायचे आहे, हे ठरवतो. प्रत्यक्ष अंतर कमी असेल तर तो स्थितिनिर्देशक भाषिक रूपांचा वापर करून काम भागवेल, जास्त अंतर असेल तर निर्देशात्मक भाषिक रूपांचा वापर करेल. मानसिक अंतर जास्त असेल तर तो विनय दर्शवण्यासाठी पुरुषवाचक स्थितिनिर्देशकांचा अनेकवचनात करेल. दोघांमध्ये समान संदर्भाचा धागा असेल तर तो काही सांकेतिक शब्दांचा वापर करेल. दोघेही एकाच सांस्कृतिक गटाचे सदस्य असतील तर देवाणघेवाणीत सहजपणे नामनिदर्शकांचा वापर वेगळ्या प्रकारे करू शकतील. एखाद्या छोट्या शब्दाचा वापर करून किंवा दोन वाक्यांतील रिकाम्या अवकाशाने वक्ता त्याचे म्हणणे श्रोत्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टींमध्ये श्रोता सहकार्य करेल आणि अनुमानाद्वारे आपला संदेश समजून घेईल असे वक्ता गृहीत धरतो. मानवी संभाषणाचा एवढा सखोल विचार अन्य कुठल्याही शाखेने क्वचित केला असेल, यात केवळ भाषाच नाही, तर मौन आणि संभाषणातल्या रिकाम्या जागा सुद्धा अभ्यासकांना आव्हान देत असतात.

संदर्भ : https://plato.stanford.edu/entries/pragmatics/

 

KEYWORDS : #Pragmatics; #Context; #Background knowledge; #Deixis; #Inference, #Proximity and Distance; #Presupposition, #Conversational #Implicature; #Meaning.