चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी कधी आनंद तर कधी दुःख अनुभवाला येते. कधी काम करण्यास उत्साह वाटतो तर कधी काहीही करू नये असे वाटते. एकाच चित्ताच्या या वेगवेगळ्या अवस्था त्रिगुणांमध्ये परिणाम झाल्याने होतात. चित्ताच्या अशा अवस्था अनेक असतात, परंतु योगशास्त्रानुसार यांचा समावेश पाच मुख्य प्रकारांमध्ये केला जाऊ शकतो, ज्यांना चित्तभूमी असे म्हटले जाते. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या चित्ताच्या पाच भूमी आहेत (व्यासभाष्य १.१, १.२). या भूमींचे वर्णन पुढीलप्रमाणे –

(१) क्षिप्त : याचा शब्दश: अर्थ ‘फेकलेले’ असा आहे. ज्याप्रमाणे एखादा खेळ खेळतांना चेंडू एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा फेकला जातो, त्याचप्रमाणे चित्त वेगवेगळ्या वस्तूंकडे आकर्षित होते, परंतु ते कोठेही स्थिर होत नाही. तेव्हा ही चित्ताची क्षिप्त अवस्था होय. या अवस्थेत चित्तात रजोगुणाचे प्राधान्य असते. रजोगुणाचा स्वभावच क्रियाशीलता असल्यामुळे या अवस्थेत चित्त कायम चंचल राहते, कोणत्याही वस्तूवर स्थिर होत नाही. जेव्हा आपल्याला असे वाटते की, ‘माझे मन भरकटत आहे, मनात अनेक विचार येत आहेत, कोणत्याही विचारावर स्थिरता होत नाही’, तेव्हा चित्त हे क्षिप्त अवस्थेमध्येच असते.

(२) मूढ : ज्यावेळी चित्तामध्ये तमोगुणाचे प्राधान्य असते, तेव्हा चित्ताची होणारी अवस्था म्हणजे मूढ अवस्था होय. या अवस्थेत चित्तावर ‘मोहाचा’ प्रभाव असतो. मोह म्हणजे इष्ट-अनिष्ट, योग्य-अयोग्य, चांगले-वाईट काय आहे, हे समजण्याची योग्यता नसणे. तमोगुणाचा स्वभाव ‘आवरण उत्पन्न करणे’ हा असल्यामुळे बुद्धीची योग्य विचार करण्याची पात्रता मूढ अवस्थेमध्ये झाकली जाते. या अवस्थेत ज्ञान होत नाही; किंवा ज्ञान झाले तर चुकीचे ज्ञान होते. तसेच या अवस्थेत क्रियाही होत नाहीत; किंवा क्रिया झाल्या तर त्या चुकीच्या क्रिया होतात.

(३) विक्षिप्त : क्षिप्त अवस्थेमध्ये रजोगुणाच्या आधिक्यामुळे चित्त चंचल असते, परंतु जर कधी सत्त्वगुणामुळे चित्त एखाद्या वस्तूवर अनायास एकाग्र झाले तर ती चित्ताची विक्षिप्त अवस्था होय. क्षिप्त (चंचल) अवस्थेत असतांना कधी तरी चित्त एखाद्या विषयावर एकाग्र होते, ही विशेषता असल्यामुळे ‘क्षिप्त’ अवस्थेपेक्षा वेगळी ही ‘वि-क्षिप्त’ अवस्था आहे. या अवस्थेत होणारी चित्ताची एकाग्रता ही थोड्या काळापुरती आणि कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपोआप होणारी एकाग्रता असते. थोडा वेळ चित्त एखाद्या विषयावर एकाग्र राहून पुन्हा चंचल होते.

(४) एकाग्र : ज्यावेळी चित्तामधील सत्त्व गुण उत्कर्ष पावतो, त्यावेळी चित्त ध्येय आलम्बनावर एकाग्र होते. ही एकाग्रता क्षणिक नसून दीर्घ काळापर्यंत राहणारी असते. जोपर्यंत या अवस्थेत चित्तामध्ये सत्त्व गुण प्रबळ असतो, तोपर्यंत रजोगुणाला चित्तात चंचलता उत्पन्न करण्यास व तमोगुणाला आवरण उत्पन्न करण्यास वाव मिळत नाही. चित्ताच्या एकाग्रतेमध्ये कोणतीही बाधा नसल्यामुळे या अवस्थेत चित्तामध्ये ‘सम्प्रज्ञान’ म्हणजेच यथार्थ (सम्), श्रेष्ठ (प्र) ज्ञान उत्पन्न होते. एकाग्र अवस्थेतच सम्प्रज्ञात समाधी प्राप्त होते.

(५) निरुद्ध : ज्यावेळी त्रिगुणांपैकी कोणताच गुण क्रियाशील नसतो, त्यावेळी चित्ताच्या सर्व वृत्ती निरुद्ध होतात, चित्त हे निर्विचार अवस्थेमध्ये राहते. अशा अवस्थेत सत्त्वगुण कोणतेही ज्ञान उत्पन्न करीत नाही, रजोगुण कोणतीही क्रिया करीत नाही व तमोगुण आवरणही उत्पन्न करीत नाही. काही काळापुरते तीनही गुण निष्क्रिय राहतात, त्यामुळे निर्विचार, निष्क्रिय अवस्था उत्पन्न होते. या अवस्थेत कोणतेही ज्ञान उत्पन्न न झाल्याने या अवस्थेला ‘अ-सम्प्रज्ञात’ योग (किंवा अ-सम्प्रज्ञातसमाधी ) असे म्हणतात.

चित्त कायम एकाच अवस्थेमध्ये राहते असे होत नाही, तर त्यांमध्ये परिवर्तन होत राहते. कधी चित्त क्षिप्त, तर तेच चित्त कधी मूढ, तर कधी विक्षिप्त अवस्थेत राहते. परंतु चित्ताची स्वाभाविक प्रवृत्ती एखाद्या अवस्थेकडे अधिक असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव चंचल असेल, तर त्याचे चित्त एकाग्र होणारच नाही असे नाही; परंतु त्या चित्ताची प्रवृत्ती अधिक काळ क्षिप्त अवस्थेत राहण्याची असते. सर्वसामान्य व्यक्तींचे चित्त हे केवळ क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त या तीन भूमींमध्येच असते. अभ्यास आणि वैराग्याद्वारे चित्तएकाग्र होते व त्यानंतर निरुद्ध अवस्थेपर्यंत जाते.

योगशास्त्राचा अंतिम उद्देश कैवल्य प्राप्त करणे हा असल्यामुळे कैवल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने या पाच चित्तभूमींपैकी पहिल्या तीन भूमी (क्षिप्त, मूढ, विक्षिप्त) अनुपयुक्त आहेत, तर अंतिम दोन भूमी (एकाग्र आणि निरुद्ध) उपयुक्त आहेत. एकाग्र भूमीमध्ये असणारे चित्त बाह्य विषयांचे किंवा आत्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करवून देऊ शकते. एकाग्र अवस्थेत यथार्थ विवेकज्ञान होऊन परवैराग्य उत्पन्न झाल्यावर चित्त निरुद्ध होते व ती अवस्था दृढ झाल्यावरच कैवल्य प्राप्त होते. पहिल्या तीन भूमींमध्ये चित्तात थोड्या काळातही अनेक वृत्ती असतात, एकाग्र भूमीमध्ये केवळ एकच वृत्ती दीर्घ काळापर्यंत असते, तर निरुद्ध अवस्थेमध्ये एकही वृत्ती नसते.

या चित्ताच्या भूमींचे वर्णन स्वतः पतंजली महर्षींनी योगसूत्रांमध्ये केलेले नाही, तर यांचे वर्णन व्यासभाष्य  व अन्य टीका ग्रंथांमध्ये प्राप्त होते.

पहा : चित्त, चित्तवृत्ति.

संदर्भ :

  • आगाशे काशिनाथशास्त्री (संपा.),पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.

समीक्षक : कला आचार्य