योगचूडामणि  हे योगशास्त्रातील एक महत्त्वाचे उपनिषद् आहे. ते सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात १२१ श्लोक असून बह्वंशी भाग पद्यात आणि अत्यंत थोडा भाग गद्यात आढळतो. आसन, प्राणसंरोध (प्राणायाम), प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही सहा योगांगे यात वर्णिली आहेत. अर्थातच अष्टांगयोगातील यम आणि नियम ही अंगे गाळलेली आहेत, हे या उपनिषदातील योगाचे वैशिष्ट्य आहे.

मूलाधारादि सहा चक्रे, शरीरातील नाड्या, त्यांची स्थाने, प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे प्रधान आणि नाग, कूर्म, कृकर, देवदत्त व धनंजय हे गौण असे दहा प्रकारचे वायू यांचे सविस्तर वर्णन प्रस्तुत उपनिषदात आढळते. आध्यात्मिक साधनेविषयी उपदेश करताना अजपा गायत्री विद्या, प्रणवाची म्हणजेच ओंकाराची जपसाधना आणि कुंडलिनी जागृती यांच्या साधनेद्वारे योग्याला मोक्षप्राप्तीचे उद्दिष्ट साध्य होते असे म्हटले आहे.

मुद्रा, बंध इत्यादी हठयोगाची साधनाही या उपनिषदात वर्णिली आहे. महामुद्रा, नभोमुद्रा, उड्डियान बंध, जालंधर बंध व मूलबंध ह्यांचे ज्ञान असणारा योगी मुक्ती मिळवतो. खेचरी मुद्रेच्या साधनेने केवळ रोग, मृत्यू, निद्रा, भूक, तहान, मूर्च्छा इत्यादींचा परिहार होत नाही तर कर्माचे देखील बंधन दूर होते असे हे उपनिषद् सांगते. तसेच महामुद्रेमुळे क्षयरोग, कुष्ठरोग, आवर्त, गुल्म, अजीर्ण इत्यादी आजार दूर होतात असेही म्हटले आहे.

याशिवाय साधना पूर्ण करण्यासाठी ब्रह्मचर्य, मिताहार व सातत्य यांचे पालन हे देखील महत्त्वाचे आहे. वेदान्तानुसार हे उपनिषद् ब्रह्मतत्त्वापासून झालेल्या विश्वोत्पत्तीचे वर्णन करते.

इंद्रियांमुळे (पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये व मन) जीव बंधनात अडकतो परंतु, आत्मा बद्ध होत  नाही; ममत्वभावामुळे तो जीवात्मा ठरतो, तर ममत्वरहित तो केवल (आत्मा) असतो.

प्राणजय अथवा प्राणायामाचे महत्त्व विशद करताना असे म्हटले आहे की, जोपर्यंत शरीरात प्राण (वायू) असतो तो पर्यंत जीव देह सोडून जात नाही; म्हणून त्याला प्राणायामाद्वारे शरीरात टिकवून ठेवले पाहिजे. प्राणायाम करताना अत्यंत स्वच्छ व शुभ्र अशा प्रकाशाचे ध्यान करावे व आनंदाने प्राणायामाची साधना करावी. प्राणायामाचे ओंकार प्राणायाम तसेच उत्तम, मध्यम व अधम असे प्रकार वर्णिले असून त्यांचे परिणामही सांगितले आहेत. जो प्राणायाम केल्याने कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्राच्या ठिकाणी स्थिर राहते, त्या प्राणायामाला सर्वश्रेष्ठ मानले आहे.

योगाच्या उपरोक्त सहा अंगांचे फळ व त्यांच्या साधनेचे तारतम्य वर्णिले आहे. त्यानुसार आसनांमुळे रोग तर प्राणायामामुळे पाप नष्ट होते; प्रत्याहारामुळे सर्व प्रकारचे विकार दूर होतात; धारणेमुळे मनोधैर्य लाभते, तर समाधीमुळे शुभाशुभ कर्मांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. उपनिषदाच्या शेवटच्या काही श्लोकांमध्ये प्राणायामाचेच महत्त्व पुन्हा विशद केले असून शेवटच्या दोन श्लोकांमध्ये प्रत्याहार वर्णिला आहे. ज्याप्रमाणे तिसऱ्या प्रहरी सूर्य आपली किरणप्रभा आवरून घेतो त्याप्रमाणे ह्या तिसऱ्या योगांगाच्या साधकाने आपले मनोविकार आवरून घ्यावेत असे अतिशय समर्पकपणे येथे म्हटले आहे.

अशारीतीने हठयोग व वेदान्त या दोहोंचा समन्वय साधून प्रस्तुत उपनिषद् साधकाला कैवल्याचा मार्ग दाखविते.

संदर्भ : दलाई, बी. के., योगोपानिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे, २०१५.

समीक्षक : कला आचार्य