योगाभ्यासातील एक आसन प्रकार. हाताचा अंगठा हे विश्वात्म्याचे व तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) हे जीवात्म्याचे प्रतीक मानलेले आहे. या दोहोंची जुळणी हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा सुखावह  पद्धतीमध्ये बसून ज्ञानमुद्रा केली जाते. ज्ञानमुद्रा करताना हाताच्या तर्जनीचे टोक अंगठ्याच्या आतल्या बाजूने मुळापाशी टेकवावे. बाकी बोटे मात्र सरळ व शिथिल ठेवावीत. तळहात जमिनीच्या दिशेने गुडघ्यावर टेकवलेले असावेत. काही साधक तर्जनीचे व अंगठ्याचे टोक एकमेकांना जुळवून ही मुद्रा करतात. परिणामदृष्ट्या दोन्ही पद्धती सारख्याच असल्या तरी या पद्धतीत  साधनेच्या दरम्यान बोटे नकळत विलग होण्याची शक्यता असते.

ज्ञानमुद्रेच्या साधनेने बुद्धीचे तेज व स्मरणशक्ती वाढते. एकाग्रता वाढून नकारात्मक विचार दूर होतात. डोकेदुखी, निद्रानाश, तणाव, क्रोध इत्यादींचे निराकरण होते. मस्तकाचे स्नायू मजबूत होण्यासाठीही ह्या मुद्रेचा उपयोग होतो.

चिन्मुद्रा : ज्ञानमुद्रा व चिन्मुद्रा यांमध्ये अतिशय साम्य आढळते. फरक एवढाच आहे की, ज्ञानमुद्रेमध्ये तळव्यांची स्थिती खालच्या दिशेने तर चिन्मुद्रेमध्ये ती वरच्या दिशेने असते.

चित् म्हणजे चैतन्य. तर्जनी व अंगठा एकमेकांना जोडून चिन्मुद्रा केली जाते. साधकाने तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी टेकवावी. साधक प्रारंभिक अवस्थेत असल्यास त्याने तर्जनी अंगठ्याच्या अग्रभागी जुळविली तरी चालेल. इतर तीन बोटे सरळ ठेवावीत. तळवे गुडघ्यावर व आकाशाच्या दिशेने ठेवावेत.

चिन्मुद्रा
ज्ञानमुद्रा

या मुद्रेमुळे फुप्फुसे प्रसरण पावतात. मज्जासंस्थेतील दोष दूर होतात. तसेच साधकाची आकलनशक्ती व स्मरणशक्ती वाढते आणि साधकाला ध्यानावस्था शीघ्रगतीने प्राप्त होते.

 

 

 

 

संदर्भ :

  • स्वामी सत्यानन्द सरस्वती, आसन प्राणायाम मुद्रा बन्ध, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००६.
    नोंदलेखिका – नायगांवकर, रंजना

समीक्षक – कला आचार्य

प्रतिक्रिया व्यक्त करा