हा ग्रंथ स्मृतिवाङ्मयात मोडतो. या स्मृतिमध्ये योगशास्त्रविषयक विवेचन असल्यामुळे योगशास्त्राच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची मानली जाते.या ग्रंथाची रचना नवव्या शतकाच्या पूर्वी झाली असावी, असे मानले जाते. प्रस्तुत ग्रंथात १२ अध्याय आहेत. मिथिलानगरीत निवास असणाऱ्या सर्वयोगीश्वर याज्ञवल्क्यांना जनकादि शिष्य व मुमुक्षू ऋषींनी संसारातून तारून नेणाऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची विनंती केली आणि ओंकार (ओङ्कार), सूर्योपासना, तदनुषंगाने सूर्योपासनेचा गायत्री मंत्र, संध्या, जपविधी या धार्मिक विषयांशिवाय प्राणायाम, ध्यान, धारणा या योगविषयक संकल्पना विशद करण्याची प्रार्थना केली. विद्या-अविद्या व नि:श्रेयस या सारख्या तत्त्वज्ञानविषयक संकल्पनांविषयी देखील जिज्ञासा व्यक्त केली. त्यांच्यावर अनुग्रह करून भगवान याज्ञवल्क्यांनी जो उपदेश केला, त्याचा समावेश बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृतिमध्ये आहे.
प्रस्तुत ग्रंथात सूर्योपासनेच्या संदर्भात इडा व सुषुम्ना या दोन नाड्यांचा उल्लेख आढळतो. योगामध्ये प्रणव किंवा ओंकाराचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये दुसऱ्या व पाचव्या अध्यायात ओंकाराचे सविस्तर व सखोल विवेचन आढळते. ओंकार अ, उ आणि म् या तीन वर्णांनीयुक्त असल्याचे सांगून तो विविध क्षेत्रातील त्रयींचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवतांशी संबंध असल्याने ‘त्रिदैवत’, सत्त्व, रजस् आणि तमस् या गुणांनी युक्त असल्याने ‘त्रिगुण’, तसेच ‘त्रिलोक’, ‘त्रिकाल’, ‘त्रिस्थान’, ‘त्रिप्रज्ञ’ इत्यादी प्रकारे ओंकाराचा निर्देश आढळतो. ओंकाराच्या मात्रा किती असाव्यात याविषयी बाष्कल, रुचकायन, नारद, मौद्गल, मनु, वशिष्ठ, पराशर यांची मते व्यक्त केली आहेत. याज्ञवल्क्याने मात्र सूक्ष्म ओङ्कार हा अमात्र म्हणजे मात्रारहित आहे म्हटले आहे. ओंकार अर्थात् प्रणव ईश्वराचा वाचक आहे असे विधानही आढळते (बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति २.४४). या ग्रंथातील ईश्वर आणि ओंकार याविषयीची संकल्पना पातंजल योगसूत्रानुरूप आहे. ओंकाराचा महिमा सांगताना, “जशी गाय आपल्या वासराचे हंबरणे ऐकून त्याच्याकडे धावत येते, तसेच ब्रह्म देखील प्रणवाने आवाहन केले असता उच्चारणाऱ्याच्या मुखात प्रविष्ट होते” असे काव्यमय वर्णन केले आहे (बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति २.४६).
आठव्या अध्यायात प्राणायाम व प्रत्याहाराचे विवेचन आढळते. प्राणायामाचे वर्णन करताना ओंकारासह गायत्री मंत्राचा उच्चार करून प्राणायाम करावयास सांगितला आहे. पूरक, रेचक आणि कुंभक हे प्राणायामाचे तीन प्रकारही आठव्या अध्यायात वर्णिलेले आहेत. या ग्रंथात प्राणायामासाठी निरोध हा शब्द वापरलेला आहे. पूरकासाठी ग्रहण व उच्छ्वास, कुंभकासाठी धारण व निश्चल-श्वास, आणि रेचकासाठी उत्सर्ग व मुच्यमान हे अन्य समानार्थी शब्द वापरण्यात आलेले आहेत. योगशास्त्रात सर्वसाधारणपणे ‘पूरक’ या संज्ञेचा अर्थ जाणीवपूर्वक स्वेच्छेने नियंत्रणाद्वारे श्वास आत घेणे, ‘रेचक’ या संज्ञेचा अर्थ जाणीवपूर्वक स्वेच्छेने नियंत्रणाद्वारे उच्छ्वास बाहेर सोडणे आणि ‘कुंभक’ या संज्ञेचा अर्थ जाणीवपूर्वक श्वास शरीराच्या आत वा बाहेर रोखून धरणे असा होतो. परंतु या ग्रंथामध्ये या संज्ञांचा अर्थ वेगळा आहे. या ग्रंथानुसार दीर्घ श्वसनाद्वारे श्वास आत घेतल्यावर तो आतच रोखून धरणे म्हणजे पूरक होय. उच्छ्वास पूर्णपणे बाहेर सोडल्यावर श्वास रोखून धरणे म्हणजे रेचक होय. या दोन्ही क्रिया म्हणजेच पातंजल योगसूत्रामध्ये वर्णन केलेले आभ्यंतरवृत्ति आणि बाह्यवृत्ति प्राणायाम होत. प्राणायामाचा तिसरा प्रकार म्हणजे कुंभक किंवा कुंभ होय. या ग्रंथानुसार कुंभकात श्वास रोखून धरण्याआधी श्वास घेणे किंवा सोडणे या क्रिया करण्याची आवश्यकता नसते. स्वाभाविक श्वसन क्रिया चालू असता श्वास-उच्छ्वास क्रियेमध्ये श्वास कधीही रोखून धरला जातो. या क्रियेसाठी या ग्रंथात ‘कुंभक’, योगाच्या अन्य ग्रंथात ‘केवल कुंभक’ आणि पतंजलींच्या योगसूत्रात ‘स्तंभवृत्ति’ अशा संज्ञा आढळतात. पूरक करताना चतुर्भुज विष्णूचे, कुंभकाचे वेळी चतुर्भुज ब्रह्मदेवाचे व रेचक करते वेळी त्रिलोचन शिवाचे ध्यान करण्यास सांगितले आहे. प्राणायामाला ‘तप’ अशी संज्ञा आढळते. प्राणायामाचे लाभ सांगतांना त्यामुळे इंद्रियांचे दोष व अंतर्गत पाप नष्ट होते, असे म्हटले आहे. प्राणायामाच्या तुलनेत प्रत्याहाराचे म्हणजेच इंद्रियांच्या आणि बाह्य विषयांच्या प्रभावापासून मनाला मुक्त करण्याचे वर्णन संक्षेपाने केलेले दिसते. ध्यानासाठी विष्णूचे आलंबन सांगितले असून ते ध्यान म्हणजेच मोक्षमार्ग साधणारा योग आहे असे प्रतिपादन केले आहे. योगाच्या आठ अंगांचा उल्लेख करून योगसाधनेने आत्मा मुक्त होतो, असा बोध केला आहे. आसनांचे वर्णन मात्र आढळत नाही.
विद्या-अविद्या यांचा विचार करताना सर्व आस्तिक षड्दर्शनांचा तसेच पांचरात्र, शैव आणि लोकायत यांचाही परामर्श घेतल्याचे दिसून येते. वेदबाह्य विचारधारांचा निषेध केलेला दिसतो. अशा प्रकारे त्याकाळात प्रचलित असणाऱ्या सर्व मतांचा संग्रह करण्याची पद्धत प्रस्तुत ग्रंथात अनुसरलेली दिसते.
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृतिमध्ये उपनिषदे, भगवद्गीता इत्यादी ग्रंथातील श्लोकांचा वापर केल्याचे आढळून येते. उदा., प्रणवो धनु: शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते। अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत्तन्मयो भवेत्॥ (ओंकार हे धनुष्य असून आत्मा हा बाण आहे. ब्रह्म हे लक्ष्य म्हटले आहे. अत्यंत दक्षतेने त्याचा वेध घ्यावा आणि बाण जसा लक्ष्यमय होतो तद्वत् ब्रह्ममय व्हावे ; बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति २.५४) हे वचन मुण्डक उपनिषदामधून तर “ओं तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध: स्मृत:।” (ओम्, तत्, सत् असा ब्रह्माचा तीन प्रकारे उल्लेख केला जातो; बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति २.९) हे वचन भगवद्गीतेमधून उद्धृत केले आहे. अनेक शब्दांच्या निरुक्ती देखील दिल्या आहेत. ‘अयं तु परमो धर्मो यद्योगेनात्मदर्शनम् ।’ “योगाने आत्मदर्शन प्राप्त करून घेणे हाच श्रेष्ठ धर्म होय” हे योगविषयक विधान ह्या ग्रंथाच्या अकराव्या (११.३४) अध्यायात आढळते.
संदर्भ :
- स्मृतिसंदर्भ-बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति, खंड ४, नाग पब्लिशर्स, दिल्ली, १९८८.
समीक्षक : कला आचार्य