महर्षी पतंजलींनी लिहिलेल्या योगसूत्रांची सुरुवात ‘अथ’ या शब्दाने होते. ‘अथयोगानुशासनम्’ अर्थात् ‘गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रचलित योगशास्त्राचा आरंभ होत आहे’ हे पहिले योगसूत्र आहे. योगसूत्राप्रमाणेच वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दर्शनांच्या सूत्रग्रंथांची सुरुवातही ‘अथ’ या शब्दानेच होते. संस्कृतमधील समानार्थी शब्दांचा प्रसिद्ध कोश ‘अमरकोश’ (३.२४६) यानुसार ‘अथ’ शब्दाचे खालीलप्रमाणे पाच अर्थ आहेत –

(१) मंगल : अथ शब्द हा मंगलवाचक आहे. संस्कृतमधील एका प्रसिद्ध श्लोकानुसार पूर्वी ब्रह्मदेवाने ‘ॐ’ आणि ‘अथ’ या दोन शब्दांचे उच्चारण केले, त्यामुळे हे दोन शब्द मंगलवाचक आहेत. तो श्लोक याप्रमाणे आहे – ‘ॐ कारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा | कण्ठं भित्त्वा विनिर्यातौ तस्मान्माङ्गलिकावुभौ ||’.

(२) आरंभ : अथ शब्द ग्रंथाचा किंवा क्रियेचा आरंभ सूचित करतो. उदा.,  ‘अथ शब्दानुशासनं लिख्यते |’ – शब्दविषयक शास्त्राच्या (व्याकरणाच्या) लेखनाचा आरंभ होत आहे.

(३) आनन्तर्य : एखादी क्रिया आधी करून मग दुसरी क्रिया होत असेल तर ‘-च्या नंतर’ या अर्थीही अथ शब्दाचा प्रयोग केला जातो. उदा., ‘स्नानं कृत्वाऽथ भुञ्जीत |’ – स्नान करावे आणि नंतर भोजन करावे.

(४) प्रश्न : अथ शब्द हा प्रश्नार्थकही आहे. उदा., ‘अथ वक्तुं समर्थोऽसि’ – तू बोलण्यास समर्थ आहेस काय ?

(५) कार्त्स्न्य : अथ शब्द संपूर्णतेचा द्योतक आहे. उदा., ‘अथधातून् ब्रूम: |’ – संपूर्ण (सगळ्या) धातूंचे (क्रियापदांचे) कथन करतो.

योगसूत्रांच्या जवळपास सर्व भाष्यकारांनी या पाच अर्थांपैकी ‘अथ’ शब्दाचा अर्थ आरंभ – सुरुवात असा मानला आहे. अथ शब्दाचा अर्थ विचारात न घेता केवळ ‘अथ’ शब्दाचे श्रवणसुद्धा मंगलवाचक आहे, असे काही भाष्यकार मानतात. ज्याप्रमाणे गंगाजल किंवा आम्रपल्लव यांचा उपयोग एखाद्या कामासाठी केला जाऊ शकतो, परंतु त्यांचे फक्त दर्शन होणेही शुभसूचक मानले जाते; त्याचप्रमाणे सूत्रातील ‘अथ’ शब्द हा आरंभवाचक आहेच, परंतु त्या शब्दाचे श्रवणही मंगलवाचक आहे.

महर्षी जैमिनि विरचित मीमांसासूत्र आणि महर्षि व्यासविरचित ब्रह्मसूत्र या ग्रंथांची सुरुवातही क्रमश: ‘अथातो धर्मजिज्ञासा’ व ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्रांनी होते, परंतु त्या सूत्रांमधील अथ शब्द आरंभवाचक नसून आनन्तर्यवाचक आहे. कारण मीमांसा दर्शनानुसार वेदांचे अध्ययन केल्यानंतरच वेदांमधील यज्ञयागादि कर्मांमध्ये वर्णित धर्म काय आहे, याविषयी जिज्ञासा होऊ शकते. त्यामुळे ‘आनन्तर्य’ म्हणजे ‘एखादी क्रिया संपादित केल्यानंतर’ हा अर्थ येथे योग्य ठरतो.  वेदान्तानुसार (१) नित्य काय आणि अनित्य काय याविषयी विवेक, (२) इहलोकात आणि परलोकात प्राप्त होणाऱ्या भोगांविषयी वैराग्य, (३) शम-दम इत्यादींचे आचरण आणि (४) मोक्षाची इच्छा अशा ब्रह्मप्राप्तीच्या चार मुख्य उपायांचे (साधनचतुष्टयाचे) आचरण केल्यानंतरच ब्रह्मजिज्ञासा होऊ शकते, म्हणून ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्रातील अथ शब्दाचा अर्थ ‘नंतर’ असा आहे. परंतु योगशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी आधीची काही योग्यता असलीच पाहिजे, असे आवश्यक नाही; कारण योगसूत्रांमध्ये वर्णन केलेल्या क्रिया, साधना या सामान्य व्यक्तीपासून उच्च योग्यांपर्यंत सर्वांसाठी आहेत. त्यामुळे ‘अथ’ या शब्दाने योगसूत्रांचा आरंभ सूचित होतो आणि शेवटच्या सूत्रामध्ये (४.३४) आलेल्या ‘इति’ या शब्दाने ग्रंथाची समाप्ती सूचित होते.

संदर्भ :

  • ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.
  • गौतम कपिल, चतुःसूत्री शांकरभाष्य, विद्यानिधि प्रकाशन, दिल्ली, २०१८.

समीक्षक : कला आचार्य