हठयोगात कुंडलिनी शक्तीला आत्यंतिक महत्त्व आहे. घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळते. कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली, बालरंडा, अरुंधती, भुजंगिनी आणि परमेश्वरी ही पर्यायवाचक नावे आढळतात (हठप्रदीपिका ३.१०३,१०९). या शक्तीला तैजसी-शक्ती, जीव-शक्ती, कुटिलांगी आणि सर्पिणी अशीही नावे आहेत.

पतंजलींच्या योगसूत्रात मात्र कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळत नाही. योगकुण्डल्युपनिषद्, योगशिखोपनिषद्, मण्डलब्राह्मणोपनिषद्, तन्त्रसार, ज्ञानार्णवतन्त्र, शिवसंहिता तसेच काही सांप्रदायिक ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे विस्तृत आणि सखोल विवेचन केले आहे. पातंजल योगात सूक्ष्मशरीराशी संबधित असलेल्या चित्ताच्या एकाग्रतेतून कैवल्यप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. अन्य ग्रंथांमध्ये स्थूल शरीराशी संबधित योगसाधनेद्वारे कैवल्य प्राप्तीचे विविध मार्ग सांगितले आहेत. कुंडलिनीची साधना साधकाला स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेते.

मानवी शरीरात लिंग व नाभी यांच्या दरम्यान चार बोटे रुंद असा मऊ, पांढरा, वस्त्राने झाकल्याप्रमाणे दिसणारा एक कंद आहे (हठप्रदीपिका ३.११२). ह्या कंदाच्या वर आणि मेरुदंडाच्या खालील भागातील मूलाधारचक्रात वेटोळे घातलेल्या सर्पिणीसारखी अमूर्त स्वरूपात कुंडलिनी शक्ती वास करते. ती वर्तुळाकारात (कुंडल) असल्याने तिला कुंडलिनी असे संबोधिले जाते (घेरण्डसंहिता ६.१६,१८). शिवसंहितेत कुंडलिनी शक्तीच्या स्वरूपाचे विस्तृत विवरण आहे.

गुदद्वारापासून दोन अंगुळे वर आणि जननेंद्रियापासून एक अंगुळ खाली, चार अंगुळे परिमाणयुक्त एक समकोन कंद आहे. गुद आणि जननेंद्रियाच्यामध्ये योनिस्थान असते. त्यामध्ये पश्चिमाभिमुख कंद आणि कंदामध्ये कुंडलिनी शक्ती वास करते. ती आकाराने कुटिलाकृती आणि सर्व नाड्यांभोवती साडेतीन वेटोळे घातलेली व सुप्तावस्थेत असून स्वयंप्रभेने प्रकाशमान आहे. ती शेपटीला मुखात धरून सुषुम्ना नाडीच्या विवरात स्थित आहे. ती बीजसंज्ञक वाणीची देवता आहे. ती सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांची जन्मदात्री आहे (शिवसंहिता, पंचम पटल ७७ – ८१).

जाबालदर्शनोपनिषदानुसार कुंडलिनी शक्ती ही पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा अष्ट प्रकृतींनी युक्त आहे (४.११). तांत्रिक मतानुसार कुंडलिनी शक्ती प्रत्येक जीवात प्रसुप्तावस्थेत राहणारी परमेश्वराची पराशक्ती आहे. विवेकमार्तण्ड ग्रंथानुसार कुंडलिनी कमलदंडासारखी असून ती शुभ फल देणारी आहे.

कुंडलिनी शक्तीचे जागरण, जागृत झालेल्या शक्तीचे उत्थान, क्रमश: चक्रभेदन आणि सहस्रार स्थित शिव तत्त्वाशी समरसता हे कुंडलिनीच्या साधनेचे चार टप्पे होत.

कुंडलिनीच्या जागृतीसाठी शक्तिचालनाची प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी साधकाने वज्रासनात बसावे. दोन्ही हातांनी दोन्ही पाय दृढ धरावे जेणेकरून घोट्याजवळच्या भागावर कंद जोराने दाबला जाईल. अशाप्रकारे कुंडलिनीचे चालन केल्यावर तिला भस्त्रिका प्राणायामाद्वारे जागृत करावे (हठप्रदीपिका ३.१२१). योगकुण्डलिन्युपनिषदानुसार शक्तिचालन म्हणजे मूलाधारचक्रातून भ्रू (भुवईंच्या) मध्यापर्यंत कुंडलिनीस प्रवृत्त करणे.

कुण्डल्येव भवेत्छक्तिस्तां तु संचालयेद्बुध: | स्वस्थानादाभ्रुवोर्मध्यं शक्तिचालनमुच्यते || (योगकुण्डलिन्युपनिषद् १.७)

सुषुम्ना नाडी पाठीच्या कण्यातून मस्तकापर्यंत स्थित असते. उजव्या नाकपुडीने पूरक करून निश्चल अशा कुंडलिनी शक्तीला सुषुम्नेच्या मार्गावर सक्रिय करण्यात येते. त्यामुळे सुषुम्ना नाडीतून प्राणाचा प्रवाह सुरू होतो. सुषुम्ना नाडीतून जागृत झालेली कुंडलिनी वरच्या दिशेने स्वाधिष्ठानचक्राकडे प्रयाण करते आणि अशाप्रकारे षट्चक्रांचे भेदन करीत ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते. ब्रह्मरंध्र हे मोक्षप्राप्तीचे द्वार आहे, असे म्हटले जाते. या षट्चक्र भेदनाविषयी काही अभ्यासकांचे मत असे आहे की, कुंडलिनी अनाहतचक्राचे भेदन न करता त्या चक्राला वळसा घालून ऊर्ध्वदिशेने गमन करते, म्हणून या चक्रास अनाहतचक्र असे म्हणतात.

जागृत झालेली शक्ती ब्रह्म, रुद्र व विष्णु या तीन ग्रंथींचा भेद करते. मूलाधारचक्र, स्वाधिष्ठानचक्र, मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्धिचक्र, आज्ञाचक्र या षट्चक्रांचे भेदन करून सहस्रारचक्रात लीन होते.

साधक प्राणायामाद्वारा व ध्यानाने कुंडलिनीला जागृत करतो तेव्हा जागृत झालेल्या ठिकाणी तो  उष्णता अनुभवितो. ही शक्ती देदीप्यमान तसेच विद्युत् प्रभेसारखी प्रकाशमय आहे असा अनुभव घेतो. परिणामी साधकाला शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार होतो. साधकाची कुंडलिनी जागृत झाल्यावर तो सर्व सिद्धींचा स्वामी होतो असे म्हटले जाते. ही शक्ती साधकाला मोक्ष प्रदान करणारी ठरते तर अनभिज्ञ जीवाला संसाररूपी बंधनात जखडते. प्राणायामाने कुंडलिनी जागृत करण्याची प्रक्रिया गूढ आहे. ती योगाभ्यासाने आणि  गुरूपदेशाने प्राप्त होते.

पहा : प्राणायाम, षट्चक्र, हठयोग.

संदर्भ :

  • देवकुळे, व. ग., हठप्रदीपिका, शारदा साहित्य प्रकाशन, पुणे.
  • देवकुळे, व. ग., घेरण्ड संहिता, शारदा साहित्य प्रकाशन, पुणे.
  • शिवसंहिता, कैवल्यधाम श्रीमन्माधव योग मंदिर समिती, पुणे.
  • १०८ उपनिषद्, ब्रह्मवर्चस् शांतिकुंज, हरिद्वार.

समीक्षक : कला आचार्य