कवलापूरकर, काळू-बाळू : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत .काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ.काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जीत तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं कवलापूरकर या दाम्पत्यापोटी कवलापुर जि.सांगली येथे १६ मे १९३३ रोजी दोघांचा जन्म झाला . आधी काळूचा आणि मग बाळूचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षाचे असताना वडीलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमान काळातील घडामोडीवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मोडकळीस आला. पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला. तमाशा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला. काळू-बाळू १५-१६ वर्षाचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय केला. चुलती दुर्गाबाईच्या मदतीने तमाशा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला. हलगी, ढोलकी, झांज, तुणतुणे ही वाद्ये आणि वेशभूशा घेण्यासाठी जनावरांसाठी आणलेले वैरण विकून काळू-बाळूला दुर्गांबाईंनी मदत केली. कवलापूरातील मूले एकत्र करून तमाशाच्या तालमी सुरू केल्या. या काळामध्ये हळूहळू डोंबारी, कोल्हाटी, जोगतीणी, मुरळी यांनी तमाशाच्या बोर्डावर नाचकाम करण्यास सुरूवात केली होती.
पूर्वी तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाच्या. यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे. तमाशात काम करणारी माणसं तर मिळाली पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतीणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला. पुढे शामराव, रामराव, धृपदा, मारूती, भिमराव हे कलावंत काळू-बाळूला येऊन मिळाले. काळू-बाळूने तमाशाची बांधणी एकदम कडक केली होती. सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सादर करायचा ठरवला. शामरावाने सूत्र हाती घेऊन सर्व कलावंताना कथानक समजावून सांगितले. पात्रांची वाटणी केली आणि काळू-बाळूचा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला.
काळू बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू की कोण बाळू हे ओळखणे कठीण हेाते. दोघांचा चेहरा, रंगरूप आकारमान तंतोतत जुळणारे. एकाला लपवावं आणि दुसरयाला उभं करावं असे हमशकल भाऊ चहूमुलखी नावलौकिक मिळवत होते. त्यांच्या नावाचा गवगवा हा सुप्रसिद्ध ज्येष्ठ तमाशा कलावंत बाबूराव पुणेकर यांच्यापर्यंत पोहचला. वगसम्राट बाबूराव पुणेकरांना काळू-बाळूच्या किर्तीची माहिती झाल्यानंतर काळू-बाळूचा तमाशा पाहण्याची ईच्छा प्रकट केली आणि आर्यभूषण थिएटरमध्ये एक खेळ आयोजित केला. काळू-बाळू पुण्याला प्रथमच आले होते. त्यांनी त्या रात्री जहरी प्याला हा वग सादर केला.
जवळजवळ १५ वगनाट्य काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली . त्यात कोर्टात मला नेऊ नका, भाऊ भावाचा खुण कुणाचा, इंदिरा ही काय भानगड, भिल्लाची टोळी, प्रेमाची फाशी’,दगलबाज मित्र, सत्ता द्यावी सुनेच्या हाती, रक्तात रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम 302, तुझ्यासाठी वेडा झालो, शेराला भेटला सवाशेर, जिवंत हाडाचा शैतान, आणि जहरी प्याला इत्यादी सामाजिक, राजकीय घडामोंडीवर भाष्य करणारी वगनाट्य सादर केली.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कला महोत्सव हैदराबाद, आदिवासी लोककला परिषद भोपाळ, अखिल भारतीय नाट्यसंमेलन, कलागौरव पुरस्कार पुणे (२००५), लोकशाहिर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सातारा, कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली, आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००) पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव पुरस्कार (२००५) इत्यादी पुरस्कारांनी या जेाडगोळीला सन्मानित केले.
काळू म्हणजेच लहू संभाजी खाडे यांचा ९ जुलै २०११ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.