घोडवेल फॅबेसी कुलातील एक बहुवर्षायू, महालता असून तिचे शास्त्रीय नाव प्युरॅरिया टयुबरोजा आहे. सोयाबीन, घेवडा, वाटाणा व ज्येष्ठमध या वनस्पतीदेखील या कुलात मोडतात. ही वनस्पती भारत, नेपाळ आणि चीन या देशांत आढळते. भारतात अतिदमट किंवा अतिकोरडा प्रदेश सोडला तर ही सर्वत्र आढळते.
घोडवेल ही आधाराला वेढा घालत वर चढत जाणारी वेल आहे. मुळे मोठी, मांसल सु. २५ सेंमी. लांब असून आत पांढरा स्टार्च असतो. खोड लाकडासारखे (काष्ठयुक्त) मजबूत असून व्यास सु. १२ सेंमी. पर्यंत वाढू शकतो. पाने त्रिदली, एकाआड एक असून पर्णिका अंडाकार असतात. फुले निळी किंवा जांभळी असून फुलोरा १५ ‒ ३० सेंमी. लांब असतो. शेंगा चपट्या, ५ ‒ ७ सेंमी. लांब व लवदार असून त्यात ३ ‒ ६ बिया असतात.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या वनस्पतीची लागवड करतात. मुळे चांगली वाढतात. मुळांची चव ज्येष्ठमधासारखी असून ती कच्ची किंवा शिजवून घोडयांना व शिंगरांना खाऊ घालतात. पाने गुरांना आणि घोडयांना चारतात. मुळांमध्ये आणि पानांमध्ये प्रथिने, कर्बोदके, शर्करा, तंतू इ. भरपूर प्रमाणात असतात. वेगवेगळ्या च्यवनप्राशांमध्ये ही वनस्पती एक महत्त्वाचा घटक आहे. मुळे शामक, दुग्धवर्धक आणि ज्वरात तृषाशामक असतात. मुळांपासून स्टार्च मिळवितात. या वनस्पतीच्या मुळांच्या औषधी गुणधर्मामुळे तिला वाढती मागणी आहे. तिचा वैध आणि अवैध मार्गाने व्यापार केला जातो. अतिवापरामुळे भारतातील वनात ही वनस्पती अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.