एक गाणारा पक्षी. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉडिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या १८ प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे चंडोल म्हणतात. भारतात खासकरून ॲलॉडा आणि मायराफ्रा प्रजातीचे चंडोल आढळत असून त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे ॲलॉडा गुलगुला आणि मायराफ्रा एरिप्थ्रोप्टेरा अशी आहेत. त्यांपैकी मा.एरिप्थ्रोप्टेरा जातीचे चंडोल अधिक संख्येने आढळतात. मोकळ्या आणि कोरडया जागी त्यांचा वावर असतो. मनुष्यवस्तीला लागून असलेल्या भागात ते सहज वावरतात.

चंडोल :ॲलॉडा गुलगुला

चंडोल साधारणपणे चिमणीसारखा दिसतो. या पक्ष्याच्या शरीराची लांबी सु. १२‒१५ सेंमी. असून वजन सु.१५‒७५ ग्रॅ. असते. शरीरावर तपकिरी आणि करडया रंगाची पिसे असून त्यांवर फिकट-गडद रेषा असतात. डोक्यावर तपकिरी रंगाचा अस्पष्ट तुरा; डोळ्याच्या वर फिक्कट पिवळा पट्टा; करडया रंगाच्या छातीवर तपकिरी रेषा; गळ्यावर तपकिरी ठिपके; पाय तसेच चोच पिवळसर तपकिरी असतात. नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात. चोच मध्यम आकाराची, सरळ असते. फळे फोडून त्यातील बिया मिळविण्यासाठी काही जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या चोची अधिक बळकट असतात. पायाचे मागचे बोट किंचित लांबट असते. त्यामुळे त्याची जमिनीवरील बैठक स्थिरावण्यास मदत होते. जमिनीवर त्यांचा जास्त काळ वावर असून ते उडया मारत असतात. प्रसंगी ते झुडपांवर बसलेले दिसतात. जमिनीवर पडलेले धान्य, बिया व अळ्या ते खातात.

चंडोल पक्ष्याचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते जुलै असतो. त्यांची घरटी जमिनीवरच असतात.वाळलेल्या गवतापासून छोटया वाटीच्या आकाराचे ते घरटे बांधतात. मादी एका वेळी २‒४ अंडी घालते. अतिशुष्क प्रदेशात अंड्यांची संख्या कमी असते. अंडी रंगाने राखाडी असून त्यांवर गडद काळसर ठिपके असतात. हे पक्षी स्वत:, त्यांची घरटी आणि अंडी या सर्वांच्या पार्श्वभूमीशी असलेल्या रंगसंगतीतून संरक्षणात्मक छद्मावरण साधतात. अंडी उबविण्याचा कालावधी ११ ते १६ दिवसांचा असतो. प्रौढ चंडोल पूर्णत: तृणबीज भक्षक असतात. मात्र घरटयातील पिलांना सुरुवातीच्या काळात ते कीटकांच्या अळ्या भरवितात. कालांतराने पिलांनाही तृणबीजांचा आहार देण्यास सुरुवात होते.

विणीच्या हंगामात विशिष्ट क्षेत्रावरचा हक्क दाखविण्यासाठी आणि मादीला प्रभावित करण्यासाठी नर पंखांची फडफड करीत आकाशात खूप उंचावर जातो. त्यानंतर आपले पंख उघडून हवाई छत्रीधारकासारखा हळूहळू जमिनीवर येऊन पोहोचतो. खाली येताना तो मंजुळ आवाजात गातो. आवाजात सुरुवातीला तीन लघू आणि एक दीर्घ आलाप असतो. असे तो पुनः पुन्हा करतो.

एखादया भागात चंडोल पक्ष्याचा वावर हे त्या भागातील वन्य जीवन सुस्थितीत असल्याचे लक्षण मानतात. म्हणूनच चंडोल हा वन्य जीवन सुस्थितीचा जैव-निर्देशक मानला गेला आहे.