गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. उत्तर आफ्रिकेपासून मध्य आशियापर्यंत हा वृक्ष आढळतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे.
गुग्गूळ वृक्षाची उंची सु. २ मी. पर्य़ंत असून साल खरबरीत व राखाडी रंगाची असते. फांद्यांवर गाठी असतात आणि फांद्या टोकाला काटेरी असतात. पाने संयुक्त, फांद्यांवर एकाआड एक व अंडाकृती असून त्यांच्या कडा काटेरी असतात. फुले लहान व तपकिरी लाल रंगाची असतात. गुग्गुळाच्या काही झाडांना नर-फुले आणि द्विलिंगी फुले येतात, तर काही झाडांना फक्त मादी फुले येतात. फळ लहान असून आठळीयुक्त असते. ते पिकल्यावर लाल होते. त्यांचा आकार अंडाकृती असून त्यात दोन आठळ्या आणि दोन बिया असतात.
गुग्गुळाचा डिंक किंवा राळ सालीवर चिरा पाडून मिळविला जातो. त्याला ‘इंडियन डेलियम’ म्हणतात. त्याचा रंग फिकट हिरवा आणि पिंगट असतो. हा डिंक (गोंद) जैव रासायनिक पदार्थ असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तो जंतुनाशक, कफोत्सारक, पाचक, स्तंभक, रक्तवर्धक, शामक, वायुनाशी, व्रणनाशक आणि रेचक आहे. तो सुगंधी धूप करण्यासाठी वापरला जातो.