एक परिचित स्पर्शसंवेदी झुडूप. लाजाळू वनस्पती फॅबेसी कुलाच्या मिमोझेसी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिमोजा पुडिका आहे. मिमोजा प्रजातीत सु. ४०० जाती आहेत. लाजाळू मूळची दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील असून जगभरातील सर्व उष्ण प्रदेशांत ती तण म्हणून वाढते. भारतात तिचा प्रसार सर्वत्र झाला असून ती ओलसर, मोकळ्या जागी व समुद्रकिनाऱ्यालगत आढळून येते. काही उद्यानांत ती कुंड्यांमध्येही आढळून येते. तिच्या पानांना स्पर्श केल्यास ती मिटली जातात, म्हणून तिला लाजाळू किंवा लाजरी म्हणतात.

लाजाळू (मिमोजा पुडिका) : पाने व फुलोऱ्यांसहित वनस्पती

लाजाळूचे झुडूप ५०–‍९० सेंमी. उंच वाढते. कोवळे असताना ते सरळ उभे वाढते. मात्र जून झाल्यावर ते जमिनीवर पसरते. खोडाला अनेक केसाळ व काटेरी फांद्या असतात. पाने संयुक्त व स्पर्शसंवेदी असून एका देठाला चार पिच्छके (संयुक्त पानांचा एक प्रकार) असतात. प्रत्येक पिच्छक संयुक्त आणि पिसासारखे असते. प्रत्येक पिच्छकात पर्णिकांच्या (पिच्छिकांच्या) १०–‍२६ जोड्या असतात. पिच्छकाचा खालचा भाग रोमश, तर वरचा भाग रोमहीन असतो. उन्हाळ्याच्या मध्यास पानांच्या बगलेतून स्तबक प्रकारचा फुलोरा येतो.  फुलोरा लालसर, गोलाकार व ६–‍८ मिमी. व्यासाचा असून त्यातील फुले सूक्ष्म, लालसर, बहुतेक द्विलिंगी व चतुर्भागी असतात. शेंग चपटी व वाकडी असून त्यात 3–‍५ दोन्ही बाजूंनी फुगीर असलेल्या बिया असतात.

लाजाळू शीतल व चवीला कडू असून शरीरातील कफ तसेच पित्त विकारांवर गुणकारी असते. तसेच ती मूळव्याध व कावीळ यांवर गुणकारी असते.तिच्या मुळाचे आणि पानांचे चूर्ण मूळव्याधीवर देतात. मूळ चवीला कडू व तुरट असून जखम भरण्यास उपयोगी असते. लाजाळूच्या बियांमध्ये हिरवट पिवळ्या रंगाचे तेल असते. त्याचा उपयोग लेप देण्याच्या पदार्थाकरिता होऊ शकतो. पानांत मिमोसीन नावाचे विषारी अल्कलॉइड असते. ते कर्करोग पेशी पसरण्यास अटकाव करत असल्यामुळे पाने कर्करोगावर वापरता येतील का, यासंबंधी संशोधन चालू आहे.

लाजाळूची स्पर्शसंवेदी पाने हवेच्या झोताने, नुसते हालविल्याने किंवा हात लावल्याने मिटतात. हा वनस्पतींच्या हालचालीचा एक प्रकार असून त्याला कंपकुंचन म्हणतात. वनस्पतीच्या एखाद्या भागात असलेल्या स्पर्शसंवेदी पेशींपासून निर्माण झालेले उद्दीपन दुसऱ्या वेगळ्या भागातील प्रतिसादी पेशींना वेगाने पारेषित करण्याच्या वनस्पतीच्या क्षमतेवर हे कंपकुंचन अवलंबून असते. लाजाळूची पाने याच आविष्कारामुळे मिटली जातात. स्पर्शसंवेदी वनस्पतींमध्ये प्रत्येक पर्णिका व देठाच्या तळाशी सांध्याप्रमाणे संरचना असते. या संरचनेला स्थूलाधार म्हणतात. हा भाग मूलोती पेशींचा बनलेला असून या पेशी आकाराने मोठ्या व पातळ भित्तिकांच्या बनलेल्या असतात. या आविष्कारामुळे मूलोती पेशी प्रेरित होत असल्यामुळे त्यांना प्रेरक पेशी म्हणतात.

लाजाळूच्या पर्णिकांना स्पर्श होतो तेव्हा विद्युत् संदेश निर्माण होऊन ते पर्णिकांच्या देठाच्या तळाशी स्थूलाधारापर्यंत पोहोचतात. तेथे या विद्युत् संदेशाचे रुपांतर रासायनिक संदेशात होऊन तेथील पेशीपटलांमधून परासरणाद्वारे पाणी बाहेर विसरीत होते. परिणामी प्रेरक पेशींतील पाणी कमी झाल्यामुळे त्या मऊ पडतात आणि त्यामुळे पाने मिटली जातात. हा परिणाम तात्पुरता असून १५-३० मिनिटे टिकतो. काही वेळाने प्रेरक पेशींमध्ये पुन्हा पाणी आत शिरते आणि लाजाळूची पाने उघडली जातात. शाकाहारी प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण व्हावे म्हणून लाजाळूमध्ये असे घडत असावे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content