वैद्य, अरुणकुमार श्रीधर : (२७ जानेवारी १९२६ ‒ १० ऑगस्ट १९८६). भारताचे दहावे सरसेनापती (१९८३–८६). त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत सरकारी अधिकारी होते. आईचे नाव इंदिरा, तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग येथे व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला (१९४४). पुढे ‘डेक्कन हॉर्स’ या चिलखती दलात त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नेमणूक करण्यात आली (१९४५). निजामाच्या हैदराबाद संस्थानावरील कारवाईत त्यांनी दौलताबाद, परभणी या भागांत कॅप्टन या नात्याने महत्त्वाची कामगिरी पार पाडली (१९४८). त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा विवाह झाला.
पुढे वेलिंग्टन (तमिळनाडू राज्य) येथे त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील शिक्षणक्रम पूर्ण केला (१९५८-५९). त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी काम केले.
‘डेक्कन हॉर्स’ या पलटणीचे समादेशक (कमांडर) म्हणून १९६५ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारत-पाक युद्धात (१९६५) त्यांच्या नेतृत्वाखाली ‘डेक्कन हॉर्स’ या पलटणीने खेमकरणाच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या तुकडीने शर्मन रणगाड्यांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांच्या धुव्वा उडविला. या युद्धात वैद्य यांनी दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीरचक्र बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर ब्रिगेडिअर या पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली. पूर्व विभागात १६७ पर्वतीय ब्रिगेडचे समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले (१९६९). त्या वेळी नागा बंडखोरांना पकडण्याची यशस्वी मोहीम त्यांनी पार पाडली. त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवापदक देण्यात आले (१९६९).
त्यानंतर वैद्य यांची नेमणूक अहमदनगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल येथे समादेशक म्हणून झाली. पुढे मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती दलाचे त्यांनी नेतृत्व केले. चक्रा, देहलरा आणि बसंतर येथे पाकिस्तानबरोबरच्या युद्धांत (१९७१) त्यांनी धैर्य, धीमेपणा व रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात २० किमी.पर्यंत मजल मारून शत्रूचे ६० रणगाडे नष्ट केले व बसनारनजीकचा महत्त्वाचा पूल काबीज केला. या त्यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. दोनदा महावीरचक्र मिळविणारे अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी होत.
दिल्ली येथे सैनिकी कारवाई (Military Operations) विभागाचे संचालकपदही त्यांनी सांभाळले (१९७२–७८). त्यानंतर सदर्न कमांड (पुणे) येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पूर्व सेनाविभागाचे (कमांडचे) समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले (१९८०–८३). याच काळात आसामातील दंगलींना आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
लेफ्टनंट जनरल एस्. के. सिन्हा यांची सेवाज्येष्ठता डावलून सरकारने अरुणकुमार वैद्य यांची भूसेनाध्यक्ष म्हणून नेमणूक केली (१ ऑगस्ट १९८३). सियाचिन भागात नवीन ठाणी उभारून भारतीय सैन्य बारा महिने पाकिस्तानी सैन्यावर लक्ष ठेवू शकेल, अशी व्यवस्था केली.
त्यांच्या सेनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच अमृतसर (पंजाब) येथील सुवर्णमंदिरातून खलिस्तानवादी सशस्त्र अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सैनिकी कारवाई करण्यात आली (१९८४). जनरल कृष्णस्वामी सुंदरजी व मेजर जनरल के. एस्. ब्रार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. मंदिराच्या पावित्र्याला धक्का न पोहोचावा म्हणून थोडी अधिक सैनिकांची हानी पतकरून वैद्य यांनी लष्करी पद्धतीने ही कारवाई पूर्ण केली. वैद्य निवृत्तीनंतर (३१ जानेवारी १९८६) पुणे येथे स्थायिक झाले. शीख अतिरेक्यांची त्यांना सतत धमकीवजा पत्रे येत होती. अखेर पुण्यातील क्वीन्स गार्डन भागात अतिरेक्यांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.