माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड कॉलेज नैनिताल व इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून या दोन प्रसिद्ध शिक्षणसंस्थांतून उत्तीर्ण होऊन १९३४ मध्ये त्यांनी कमिशन मिळविले. प्रथम द्वितीय रॉयल स्कॉट्स या पलटणीत नियुक्ती, नंतर फ्रँटियर फोर्स रेजिमेंट व त्यानंतर गुरखा रेजिमेंटमध्ये नियुक्ती. दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) जपानविरूद्ध झालेल्या ब्रह्मदेशाच्या पहिल्या लढाईत (१९४२) धैर्याने लढत असता ते गंभीरपणे जखमी झाले. त्यांनी लढाईत दाखविलेले धैर्य, कणखरपणा, धडाडी व शौर्य या गुणांच्या गौरवार्थ रणांगणातच त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ हा बहुमान देण्यात आला होता. क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजचे उत्तम तऱ्हेने स्नातक बनल्यावर त्यांची सैन्यातील अधिपती व प्रशासक अधिकाऱ्याच्या अनेक पदांवर नियुक्ती झाली. विशेषतः १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात कलकत्ता (कोलकाता) येथे ईस्टर्न कमांडचे प्रमुख असताना त्यांनी पूर्व भागाच्या युद्धाची आखणी केली. त्याच सुमारास ते सैन्यप्रमुख बनले. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळीदेखील त्यांनी युद्धाची आखणी केली आणि अत्यंत नाविन्यपूर्ण व परिणामकारक युद्धपद्धती अवलंबून फक्त १२ दिवसांत ते युद्ध संपवले. तसेच शत्रूचे ९०,००० युद्धकैदी ताब्यात घेऊन बांगला देशाचा ‘मुक्तिसंग्राम’ यशस्वी करून दाखविला. त्याचप्रमाणे त्यांनी पश्चिम सीमेवरही पाकिस्तानला थोपविले. या त्यांच्या अपूर्व कर्तबगारीच्या गौरवार्थ १९७२ मध्ये त्यांना स्वतंत्र हिंदुस्थानच्या संरक्षणदलाचे आजीव फील्डमार्शल बनविण्यात आले. त्यांच्या अंगी असलेल्या सैनिकी गुणांत मानवता, क्षात्रधर्म, आर्तांबद्दलची कणव, कडक शिस्तपालन, पण तितकाच अंकुश, प्रफुल्लता आणि सर्व स्तरांवरच्या लोकांशी मोकळेपणाने मिसळणे, हे प्रमुख होते. निवृत्तीनंतर त्यांनी आपला बहुतांश वेळ पत्नी सिलू यांच्यासमवेत निलगिरी टेकड्यांतील कुन्नूर येथे पुष्पसंवर्धन आणि कुक्कुटपालन व मधुमक्षीकासंगोपन या कार्यांत घालविला. त्यांनी अखिल भारतीय क्रीडांगण खेळ समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांना पद्मभूषण (१९६८) आणि पद्मविभूषण (१९७२) या दोन नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. सर्व शिपाई त्यांना ‘सॅम बहाद्दूर’ या नावाने संबोधित. यावरून त्यांची लोकप्रियता निदर्शनास येते.

न्यूमोनियामुळे त्यांचे वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात निधन झाले.

संदर्भ :

  • https://www.bharat-rakshak.com/ARMY/personnel/chiefs/32-sam-manekshaw.html
  • https://timesofindia.indiatimes.com/india/field-marshal-sam-manekshaw-10-interesting-facts/articleshow/63593076.cms