चार शिंगे असलेले हरिण. चौशिंग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिल) गणाच्या गोकुलातील बोव्हिडी उपकुलात होतो. याचे शास्त्रीय नाव टेट्रासेरस क्वाड्रिकॉर्निस आहे. टेट्रासेरस प्रजातीत क्वाड्रिकॉर्निस ही एकमेव जाती आहे. भारत व नेपाळमधील मोकळया वनांत हा प्राणी आढळतो. भारतात हिमालयाच्या दक्षिणेस, तमिळनाडूतील वनांत, ओडिशा तसेच गुजरातमधील गीरच्या राष्ट्रीय उद्यानांत चौशिंगा आढळतो.
चौशिंगा हा आशियाई गोकुलातील सर्वांत लहान प्राणी आहे. खांद्याजवळ त्याची उंची सु.६५ सेंमी. असून वजन १७—२२ किग्रॅ. असते. शरीराची लांबी सु.१ मी. असते. बांधा सडपातळ असून पाय पातळ आणि शेपूट आखूड असते. अंगावरील केस जाडेभरडे व आखूड असून रंग तांबूस तपकिरी असतो. प्रौढ नराचा रंग पिवळसर असतो. पोटाकडील भाग फिकट पांढरा असतो. प्रत्येक पायाच्या पुढच्या बाजूला केसांचा काळा पट्टा असतो. तसेच प्रत्येक पायाला चार खूर असून त्यांपैकी पुढचे खूर जमिनीला टेकतात. मागचे खूर आखूड असल्याने अधांतरी असतात.या खुरांच्यामध्ये गंध ग्रंथी असतात.या समूहातील इतर प्राण्यांमध्ये या ग्रंथी नसतात.
चौशिंग्याच्या नराला असलेली चार शिंगे हे खास वैशिष्ट्य आहे. वन्य सस्तन प्राण्यांमध्ये चार शिंगे असणारा हा एकमेव प्राणी आहे.सामान्यपणे शिंगांची एक जोडी कानांच्या मध्ये डोक्यावर असून दुसरी जोडी थोडी पुढे कपाळावर असते. शिंगांची पहिली जोडी पहिल्या काही महिन्यांत येते, तर दुसरी जोडी १०—१४ महिन्यांनंतर येते. शिंगे आखूड व गुळगुळीत असून त्यांना शाखा नसतात. पुढच्या जोडीतील शिंगे २-३ सेंमी. लांब, तर मागच्या जोडीतील शिंगे ८—१० सेंमी. लांब असतात. चौशिंग्याची शिंगे कधीही गळून पडत नाहीत. मात्र दोन नरांच्या लढाईत बऱ्याचदा ती मोडतात. मादीला शिंगे नसतात.
चौशिंगे सामान्यपणे एकेकटे किंवा जोड्यांनी राहतात. रानोमाळ भटकण्याऐवजी ते ठराविक क्षेत्रात राहणे पसंत करतात आणि वावरण्याचा परिसर मलमूत्राचा वापर करून निश्चित करतात. हा प्राणी वेगवेगळ्या अधिवासात आढळत असला तरी डोंगराळ प्रदेशात मोकळ्या व कोरड्या पानझडी वनांत राहतो. ज्या ठिकाणी गवत उंच वाढलेले असते, अशी जागा याला विशेष पसंत असते. संकटाच्या वेळी त्याला उंच गवतात लपता येते. गवत हे त्याचे मुख्य अन्न आहे. याखेरीज मऊ पाने, फुले आणि फळे यांचाही त्याच्या आहारात समावेश असतो. वाघ, बिबटे आणि रानटी कुत्री हे याचे भक्षक आहेत.
चौशिंग्याचा प्रजननकाळ मे ते जुलै असून साधारणपणे १८० दिवसांच्या गर्भावधीनंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मादी १-२ पिलांना जन्म देते. पाडसे सु.१ वर्ष मादीबरोबर राहतात आणि २ वर्षांच्या सुमारास प्रौढ होतात.
चौशिंग्याच्या नैसर्गिक अधिवासाचे रूपांतर शेतजमिनीत झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार झाल्यामुळे त्यांचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत केला आहे. भारतातील वन्यजीव कायद्यानुसार चौशिंगा ही जाती संरक्षित करण्यात आली आहे.