क्लोरीन, फ्ल्युओरीन व कार्बन हे घटक असलेल्या संयुगांचा गट. गंधहीन, बिनविषारी, अज्वलनग्राही, बाष्पनशील, निष्क्रिय व अतिशय स्थिर ही या संयुगांची वैशिष्ट्ये आहेत. हा संयुगांचा गट हायड्रोकार्बन आधारित असून त्यातील काही किंवा सर्वच हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन किंवा फ्ल्युओरीन अणूंनी घेतलेली असते. त्यांना सामान्यपणे फ्रिऑन म्हणतात.

जनरल मोटर्स या कंपनीतील रसायनशास्त्रज्ञांनी १९३० मध्ये क्लोरोफ्ल्युओरोकार्बन (सीएफसी) कार्बन संयुग विकसित केले. वातानुकूलन व प्रशीतन यंत्रांमध्ये एक प्रशीतनक म्हणून आणि रासायनिक उद्योगांत, संगणक, दूरध्वनिसंच, इलेक्ट्रॉनीय मंडल व फवारणी उपकरणे यांमध्ये तसेच स्वच्छ करण्याच्या रसायनांत एक विद्रावक म्हणून सीएफसी संयुगांचा उपयोग केला जातो. याशिवाय प्लॅस्टिकफोम फुगविण्यासाठी औद्योगिक उपयोजनेत या संयुगाचा उपयोग केला जातो. हे संयुग जेवढे उपयुक्त तेवढेच हानीकारकही आहे. वातावरणात शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ ते टिकू शकते. मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेतील १९७४ मधील संशोधनानुसार सीएफसी संयुग मंद गतीने वातावरणातील स्थितांबरात पोहोचते. इतर वायूंप्रमाणे वातावरणातील तपांबरातून हे संयुग वर जाताना त्यातील रेणूंचा र्‍हास होत नाही; परंतु स्थितांबरातील ओझोन थरात आल्यानंतर अतिनील सूर्यकिरणांमुळे रासायनिक प्रक्रिया होऊन सीएफसी रेणूंमधून क्लोरीनचे अणू मुक्त होतात. या मुक्त क्लोरीन अणूंमुळे ओझोनमधील (O3) ऑक्सिजनचे रेणू (O२) वेगळे होतात. म्हणजेच ओझोनचे ऑक्सिजन रेणूंमध्ये रूपांतरण होते. या प्रक्रियेत ओझोनचा क्षय होतो. ओझोनचे रेणू ज्याप्रमाणे अतिनील किरणे शोषून घेतात, त्याप्रमाणे हे ऑक्सिजनचे रेणू अतिनील किरणे शोषून घेऊ शकत नाहीत. क्लोरीन इतका शक्तिशाली असतो की, त्याचा एक अणू ओझोनचे सु. एक लाख अणू नष्ट करतो. एमआयटी संस्थेमधील वैज्ञानिकांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनेनंतर दहा वर्षांतच अंटार्क्टिका खंडावरील वातावरणातील ओझोन थराचा ४० ते ५० टक्के र्‍हास झाल्याचे आढळले. यालाच ओझोन छिद्र म्हटले जाते. उत्तर गोलार्धातही थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे आढळले आहे.

क्लोरोफ्ल्युओरोकार्बन या वायूकडून पृथ्वीपासून विकिरण होणारी उष्णता शोषली जाते. त्यामुळे जागतिक तापमानवृद्धीच्या दृष्टीनेही हा वायू अतिशय उपद्रवकारक आहे. कार्बन डाय-ऑक्साइडच्या १०,००० अणूंमुळे जितकी उष्णता वाढते, तितकी उष्णता सीएफसीच्या केवळ एका अणूमुळे वाढते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, जपान, चीन इ. देशांत सीएफसीचे उत्सर्जन जास्त होते, तर त्यामानाने भारतात सीएफसीचे उत्सर्जन कमी आहे.

क्लोरोफ्ल्युओरोकार्बन वाढता वापर, ओझोन थराचा र्‍हास आणि त्याचे गंभीर परिणाम यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने विचार होऊ लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९८७ मध्ये जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन माँट्रिऑल मसुदा (करार) तयार केला. ओझोनच्या र्‍हासास कारणीभूत ठरणार्‍या सीएफसी निर्मितीवर व वापरावर २००० सालापासून निर्बध घालण्याची तरतूद या मसुद्यात आहे. जगातील सर्व देशांनी तसा प्रयत्‍न केल्यास पुढील सु. ५० वर्षांत ओझोन थर हळूहळू पूर्वस्थितीत येईल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार अनेक देशांनी सीएफसीचा वापर कमी केला आहे. परंतु रसायने, ओद्योगिक संयुगे व खते यांमधून बाहेर पडणार्‍या ब्रोमीन, हॅलोकार्बने व नायट्रस ऑक्साइड इत्यादींचा ओझोन थरावर परिणाम होतच आहे. प्रशीतकासाठी पर्यायी प्रशीतनक संयुगे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन चालू आहे. हायड्रोक्लोरोफ्ल्युओरोकार्बन (एचसीएफसी) व हायड्रोफ्ल्युओरोकार्बन (एचएफसी) ह्या नवसंशोधित संयुगांचा वापर सध्या होत आहे. सीएफसी वापर कमी होऊन भविष्यात ओझोन थर पूर्वस्थितीत येईल व जागतिक तापमानवृद्धी रोखता येईल अशी वैज्ञानिकांना आशा आहे.