जीवओळख दोन प्रकारे करता येते : (१) शारीरिक वैशिष्टये आणि (२) वर्तनीय वैशिष्टये. शारीरिक वैशिष्टयांमध्ये बोटांचे ठसे, चेहरा, डीएनए अंगुलीमुद्रण (पहा : डीएनए अंगुलीमुद्रण), तळहातांचे ठसे, शरीराचा गंध, डोळ्यांतील परितारिका अशा शरीराशी संबंधित बाबींचा समावेश होतो. वर्तणुकीच्या वैशिष्ट्यांमध्ये व्यक्तीच्या वागण्याच्या लकबी जसे चालणे, उभे राहणे, आवाज इत्यादींचा समावेश होतो. शारीरिक लक्षणे (उदा., बोटांचे ठसे, डोळे) प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात आणि ती दीर्घकाळ बदलत नाहीत. बोटांच्या ठशांवरून व्यक्तीची ओळख पटविण्याची पद्धत अनेक दशके प्रचलित आहे. आधुनिक जीवओळख पद्धतीत व्यक्तिविशिष्ट लक्षणे आणि संगणकाचा वापर होत असल्यामुळे ही पद्धत अधिक विश्वासार्ह आणि परिपूर्ण झाली आहे. जीवओळख पद्धतीत सामान्यपणे ‘ओळख’ किंवा ‘पडताळा’ अशा दोन प्रणाली असतात.
ओळख प्रणाली : यात विशिष्ट व्यक्तीची मान्यता न घेता किंवा त्या व्यक्तीच्या अपरोक्ष ती व्यक्ती ओळखून काढली जाते. जसे, मोठया गर्दीत अमूक व्यक्ती उपस्थित आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी त्या गर्दीचे छायाचित्र घेतात आणि ज्या व्यक्तीची ओळख पटवावयाची आहे, त्याचे छायाचित्र त्या गर्दीतील प्रत्येक चेहऱ्याशी जुळवून पाहतात. एप्रिल २०१३ मध्ये अमेरिकेत बाँबस्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी तरुणाचा शोध घेण्यासाठी तेथील पोलिसांनी हीच पद्धत वापरली होती.
पडताळा प्रणाली : काही महत्त्वाच्या संस्था, सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, उद्योग, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर करतात. अशा ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे व छायाचित्र माहितीच्या स्वरूपात संगणकावर संग्रहित केले जाते. अशा ठिकाणी प्रवेशद्वारापाशी एक इलेक्ट्रॉनिक यंत्र असते. व्यक्ती प्रवेश करताना जेव्हा त्या यंत्राची एक कळ बोटाने दाबते तेव्हा त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे, छायाचित्र आणि संगणकातील माहिती तंतोतंत जुळल्यास त्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो.
जीवओळख पद्धतींचा वापर कार्यालयीन कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, गुन्हे शोधून काढण्यासाठी, इंटरनेटद्वारा होणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी करतात. भारतातील अनेक कार्यालयांत कर्मचाऱ्याच्या बोटांचे ठसे, डोळे, चेहरा यांची छायाचित्रे अंकीय (डिजिटल) स्वरूपात संगणकात साठवून ठेवतात. जेव्हा कर्मचारी कामावर येतो तेव्हा कार्यालयाच्या दरवाजात असलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रावर तो अंगठा दाबताच, त्याच्या अंगठ्याचे ठसे आणि संगणकात असलेल्या अंकीय प्रतिमा एकमेकांशी जुळतात आणि तो कर्मचारी कामावर आल्याची नोंद होते. गुन्ह्यांचा तपास लावताना हीच पद्धत वापरतात. कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला की पोलिस सर्वप्रथम त्या व्यक्तीचे नाव, हाताच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र काढून ठेवतात. अशा व्यक्तीने पुन्हा गुन्हा केल्यास, गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या ठशांबरोबर जुळवून पाहतात आणि गुन्हेगाराला शोधून काढतात. १९०० सालापासून गुन्हे शोधण्यासाठी वापर करण्यात आलेल्या या पद्धतीला तिचा जनक एडवर्ड हेन्रीयांच्या नावावरून ‘हेन्री पद्धत’ असे म्हणतात. भारतातील आधार ओळखपत्राची देशव्यापी योजना ही जीवओळख पद्धतीचा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे, असे मानतात.